Friday, 22 June 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 22.06.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 22 June 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्य सरकारनं २३ मार्च रोजी राज्यात प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी लागू करण्यासाठी उत्पादक, वितरक, व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांना प्लॉस्टिकचा वापर बंद करण्यासाठी तसंच उपलब्ध साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दिलेली मुदत आज संपत असून उद्यापासून या बंदी आदेशाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत प्लास्टिकची उत्पादनं तयार करणाऱ्या कारखान्यांवर तातडीनं धाडी टाकून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

विनापरवाना ज्या प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्या, कारखाने आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन अशा कंपन्या सील करा, तसंच प्रत्येक जिल्ह्यात प्लास्टिक बंदीची कशा प्रकारे जनजागृती केली याचा आढावा घेण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिक वस्तू आणि कचऱ्यांचं संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देश राज्यातल्या सर्व स्थानिक प्रशासनांना देण्यात आले असल्याचं राज्य सरकारनं आज मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं.

वाशिममध्ये प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या वतीनं धडक कारवाई करण्यात आली, यात १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

****

शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या बारामती इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते. देशातल्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये कृषी संबंधी होत असलेल्या कामांमुळे आधुनिक भारताच्या निर्माणाला मदत मिळेल, असं ते म्हणाले. नायडू यांनी बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि विद्या प्रतिष्ठानला आज भेट दिली. कृषी, विज्ञान, शिक्षण क्षेत्रात बारामतीनं घेतलेली झेप कौतुकास्पद असून, इथलं कृषी विज्ञान केंद्र हे देशातल्या सर्व कृषी विज्ञान केंद्रासाठी आदर्श असल्याचं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.

****

काँग्रेसनं पक्षातर्गंत संघटनेत मोठे फेरबदल केले असून, महाराष्ट्राचे पक्ष प्रभारी म्हणून लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती केली आहे. मोहन प्रकाश यांच्या जागी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही नियुक्ती केली. याबरोबरच जे डी सिलम आणि महेंद्र जोशी यांना पक्षाचे सरचिटणीस आणि शशिकांत शर्मा यांना सहसरचिटणीस म्हणून नियुक्त केलं आहे.

****

विद्यापीठात समाजोपयोगी संशोधन व्हावं असं मत मानव संसाधन विकास, जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ.सत्यपाल सिंग यांनी व्यक्त केलं आहे. पुणे इथं आज भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या १९ व्या पदवीप्रदान समारंभात ते प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पी.एचडी. संपादन करणाऱ्यांची संख्या भारतात अधिक आहे, मात्र संशोधनाची गुणवत्ता हा चिंतेचा विषय असून, उच्च शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत नेण्यासाठी खासगी विद्यापीठं महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असं त्यांनी नमूद केलं. या समारंभात सात हजार ३३८ विद्यार्थ्यांना पदवी, ९० विद्यार्थ्यांना पी.एचडी. आणि ५० विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकं प्रदान करण्यात आली.

****

कृषी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सन २०१८-१९ या वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांकडून निश्चित केलेल्या शिक्षण शुल्काच्या केवळ पन्नास टक्केच रक्कम घेण्याचे निर्देश राज्यातल्या सर्व संबंधित शिक्षण संस्थांना राज्य शासनानं दिले आहेत. अशा विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्काची ५० टक्के रक्कम राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून देण्यात येते. ५० टक्के रक्कम घेऊन प्रवेश न देणाऱ्या अथवा त्यापेक्षा जास्त रक्कम घेणाऱ्या शिक्षण संस्थांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना विभागानं तंत्र शिक्षण संचालकांना दिल्या आहेत.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड ते पनवेल आणि सिकंदराबाद ते जबलपूर हा रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. नांदेडहून परभणी, परळी, लातूर, उस्मानाबाद, पुणे मार्गे पनवेलला जाणाऱ्या विशेष गाडीच्या चार आणि अकरा ऑगस्टला फेऱ्या होणार आहेत. तर सिकंदराबाद-जबलपूर गाडीच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. ही गाडी दर सोमवारी सिकंदाराबादहून निघून, दुसऱ्या दिवशी जबलपूरला पोहोचते.

****

अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या बाभळेश्वर, कोल्हार, अकोले इथं आज दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. मात्र अजूनही अनेक भागात पाऊस झाला नसल्यानं शेतकरी चिंतातूर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: