Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 20 June 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
राज्य
मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत, राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना राज्यात सुरू
करण्यास मान्यता देण्यात आली. राज्यातल्या एकशे पंचेचाळीस बाजार समिती, राष्ट्रीय कृषी
बाजार, अर्थात ई-नाम पोर्टलला जोडण्याचा निर्णय, तसंच या समितींमधल्या ई-ट्रेडिंगच्या
नियमनासाठी यासंदर्भातल्या अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात
आला. दुय्यम न्यायालयातले न्यायिक अधिकारी तसंच निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना,
दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाच्या अंतरिम शिफारशी एक जानेवारी २०१६ पासून लागू
करण्याला, तसंच महानगरपालिकांच्या मालकीच्या मालमत्तांसंदर्भात निर्णय घेता यावेत,
यासाठी यासंबंधींच्या अधिनियमात सुधारणा करण्यालाही आज मंत्रीमंडळानं मंजुरी दिली.
शिंगणापूर इथल्या श्री शनैश्वर देवस्थानाचं व्यवस्थापन अधिक व्यापक आणि कार्यक्षम करण्यासह
भक्तांसाठी उत्तम सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याला या बैठकीत
मान्यता देण्यात आली.
****
आंतरराष्ट्रीय
योग दिनानिमित्त उद्या मुंबईमध्ये एका स्वयंसेवी संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी
उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या दिनाचं यावर्षीचं घोषवाक्य
आहे - ‘शांतीसाठी योग’. उद्या या दिनानिमित्त औरंगाबादमध्येही गारखेड्यातल्या विभागीय
क्रीडा संकुलात सकाळी सात वाजता योगविषयक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून,
या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम
भापकर यांनी नागरिकांना केलं आहे.
****
वादग्रस्त
इस्लामी धर्मगुरू झाकीर नाईक, याला कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं
आज नकार दिला. आपलं पारपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका झाकीरच्या
वतीनं सादर करण्यात आली आहे. धार्मिक तेढ पसरवण्याचा आरोप नाईकवर असून, झाकीर नाईक
तपास यंत्रणेसमोर कधीही उपस्थित राहिला नसल्यानं त्याला असा कोणताही दिलासा देता येणार
नसल्याचं न्यायालयानं म्हटलं.
****
खरीप
हंगामाच्या पीक कर्ज वाटपासाठी जालना जिल्ह्यात प्रशासनाकडून घेण्यात येत असलेल्या
तालुकास्तरीय मेळाव्यांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, अर्ज केलेल्या सुमारे
दोन हजार शेतकऱ्यांपैकी पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना या मेळाव्यांमधून आतापर्यंत
सव्वा पाच कोटी रुपयांच्या पीक कर्जाचं वाटप करण्यात आल्याची माहिती जालन्याच्या जिल्हा
उपनिबंधकांनी दिली आहे.
****
राज्यातल्या
उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या अनुसूचित जाती आणि जमातीतल्या तसंच अंत्योदय योजनेतल्या
कुटुंबांसाठी मोफत गॅस जोडणी देण्याच्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या
योजनेचा शुभारंभ आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कोरेगाव इथं, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष
कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यापूर्वी गॅस जोडणी न घेतलेल्या कुटुंबांनी
या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन शिंदे यांनी यावेळी बोलताना केलं.
****
राज्य
शासनाच्या ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ या योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
आठ तालुक्यांतल्या एकशे सहा गावांतल्या तलावांमधला आठ लाख अकरा हजार आठशे सतरा घनमीटर
गाळ काढण्यात आला आहे. काढलेला गाळ शेतांमध्ये टाकण्यासाठी शासनानं जिल्हा प्रशासनामार्फत
शेतकऱ्यांना मदत केली आहे. यामुळे, धरणांमधला पाणीसाठा वाढण्यासोबतच, शेतकऱ्यांच्या
जमिनी सुपीक होण्यासही मदत होणार आहे.
****
कोल्हापूरच्या
अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतची प्रक्रिया योग्य असून, ती शासनाच्या आदेशानंच
सुरू झाली आहे, असा निर्वाळा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी
बोलताना दिला. ही प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे.
****
राज्यात
आज जालना, सातारा आणि धुळ्यासह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचं वृत्त आहे. उस्मानाबाद,
सातारा तसंच हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं
आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात आज दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली
असून सिन्नर तालुक्यात मीठसागरे इथे वीज कोसळून एका युवकाचा तर देवपूर शिवारात दोन
गायींचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment