Wednesday, 27 June 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 27.06.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 27 June 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

अस्मितादर्श चळवळीचे जनक, प्रसिद्ध लेखक, दिवंगत डॉक्टर गंगाधर पानतावणे यांना शासनानं जाहीर केलेला पद्मश्री पुरस्कार, विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज पानतावणे यांच्या कुटुंबियांना सन्मानपूर्वक सुपूर्द केला. डॉ.पानतावणे यांच्या कन्या नंदिता आणि निवेदिता यांनी हा पुरस्कार स्वीकारला. डॉ.पानतावणे प्रकृती अस्वास्थ्यामुळे पद्म पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित राहू शकले नव्हते आणि त्यानंतर २७ मार्चला त्यांचं निधन झालं. त्यामुळे हा पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांकडे आज देण्यात आला. दरम्यान, पानतावणे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या जन्मदिनी उद्या, अस्मितादर्श अर्धशतकपूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी साडेनऊला हा कार्यक्रम सुरू होणार आहे.

****

शेतकऱ्यांना पीक कर्ज देणं, हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे याचं भान ठेवून बँकांनी काम करावं आणि कर्ज वाटप करताना संवेदनशीलता दाखवावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज मुंबईत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात खरीप हंगामाच्या पेरण्या सुरु झाल्या असून शेतकऱ्यांना बी-बियाणं आणि खतं घेण्यासाठी वित्तीय सहाय्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

‘कन्या वन समृद्धी योजने’ला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. आज झालेल्या बैठकीत, हा निर्णय घेण्यात आला. शेतकरी कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर, त्या कुटुंबाला दहा वृक्ष लावण्यासाठी शासनाकडून मदत देण्यात येणार असून, या वृक्षांपासून मिळणारं उत्पन्न त्या मुलीच्या शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी वापरलं जावं, अशी योजना आहे. ही योजना, नवीन फळबाग लागवड योजनेशी जोडण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

****

मराठा आरक्षणाबाबत जानेवारी २०१७ पासून सरकारनं काय केलं, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. मराठा आरक्षणाबाबत निश्चित काळात निर्णय घ्यावा, अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेच्या, आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा प्रश्न केला. या याचिकेची पुढची सुनावणी येत्या एकोणतीस तारखेला होणार आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात पीक कर्ज वाटपात हयगय केल्याप्रकरणी, राष्ट्रीयीकृत बँकांच्या, कळंब आणि वाशी तालुक्यांमधल्या सहा शाखांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय स्टेट बॅंकेच्या चार आणि महाराष्ट्र बँकेच्या दोन शाखांचा समावेश आहे. पीक कर्ज वाटपाच्या निर्धारित उद्दिष्टाच्या एक टक्क्याहून कमी कर्ज वाटप झाल्याची बाब, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये स्पष्ट झाल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी या शाखांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

****

औरंगाबाद पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या बावीस वर्षीय मुलीला नोकरीचं आमिष दाखवून, फेब्रुवारी ते जून या कालावधीत तिच्यावर कथितरीत्या वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी ही माहिती दिली.

****

जालन्याच्या नगर परिषदेनं, दिव्यांग व्यक्तींना तीन टक्के निधीचं वाटप करण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार, आज तीनशे पंच्याऐंशी दिव्यांग लाभार्थ्यांना एकूण आठ लाख सत्तेचाळीस हजार रुपये निधीचं वाटप केलं. यावेळी, प्रत्येकी बावीसशे रुपयांची रक्कम या दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली.

****

औरंगाबाद इथं मातंग समाजाच्या वतीनं आज विभागीय आयुक्त कार्यालयावर मातंग क्रांती मोर्चा काढण्यात आला. जामनेर इथल्या वाकुडी या गावात मातंग समाजातल्या मुलांना झालेल्या मारहाण प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करावी, या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्त डॉक्टर पुरूषोत्तम भापकर यांना देण्यात आलं.

****

No comments: