आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२७ जून २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
सरकारनं सुरू केलेल्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या
लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नमो ॲपच्या माध्यमातून संवाद
साधला. या योजना आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांना सशक्त करत असल्याचं ते म्हणाले. सामान्य
नागरिक आता पर्यंत सामाजिक सुरक्षा योजने पासून वंचित होता, मात्र आता व्यवस्था बदलत
आहे, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.
****
पंजाब नॅशनल
बँकेचे तेरा हजार कोटी रुपये बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाची
प्रक्रिया सुरू करण्यास मुंबईच्या एका विशेष न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाला काल परवानगी दिली. न्यायालयाचा हा आदेश आता परराष्ट्र
मंत्रालया मार्फत इंग्लंड सरकारकडे पाठवण्यात येईल.
****
श्री अमरनाथ
यात्रेसाठी भाविकांचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूहून रवाना झाला. जम्मू काश्मीरच्या
राज्यपालांचे सल्लागार बी बी व्यास आणि के विजयकुमार यांनी या जत्थ्याला निरोप दिला.
या यात्रेसाठी सुरक्षेसह सर्व व्यवस्था चोख करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महिलांसाठी
भारत हा सर्वाधिक धोकादायक देश असल्याचा निष्कर्ष काढणाऱ्या सर्वेक्षणाला राष्ट्रीय
महिला आयोगाने फेटाळून लावलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी,
हे सर्वेक्षण तथ्यहीन असल्याचं सांगत, देशात महिला सुरक्षित असल्याचं नमूद केलं.
****
झारखंडमधल्या
गढवा जिल्ह्यातल्या बूढा पहाड या ठिकाणी नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात
सहा पोलिसांना वीरमरण आलं तर अन्य चार पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचं वृत्त आहे. या
ठिकाणी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. नक्षलवाद्यांनी पोलिसांची शस्त्रं
पळवून नेल्याचा संशय आहे.
****
येत्या दोन
दिवसात मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वेध शाळेने वर्तवला असून
जालना परिसरात अति वृष्टीची शक्यता आहे. दरम्यान, औरंगाबाद नांदेडसह मराठवाड्यात काही
भागात कालही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. अहमदनगर जिल्ह्यात रतनवाडी परिसरात गेल्या
दोन दिवसात साडेतीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली, या पावसामुळे भंडारदरा धरणाच्या
पाणी साठ्यात वाढ होत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment