Thursday, 28 June 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.06.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 28 June 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशातल्या नागरिकांचं जीवनमान सुधारण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था - आयआयटीच्या पदवीधरांनी महत्वाची भूमिका बजवावी असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ते आज आयआयटी कानपूरच्या ५१व्या दिक्षांत समारंभात बोलत होते. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया यासारख्या कल्याणकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावू शकतं. म्हणून देशाच्या आणि मानवतेच्या कल्याणासाठी तंत्रज्ञांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग करावा असं राष्ट्रपती म्हणाले.

****

सरकारी तसंच स्वयंसेवी संस्थांनी प्रामुख्यानं ग्रामीण भागात कर्करोगाचं निदान लवकर व्हावं याकरता जनजागृती उपक्रम राबवावेत, असं आवाहन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते आज बंगळुरू इथं एका कर्करोग संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. देशात कर्करोगाच्या तीस लाख प्रकरणांतील केवळ साडे बारा टक्के प्रकरणांचं प्रारंभीच्या टप्प्यात निदान होतं. निरोगी राहण्यासाठी जीवनशैली आणि आहारात बदल करावा. योग आणि स्वस्थ आहाराद्वारे आरोग्य प्राप्त होते, असंही उपराष्ट्रपतींनी यावेळी म्हटलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांना त्यांच्या ९७व्या जयंतिनिमित्त त्यांना अभिवादन केलं. देशाच्या अत्यंत महत्वाच्या आणि ऐतिहासिक काळात राव यांच्यासारख्या राजनेत्यानं देशाचं नेतृत्व केलं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावली असं मोदी यांनी आपल्या ट्वीटरवरच्या संदेशात नमूद केलं आहे. राव हे १९९१ ते १९९६ पर्यंत देशाचे पंतप्रधान होते.

****

अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायदा - ॲट्रॉसिटी कायद्याला संरक्षण आणि ताकद देण्यासाठी येत्या लोकसभा अधिवेशनात विधेयक आणलं जाणार असल्याचं सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेची एक जागा, तीन महामंडळांचं अध्यक्षपद आणि राज्याच्या होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात एक मंत्रिपद मिळावं या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी राज्यात आणि केंद्रात शिवसेनेला मंत्रीपद देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी अशी मागणी करणार असल्याचं सांगत राज्यात शिवसेना-भाजपनं एकत्रित निवडणूका लढवल्या पाहिजे असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.

****

मुसळधार पावसामुळं थांबवण्यात आलेली अमरनाथ यात्रा आता बाल्टाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून पुन्हा सुरू झाली आहे. संयोजन संस्थेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ५९ भाविकांची पहिली तुकडी परंपरेनुसार पहलगामच्या चंदनवारी येथून रवाना झाली. काल संध्याकाळी सुमारे तीन हजार यात्रेकरू कडक सुरक्षा व्यवस्थेत बाल्टाल आणि पहलगाम येथे दाखल झाले होते. सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ही यात्रा थांबवण्यात आली होती.

****

मुंबईत आज एक खासगी विमान कोसळून पाच जण मृत्यूमुखी पडले. विमानातील दोन पायलट, दोन अभियंता तसंच एका पादचाऱ्याचा मृतांत समावेश आहे. जुहू विमानतळावरून चाचणी उड्डान घेतल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास घाटकोपर भागात हे विमान कोसळलं. मुंबईतील एका कंपनीनं चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारकडून या विमानाची खरेदी केली होती. नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांत राज्यात झालेला हा दुसरा विमान अपघात आहे.

****

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ या विधान परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी नवी मुंबईतल्या आगरी- कोळी भवन इथं सुरू आहे. मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघात लोकभारतीचे कपिल पाटील आघाडीवर आहेत. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे आघाडीवर आहेत. अंतिम निकाल संध्याकाळी उशीरा जाहीर होण्याची शक्यता आहे.

****

रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई - गोवा महामार्गावर काल एक मोटार नदीत वाहून गेल्यानं एकाच कुटुंबातल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. संगमेश्वर तालुक्यातल्या गोळवली इथं हा अपघात झाला.

****

धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातल्या कोळीद आणि पनाखेड गावात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या ४ बोगस डॉक्टरांविरुध्द शिरपूर तालुका पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून एकजण पसार झाला आहे. या बोगस डॉक्टरांकडून वैद्यकीय साहित्यही जप्त करण्यात आलं आहे.

****

क्वालालांपूर इथं सुरु असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, महिला एकेरीत पी.व्ही.सिंधू आणि पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतनं आज आपापले पहिल्या फेरीचे सामने जिंकले मात्र, सायना नेहवालचं आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं.

****

No comments: