Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 June 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जून २०१८ दुपारी
१.०० वा.
****
वस्तु
आणि सेवा कर-जीएसटी प्रणाली देशभरात यशस्वी होणं, हे देशातल्या नागरिकांचं यश असल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या मालिकेच्या
४५व्या भागात ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. ही नवीन प्रणाली आता स्थिर झाली
असून, आवश्यकतेनुसार त्यात बदल केले जात असल्याचं ते म्हणाले. जीएसटीमध्ये सुधारणा
घडवून आणण्याचं सगळ्यात जास्त श्रेय हे राज्यांना जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.
पंतप्रधान
येत्या २८ तारखेला उत्तर प्रदेशातल्या मगहर या संत कबीर यांचं समाधीस्थळ असलेल्या गावी
भेट देणार आहेत. तर सहा जुलैला डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती आणि पुढच्या वर्षी
शीख धर्माचे गुरु नानकदेव यांचं पाचशे पन्नासावं प्रकाशपर्व साजरं करण्यात येणार असल्याचं
सांगून पंतप्रधानांनी, त्यांच्या कार्याचा उल्लेख केला.
पंजाबमधल्या
जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणालाही पुढच्या वर्षी शंभर वर्षं पूर्ण होतं आहेत. या
घटनेचं स्मरण आपण कशा पद्धतीनं करु शकतो, याचा विचार करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
भारत
अफगाणिस्तान दरम्यान नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघानं दाखवलेल्या
खिलाडू वृत्तीचं त्यांनी कौतुक केलं.
बंगळुरू
इथं उद्योजक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अभियंत्यांनी सहज समृद्धी न्यास स्थापन
करून, कृषी क्षेत्रासाठी सुरू केलेल्या कार्याचा पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
नुकत्याच
साजरा झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जगभरातल्या लोकांनी उत्साहात योगाभ्यास
केला, देशातही प्रत्येक ठिकाणी, नागरिकांनी, तसंच शाळा आणि महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी
योग दिनात सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. येत्या एक जुलै रोजी साजरा
होणाऱ्या डॉक्टर्स दिनानिमित्त त्यांनी देशातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या.
****
दरम्यान,
पंतप्रधानांनी आज नवी दिल्ली इथं दिल्ली मेट्रोच्या मुंडका- बहादुरगढ़ या सुमारे ११
किलोमीटर मार्गाचं उद्घाटन केलं. शहरांमध्ये सुविधाजनक, आरामदायी आणि परवडणारी वाहतूक
प्रणाली विकसित करण्याला सरकारनं प्राधान्य दिल्याचं ते यावेळी म्हणाले. गेल्या चार
वर्षात रस्ते, रेल्वे, महामार्ग, हवाई मार्ग आणि जलमार्गांच्या विकासासाठी सरकारनं
काम केलं असून, दळणवळण आणि विकासाच्या योजनांना वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला असल्याचं
त्यांनी नमूद केलं.
****
झारखंडमधल्या
गिरीडीह जिल्ह्यात पोलिसांनी घातलेल्या छाप्यात सहा नक्षलवाद्यांना स्फोटकांसह अटक
करण्यात आली. यापैकी चार नक्षलवाद्यांना चारचाकीतून प्रवास करत असताना पकडण्यात आलं.
त्यांच्या चौकशीनंतर अजून दोन जणांना अटक करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक सुरेंद्र
कुमार यांनी सांगितलं. गिरीडीह धनबाद पोलिसांनी केलेला संयुक्त छाप्यात पिस्तुल, २५
हातबाँब आणि इतर स्फोटकं जप्त करण्यात आली.
****
कुख्यात
गुन्हेगार दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याच्या संशयावरून मुंबईत काल पोलिसांच्या खंडणीविरोधी
पथकानं एकाला अटक केली. पाकिस्तानातल्या सूत्रधाराच्या सांगण्यावरून एका हॉटेलमालकाला
धमकावल्याचा आरोप त्याच्यावर आहे. रामदास राहणे असं या इसमाचं नाव असून, मुंबई, गुजरातमध्ये
मिळून रहाणेच्या नावावर ११ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला न्यायालयात हजर केलं
असता ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
अभियांत्रिकी
आणि फार्मसी या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची पहिली यादी आज जाहीर
होणार आहे. या शाखांना प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत काल संपली.
****
नांदेड-वाघाळा
महानगरपालिकेनं प्लास्टिक वापरासाठी तेरा व्यावसायिकांकडून प्रत्येक पाच हजार रुपये
प्रमाणे पासष्ट हजार रुपये दंड वसूल केला. प्लास्टिक वापर बंदीवर लक्ष ठेवण्यासाठी
सहा पथकं स्थापन करण्यात आली असून, त्यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली.
****
राज्यात
अनेक ठिकाणी आजही पाऊस सुरू आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये संततधार सुरु आहे. पालघर जिल्ह्यातही
आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु असून, हवेत गारवा निर्माण झाला आहे.
****
नांदेड
जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात हणेगाव इथल्या कृषी केंद्राच्या पाहणीत भरारी पथकाला
सोयाबीन बियाण्यांच्या १९४ पिशव्या संशयास्पद आढळून आल्या. खतं, तसंच कीटकनाशकाचा काही
साठा तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नेदरलँड्स
मधे ब्रेडा इथं सुरु असलेल्या हॉकी चॅम्पियन्स चषक स्पर्धेत भारताचा सामना आज अर्जेन्टिनाशी
होणार आहे. काल झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार - शून्य असा पराभव
केला.
****
दुबई
इथं सुरु असलेल्या कबड्डी मास्टर्स जागतिक स्पर्धेच्या अ गटात भारतानं केनियाचा ४८
- १९ असा पराभव केला. या स्पर्धेतल्या सलग दुसऱ्या विजयासह भारत अ गटात अग्रस्थानी
आहे.
****
No comments:
Post a Comment