आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२१ जून २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
आंतरराष्ट्रीय योग दिवस आज सर्वत्र साजरा होत आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या सुरीनाम दौऱ्यावर आहेत, तिथं आयोजित योग दिन कार्यक्रमात
राष्ट्रपती कोविंद यांनी, सुरीनामचे राष्ट्रपती देसरी दलानो भुतर्शय यांच्यासह सहभाग
घेतला.
उत्तराखंडची
राजधानी देहरादून इथं योग दिनानिमित्त मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
राज्यातही आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वत्र साजरा झाला.
रत्नागिरी जिल्ह्यात अडीच लाख विद्यार्थी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक हजार ४४२ प्राथमिक आणि
२५० माध्यमिक शाळांमधले एक लाखावर विद्यार्थी तर सातारा जिल्ह्यात सुमारे ३० हजारावर
विद्यार्थी योग दिन कार्यक्रमात सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी शिवसेनेचे हिंगोली
जिल्हा प्रमुख संतोष बांगर आणि शिवसेनेचे नगरसेवक राम कदम यांच्या विरुद्ध हिंगोली
शहर पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या एका कर्मचाऱ्याची
बदली रद्द करा असं म्हणत महावितरणचे अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव यांना त्यांच्या कार्यालयात
अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचं या बाबतच्या तक्रारीत म्हटलं आहे.
****
महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध
कल्याणकारी योजनांची संपूर्ण माहिती देऊन, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील,
असं विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं, डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आणि विभागीय आयुक्त कार्यालय
यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या, “कॉलेज, नॉलेज, व्हिलेज” संकल्पनेच्या
तालुका, जिल्हा समन्वयक कार्यक्रम अधिकारी कार्यशाळेत ते बोलत होते.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अनुसूचित जाती आणि जमातीतल्या तसंच अंत्योदय
योजनेतल्या कुटुंबांसाठी मोफत गॅस जोडणी देण्याच्या योजनेचा, शुभारंभ काल कोरेगाव इथं, जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यापूर्वी
गॅस जोडणी न घेतलेल्या कुटुंबांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं
आवाहन शिंदे यांनी यावेळी बोलताना केलं.
*****
***
No comments:
Post a Comment