Saturday, 30 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.06.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 June 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३०    जून २०१ सकाळी .५० मि.

****



v खरीप पिकांच्या हमीभावात किमान दीडपट वाढीची पंतप्रधानांची ग्वाही 

v माता मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्राचा देशभरातून दुसरा क्रमांक

v मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या टप्प्याला तुळजापुरातून प्रारंभ

 आणि

v टी ट्वेंटी मालिकेत भारताचा आयर्लंडवर दोन शून्यनं विजय; मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, किदम्बी श्रीकांत आणि पी.व्ही.सिंधू उपांत्य फेरीत दाखल

****



 खरीप पिकांच्या हमीभावात किमान दीडपट वाढीची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. महाराष्ट्रासह एकूण पाच ऊस उत्पादक राज्यांतल्या, ऊस उत्पादकांच्या शिष्टमंडळानं, काल नवी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. चालू वर्षासाठी उसाचा रास्त आणि किफायतशीर दर दोन आठवड्यात जाहीर होईल, आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात नक्कीच वाढ केली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. सध्या उसाचा रास्त आणि किफायतशीर दर प्रति क्विंटल २५५ रुपये असून, त्यात क्विंटलमागे वीस रुपयांनी वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांत एकूण थकबाकीपैकी चार हजार कोटी रुपये ऊस उत्पादकांना अदा करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

****



 आर्थिक दुर्बल तसंच मध्यम वर्गाला आधुनिक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी राज्य सरकारांच्या सहाय्यानं पायाभूत सुविधा निर्माण करत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. ते काल नवी दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्स-मध्ये ‘राष्ट्रीय वृद्धत्व केंद्रा’च्या कोनशीला समारंभात बोलत होते. ‘आयुष्मान भारत’ या सर्वात मोठया आरोग्य विमा योजनेअंतर्गत, देशातल्या प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळेल, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.

****



 ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सांधेबदल शस्त्रक्रिया मोहीम’ राबवण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. राज्यातली सगळी शासकीय रुग्णालयं, तसंच धर्मादाय विश्वस्त रुग्णालयांच्या माध्यमातून, दहा लाख गरजू रुग्णांवर या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

****



माता मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्रानं देशभरातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते राज्याला  पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. हा दर कमी करण्यात केरळ राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. पंप्रधान सुरक्षित मातृत्व अभियाना महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. या अभियानांच्या संकेतस्थळावर खासगी तसंच सरकारी डॉक्टराची नावं नोंदवावी लागतात. देशभरातू जवळपास पाच हजार डॉक्टरांनी इथं नावं नोंदवली असून, यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वाधिक सहाशे डॉक्टरांचा समावेश आहे.

****



 राज्यातल्या ९९ लाखांपेक्षा अधिक लोकांना अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ मिळणार असल्याचं, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं आहे. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाच्यावतीनं नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय परिषदेत ते काल बोलत होते. अन्य लाभार्थ्यांप्रमाणे वृद्धाश्रमांनाही स्वस्त दरात धान्य उपलब्ध करुन द्यावं अशी सूचना बापट यांनी यावेळी केली.

****



 चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यात १३ ओजस शाळा सुरु करण्यात येणार आहेत,  यासंदर्भात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबई इथं आढावा बैठक घेतली. शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय मानकाचं अध्ययन-अध्यापन व्हावं, यावर मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी भर द्यावा, असं आवाहन तावडे यांनी यावेळी केलं. येत्या चार जुलै पासून नागपूर इथं सुरु होणाऱ्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांच्याबरोबर संयुक्त बैठक घेऊन, यासंबंधी शाळांनी केलेल्या मागण्यांचा आढावा घेणार असल्याचं तावडे म्हणाले.

****



 शिर्डीच्या श्रीसाईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत तीन आठवड्यात आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शासनाला दिले आहेत. हिंदु जनजागृती समितीनं यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या विश्वस्तमंडळानं २०१५ सालच्या नाशिक कुंभमेळ्याच्या वेळी गर्दीच्या नियोजनासाठीचं साहित्य खरेदी करताना मोठ्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केला आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.



****



 मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं जागरण गोंधळानं सुरुवात झाली. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, शेतमालला भाव द्यावा, स्वामीनाथन आयोग लागू करावा, अट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करा, आदी मागण्यासाठी काल आंदोलकांनी तुळजापूर शहरातून मोर्चाही काढला. आतापर्यंत काढलेल्या अट्ठावन्न मोर्चांनंतर शासनानं काही मागण्या मान्य केल्या, मात्र त्यांची अंमलबजावणी अजूनही झाली नाही, शासनानं मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसह इतर सर्व मागण्यांबाबत निर्णय जाहीर करावेत, अशा  मागणीचं निवेदन उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.

****



 मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, भारताच्या किदम्बी श्रीकांत आणि पी.व्ही.सिंधूनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत चौथ्या मानांकीत श्रीकांतनं काल ऑस्ट्रेलियाच्या लिव्हर्डेज याचा 21-18, 21-14 असा पराभव केला. महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित सिंधूनं, उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या कॅरोलिन मरीन हिला 22-20, 21-19 असं नमवलं.  उपांत्य फेरीचे सामने आज होणार आहेत.

****



 क्रिकेट - आयर्लंड इथं काल झालेल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं आयर्लंडचा १४३ धावांनी  पराभव करत, दोन सामन्यांची ही मालिका दोन शून्यनं जिंकली आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करत, निर्धारित २० षटकांत चार बाद २१३ धावा केल्या, आयर्लंडचा संघ तेराव्या षटकांत अवघ्या ७० धावात तंबूत परतला.



 भारतीय संघ आता इंग्लंड दौऱ्यावर जात असून, या दौऱ्यात टी ट्वेंटी, एकदिवसीय तसंच कसोटी या तीनही प्रकारात प्रत्येकी तीन सामने होतील. पहिला टी ट्वेंटी सामना येत्या मंगळवारी खेळला जाईल.

****



 महाराष्ट्रातल्या एव्हरेस्टवीर विद्यार्थ्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या शौर्य अभियान दलाच्या पाच विद्यार्थ्यांनी, गेल्या महिन्यात सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केलं. पंतप्रधानांनी या मुलांचं अभिनंदन करत, भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

****



 पुढच्या महिन्यात साजऱ्या होत असलेल्या आषाढी यात्रेनिमित्त  राज्य परिवहन महामंळामार्फत तीन हजार ७८१ जादा बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार  आहेत.



 परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथं आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा परतीचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी दहा टक्के बस, आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन दिल्या जातील, असंही रावते यांनी सांगितलं. २३ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी एसटीचे सुमारे आठ हजार कर्मचारी आठवडाभर सेवा देणार आहेत.

****



 ‘एक रकमी परतफेड’ योजनेअंतर्गत बँकांनी सकारात्मक भूमिका घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यात मदत करावी, असं आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केलं आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दीड लाखाच्या मर्यादेपेक्षा नाममात्र जास्त कर्ज असलेलं शेतकऱ्यांचं कर्ज, बँकांनी आपल्या अधिकारात माफ केल्यास, ते पूर्ण कर्जमुक्त होतील, बँकांनी याबाबत विचार करावा, असं आवाहन रावते यांनी केलं आहे.

****



 येत्या पाच वर्षासाठी राज्य सरकार उद्योगस्नेही आणि रोजगाराभिमुख औद्योगिक धोरण राबवणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं नवीन औद्योगिक धोरणाविषयीच्या चर्चासत्रात बोलत होते. औद्योगिक क्षेत्रात यावर्षी आठ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक झाली असून या माध्यमातून २० लाख रोजगार निर्मिती झाल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या विविध औद्योगिक संघटनांनी या धोरणाविषयी आपले मुद्दे मांडले, तसंच आपल्या मागण्यांसंदर्भात उद्योगमंत्र्यांना निवेदन सादर केलं.

****

 लातूर इथं गंजगोलाई भागातली अतिक्रमणं काल हटवण्यात आली, शहरात सर्वच भागात नाल्यावर असलेलं अतिक्रमण हटवण्यात येणार असून, नागरिक तसंच व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावं, असं आवाहन लातूरचे मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे.

****



 अनुसूचित जाती जमातीच्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी काल बीड इथं भारतीय रिपब्लीकन पक्षाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

*****

***

No comments: