आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० जून २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
राज्याच्या ग्रामीण भागात आर्थिक दृष्ट्या दुर्बल जनतेला हक्काची घरं बांधून
देण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यानं ठरवलेल्या अतिरिक्त ७ लाख ९४
हजार ३० घरांच्या उद्दिष्टास चालू आर्थिक वर्षातच मंजुरी देण्याची मागणी, मुख्यमंत्री
फडणवीस यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडं केली आहे.
काल नवी दिल्ली इथं फडणवीस यांनी तोमर यांची भेट घेतली. महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार योजना - मनरेगा अंतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी उर्वरीत ४३८ कोटी रुपये
निधीदेखील देण्याची मागणी मुख्यमंत्री यावेळी केली.
या दोन्ही मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं
आश्वासन तोमर यांनी यावेळी दिलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
****
महिला आयोगाच्या वतीनं देशभरातील तुरुंगांना भेटी दिल्या जात असून,
महिला कैद्यांच्या स्थितीचा, त्यांच्या समस्यांचा आढावा घेतला जात असल्याचं आयोगाच्या
अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितलं. त्या काल नाशिकमध्ये महिला मेळाव्यात बोलत होत्या.
केवळ पैशांअभावी जामीन घेऊ न शकलेल्या महिला कैद्यांना आर्थिक मदत देण्याबाबतचा आयोग
प्रयत्न करीत असून, यासाठी काही सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार असल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
ग्रामीण
भागातल्या नव संकल्पनांना योग्य ती संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशानं
प्रत्येक जिल्ह्यात राज्याच्या धर्तीवर स्टार्ट अप सुरू करणार असल्याचं कौशल्य विकास मंत्री
संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं आहे. राज्य कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग तसंच महाराष्ट्र
राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राबविण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र स्टार्ट अप’ सप्ताह 2018 च्या सांगता समारंभात ते काल
मुंबईत बोलत होते.
****
मलेशियात क्वालालम्पुर इथं सुरू
असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि किंदाबी श्रीकांत यांचे उपांत्य
फेरीचे सामने आज दुपारी होणार आहेत. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी
तिसऱ्या मानांकित सिंधूची लढत तैवानच्या अव्वल मानांकित ताई झू यिंग सोबत तर पुरूष
एकेरीत श्रीकांतचा सामना जपानच्या केन्तो
मोमोता याच्याशी होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment