आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२२ जून २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
नागरी शासन व्यवस्थेत स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या प्रत्येक कृतीत
नागरिकांना केंद्रस्थानी ठेवायला हवं असं मत उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू
यांनी व्यक्त केलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन काल नायडू
यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत
होते. प्रकल्प आणि सेवांच्या आखणीत
नागरिकांचा सहभाग घेतला तर प्रकल्पांची अंमलबजावणी आणि सेवा पुरवठ्याचा
स्तर उंचावेल असं त्यांनी सांगितलं.
****
रायगड जिल्हयातल्या महड इथल्या विषबाधा प्रकरणात मृतांची
संख्या पाच झाली आहे. काल रात्री दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात
प्रसादातून शंभर जणांना विषबाधा झाली होती, त्यात तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला
होता. या प्रकरणी चौकशी सुरू असून, मुंबईतल्या न्यायवैद्यक पथकाच्या अहवालानंतर विषबाधा
कशामुळे झाली, हे स्पष्ट होईल.
****
बीड इथं एका तलाठ्याला तीनशे रुपयांची लाच घेतांना लाच
लुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंगेहाथ पकडलं. सातबारावरील बोजा कमी करुन ऑनलाईन उतारा
देण्यासाठी राजाभाऊ सानप या तलाठ्यानं लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी संबंधिताच्या
तक्रारीवरून काल सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
****
मराठवाड्यात काल सर्वदूर जोरदार पाऊस झाला, या पावसात
विभागात आठ जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. यामध्ये नांदेड जिल्ह्यात चार, उस्मानाबाद
जिल्ह्यात दोन तर लातूर जिल्ह्यातल्या दोघांचा समावेश आहे.
परभणी, हिंगोली, जालना तसंच औरंगाबाद इथं काल मेघगर्जनेसह
पाऊस झाला. औरंगाबाद इथं नाल्याच्या पुरात वाहून गेल्यानं, एका युवकाचा मृत्यू झाला.
चेतन चोपडे असं या युवकाचं नाव आहे, काल रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर पाणी साचल्यानं,
उघड्या नाल्यात पडून या युवकाचा मृत्यू झाला. अशा प्रकारची ही गेल्या दोन दिवसातली
दुसरी घटना आहे.
दरम्यान, औरंगाबाद इथं ऐतिहासिक पाणचक्कीजवळच्या महमूद
दरवाजाचे लाकडी दार आज सकाळी कोसळलं. सुदैवानं या घटनेत कोणी जखमी झालं नाही, मात्र
शाळकरी मुलं तसंच नोकरदार वर्गाचा यामुळे खोळंबा झाला.
//************//
No comments:
Post a Comment