Sunday, 24 June 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 24.06.2018 - 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 June 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ जून २०१ सकाळी .५० मि.

****

·      स्वच्छ सर्वेक्षणात दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्राचा गौरव; राज्यातल्या २८ शहरांना विविध गटात पुरस्कार

·      राज्यात कालपासून प्लास्टिकबंदी लागू; अनेक शहरात व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

·      पीककर्ज वाटपाची गती वाढवण्याचे बँकांना आदेश द्यावे - मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

·      नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अपघातांच्या दोन घटनांत बारा जणांचा मृत्यू

आणि

·      मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी 

****

देशातल्या मोठ्या शहरांसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार स्वच्छ भारत आणि स्मार्ट शहरं अभियानासारख्या पाच योजनांवर काम करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. इंदौर इथं आयोजित शहरी विकास महोत्सवात विविध शहरी विकास प्रकल्पांचं उद्घाटन केल्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत ते काल बोलत होते.

स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात आलं. एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पहिल्या शंभर शहरांत, राज्यातल्या २८ शहरांनी स्थान मिळवलं आहे.

स्वच्छ राजधानी शहराचा मान मुंबईनं तर घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई शहराने बाजी मारली. याशिवाय, नागपूर, परभणी, भिवंडी, भुसावळ या शहरांसह, सातारा जिल्ह्यातलं पाचगणी, अमरावती जिल्ह्यातलं शेंदुर्जना घाट आणि पुणे जिल्ह्यातल्या सासवड शहराला विविध गटांत उत्तम कार्यासाठी पुरस्कार पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

****

दरम्यान, पंतप्रधान आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा ४५वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत दूध उत्पादनात महाराष्ट्रानं अव्वल क्रमांक पटकावला. काल नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना यासाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. नंदुरबार जिल्ह्यातल्या होळ इथले सुरेश पाटील हे देशभरातून ‘सर्वोत्कृष्ट शेतकरी’ पुरस्काराचे मानकरी ठरले, राधामोहन सिंग यांच्या हस्ते पाटील यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

****

राज्यात कालपासून प्लास्टिकबंदी लागू झाली. प्लास्टिक बंदी आदेशातल्या दंडाच्या रकमेत कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. उल्लंघन करण्याऱ्याला प्रथम पाच हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा १० हजार रुपये दंड, तर तिसऱ्यांदा नियमाचं उल्लंघन केल्यास २५ हजार रुपये दंड आणि तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

काल राज्यभरात ठिकठिकाणी व्यापारी तसंच दुकानांवर कारवाई करून लाखो रुपये दंड ठोठावण्यात आला. पुणे महापालिकेनं आठ हजार किलो, ठाणे महापालिकेनं दोन हजार पाचशे किलो, सोलापूर महापालिकेनं सहाशे किलो, नाशिक महापालिकेनं साडे तीनशे किलो तर लातूर महापालिकेनं शंभर किलो प्लास्टिक जप्त करून, या सर्व महापालिकांनी मिळून लाखो रुपये दंड वसूल केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

लातूर शहरात आज आणि उद्या विशेष मोहीम राबवण्यात येणार असून, प्‍लास्टिक आणि थर्माकोल शास्‍त्रोक्त पद्धतीनं विल्‍हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेच्‍या संकलन केंद्राकडे किंवा घंटागाडीकडे जमा करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

औरंगाबाद इथं बंदी असलेलं प्लास्टिक वितरित करणाऱ्या दुकानांवर कारवाईचा इशारा महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिला आहे. प्लास्टिक बंदीबाबतच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. प्लास्टिक बंदीची शहरात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

****

राज्य विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलैला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं हा कार्यक्रम जाहीर केला. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत पाच जुलैपर्यंत असून, सहा जुलैला अर्जांची छाननी होईल, नऊ जुलैपर्यंत अर्जमागे घेता येतील. या ११ सदस्यांचा कालावधी २७ जुलैला संपणार आहे.    

****

यंदाच्या खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटप प्रक्रियेची गती वाढवण्यासाठी बँकांना आदेश देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात मोसमी पाऊस सक्रीय झालेला असूनही बँकांकडून अतिशय संथ गतीने कर्ज वाटप होत असल्याच्या तक्रारी येत आहेत, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून, पीक कर्ज वाटपाला गती देण्यासाठी तातडीनं हस्तक्षेप करण्याची गरज व्यक्त केली.

****

हुतात्मा सैनिकांच्या पत्नीला दोन हेक्टर शेतीयोग्य जमीन देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे, आता सशस्त्र दलातल्या हुतात्मा सैनिकांच्या पत्नी अथवा कायदेशीर वारसालाही अशा स्वरुपाचा लाभ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल या बदलाला मान्यता दिली. या निर्णयामुळे वीरपत्नी हयात नसल्यास, कायदेशीर वारसाला लाभ मिळणार आहे. ही जमीन प्रदान करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील. ही जमीन देताना कुठल्याही प्रकारचं मूल्य आकारलं जाणार नाही.

****

गेल्या चार वर्षात सरकारनं केलेल्या विकास कामांमुळे भाजपला जनतेचं समर्थन मिळत असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते काल अहमदनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारनं गेल्या चार वर्षात भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्याचं सांगत, आरोग्य, शिक्षण, वीज पुरवठा, आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामाचा त्यांनी आढावा घेतला.

****

नाशिक जिल्ह्यात चांदवड ते पिंपळगाव दरम्यान शिरवाडे फाटा इथं एसटी बस आणि जीप मध्ये झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. काल सकाळी हा अपघात झाला. जखमींना तातडीनं नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

****

पालघर जिल्ह्यात वरई पुलाजवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एक जीप आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. चालकाचा ताबा सुटल्यानं, ही जीप दुभाजक तोडून विरुद्ध बाजूने जाणाऱ्या टेम्पोला धडकून हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यात कालही पावसानं सर्वदूर हजेरी लावली. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड, आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कयाधू, आसना नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काल दिवसभर झालेल्या पावसामुळं लोहगाव इथं ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात एक सोळा वर्षीय मुलगी वाहून गेली. तीन तासांच्या शोधमोहिमेनंतर या मुलीचा मृतदेह सापडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

परभणी जिल्ह्यातल्या मानवत, पाथरी, जिंतूर्, सेलू, पूर्णा या भागात पावसाची रिपरिप सुरू होती. जिंतूर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या पावसामुळे नद्या नाले खळाळून वाहत आहेत, काही ठिकाणी शेतात पाणी साचलं, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर जिल्ह्याच्याही अनेक भागात काल पाऊस झाला. औरंगाबाद इथं सुखना नदीला पूर आल्यानं, नारेगाव भागातल्या अनेक घरात पाणी शिरल्यानं, नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला.

दरम्यान, मुंबईसह राज्याच्या अनेक भागात काल पावसानं जोरदार हजेरी लावली. बुलडाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यात शेतात काम करणारी महिला अंगावर वीज पडून ठार झाली. अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगावसह नगर शहर आणि तालुक्यात काल संततधार पाऊस झाला. कोपरगाव तालुक्यात आनंदवाडी इथं सुमारे ७५ घरं पाण्याखाली गेली, अनेक जनावरं पाण्यात वाहून गेली, जवळपास सव्वाशे नागरिक आणि अनेक जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

नाशिक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी, अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असून, अनेक भागात खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे.

****

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. पालकमंत्र्यांनी काल प्रसिद्धी पत्रक जारी करून ही माहिती दिली. शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा रकमेची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेनं वेळेत विमा कंपनीला दिली नसल्यानं, पीकविमा मिळण्यात अडचणी येत असल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, लातूर भाजपच्या वतीनं काल जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करण्यात आलं, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

****

विज्ञान आणि साहित्य यांचा समन्वय साध्य करावा, अशी अपेक्षा प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केली आहे. काल बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं आठव्या ‘अंबाजोगाई साहित्य संमेलना’चं उद्घाटन करताना डॉ लहाने बोलत होते. संमेलनाध्यक्ष गणपत व्यास, साहित्य परिषदेचे अध्यक्ष अमर हबीब, आमदार संगीता ठोंबरे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रसिद्ध कवी दासू वैद्य, निशा चौसाळकर यांना मान्यवरांच्या हस्ते साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. संमेलनाचा आज समारोप होणार आहे.

****

No comments: