Friday, 22 June 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 22.06.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 June 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ जून २०१ सकाळी .५० मि.

****

·       मराठवाड्यात आठ जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू

·       युवकांना शेतीकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन धोरण अवलंबण्याची गरज - उपराष्ट्रपती

·       चौथा आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वत्र उत्साहात साजरा

आणि

·       खरीप हंगामासाठी वेळीच कर्ज पुरवठा न केल्यास कठोर भूमिका - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा इशारा

****

मराठवाड्यात काल सर्वदूर जोरदार पाऊस झाला, या पावसात विभागात आठ जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. वीज कोसळून सर्वाधिक चार बळी नांदेड जिल्ह्यात गेले असून, उस्मानाबाद जिल्ह्यात दोन तर लातूर जिल्ह्यात दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. उस्मानाबाद तालुक्यात वाणेवाडी शिवारात काल वीज पडून दोन महिला ठार तर तीन महिला जखमी झाल्या. जखमी महिलांवर तेर इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात मलकापूर इथं बहीण भावाचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर दोन महिला जखमी झाल्या. किनवट तसंच कंधार तालुक्यात आणि लातूर जिल्ह्यात जळकोट तसंच औसा तालुक्यात प्रत्येकी एकाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

विभागात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोलीसह बहुतांश भागात काल पावसानं जोरदार हजेरी लावली. औरंगाबाद इथं सखल भागात पाणी साचल्यानं, नागरिकांची तारांबळ उडाली, अनेक भागातला विद्युत पुरवठाही विस्कळीत झाला.

जालना जिल्ह्याच्या भोकरदन तसंच घनसावंगी तालुक्यात दमदार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं, पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती.

राज्यात रायगड, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

युवकांना कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन धोरण अवलंबण्याची गरज उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. पुणे इथं काल दोन दिवसीय राष्ट्रीय कृषी परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. संसद, नीति आयोग आणि माध्यमांनी कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे, असं सांगून उपराष्ट्रपतींनी, कृषी क्षेत्रातली उत्पादकता वाढवणं आणि विपणन प्रक्रियेत सुधारणा करण्यावर भर दिला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, कृषी क्षेत्रात सातत्य राखण्यासाठी आता हरित क्रांतीकडून सदाहरित क्रांतीकडे जाण्याची गरज व्यक्त केली.

****

चौथा आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वत्र उत्साहात साजरा झाला. या निमित्त डेहराडून इथल्या वन संशोधन संस्थेत आयोजित केलेल्या मुख्य समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. मुंबईत वांद्रे इथल्या योग उद्यानात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस ांनी तर राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी मुंबईत राजभवनाच्या समुद्रकिनारी योगाभ्यास केला.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर मुंबई विद्यापीठात योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले. केंद्र सरकारनं योगासाठी आंतरविद्यापीठ केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांताक्रूज इथल्या योग संस्थेत योगाभ्यास केला.

औरंगाबाद इथं योगदिनानिमित्त आयोजित सायकल फेरीला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यांनतर विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमात बागडे यांनी, योग हा आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्यानं, तो नियमितपणे करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. 

लातूर इथं आयोजित योग दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी, योग साधनेतून मानसिक कणखरपणा येऊन आरोग्य ही उत्तम रहातं, असं मत व्यक्त केलं. बीड इथं जिल्हा योग संघटना आणि पतंजली योग समितीच्या वतीनं जिल्हा क्रीडा संकुलावर कार्यक्रम घेण्यात आला.

जालन्यात योग दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित योग शिबिरात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. जिल्हा कारागृहातही कैद्यांनी योगसाधना केली.

नांदेड इथं गुरुद्वारा परिसरात गुरु ग्रंथसाहिब सभागृहात आयोजित कार्यक्रमात योग अभ्यासकांनी योगसाधना केली.

परभणी इथं जिल्हा क्रीडा संकुलावर तसंच हिंगोली जिल्ह्यात विविध शाळा महाविद्यालयात आयोजित योग साधना कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले.

उस्मानाबाद इथं जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना योग साधनेचे धडे देण्यात आले.

****

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक महाविद्यालयात आरक्षण न देण्यासंदर्भातल्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी म्हटलं आहे. काल मंत्रालयात विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेत ते बोलत होते.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

राज्यातल्या विकास मंडळांच्या अध्यक्षांच्या नेमणुकांची अधिसूचना जारी झाली आहे. मराठवाडा विकास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉक्टर भागवत कराड यांची तर विदर्भ विकास मंडळाच्या अध्यक्षपदी चैनसुख संचेती यांची नेमणूक झाली आहे.

उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ योगेश जाधव यांची नियुक्ती झाली आहे. तिन्ही विकास मंडळांचा कालावधी ३० एप्रिल २०२० पर्यंत वाढवण्यात आला आहे. अध्यक्षांनी पदभार स्वीकारलेल्या दिवसापासून हा आदेश लागू होईल, असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

****

राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वेळीच कर्ज पुरवठा केला नाही तर शासन कठोर भूमिका घेईल असा इशारा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिला आहे. त्या काल बीड इथं पीक कर्जासंबंधी आयोजित बैठकीत बोलत होत्या. कर्ज देण्याप्रती राष्ट्रीयकृत बँका उदासीन आहेत त्यामुळे वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु असं मुंडे यांनी यावेळी सांगितलं. अहमदनगर-बीड-परळी हा रेल्वे मार्ग वेळेतच पूर्ण होईल असं मुंडे यावेळी म्हणाल्या.

****

देशात भ्रष्टाचार, जातीयवाद बळावला आहे, मात्र सरकार नागरिकांना योग कराला सांगत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. औरंगाबाद इथं काल काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज्यातल्या ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे, पण प्रत्यक्षात दहा हजार कोटींची देखील कर्जमाफी मिळालेली नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

****

सरकारनं सगळ्या तेलबियाचं आयात शुल्क एकसारखं ३५ टक्के, क्रुड आणि रिफाईनचं ४५ टक्के असं केलं आहे.  त्यामुळे बाजारात तेलबियांचे दर सुधारतील असं मत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. यावर्षी सोयाबीनला जवळपास चार हजार २०० रूपयांपर्यंत भाव मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माध्यान्ह भोजन योजनेत विद्यार्थ्यांसाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर करण्याची तसंच गरीब देशांना दूधभुकटी निर्यात करण्याची शिफारस राज्य कृषी मूल्य आयोगानं केंद्र सरकारकडे केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

****

औरंगाबादच्या विश्व संवाद केंद्राच्यावतीनं दिले जाणा़रे  देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार काल जाहीर झाले. ज्येष्ठ पत्रकार गटाचा पुरस्कार औरंगाबाद आकाशवाणी केंद्राचे वृत्त विभाग प्रमुख रमेश जायभाये यांना, युवा पत्रकार पुरस्कार मनोज कुलकर्णी यांना तर ग्रामीण पत्रकारीतेसाठी नंदुरबार जिल्ह्यातले पत्रकार वेस्ता पाडवी यांना नारद पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्या वर्षीपासून दिला जाणारा महिला पत्रकार गटाचा पुरस्कार पूनम शर्मा यांना जाहीर झाला आहे. येत्या एक जुलै रोजी औरंगाबाद इथं हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत.

****

लातूर शहरात पाणी पुरवठ्याबाबतचं योग्य नियोजन करून तातडीनं प्रायोगिक स्तरांवर नळांना मीटर लावून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जलयुक्त लातूरच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे केली आहे. या पदाधिकाऱ्यांनी काल आयुक्तांची भेट घेऊन, ही मागणी केली.

****

बीड इथं एका तलाठ्याला तीनशे रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंगेहाथ पकडलं. सातबारावरील बोजा कमी करुन ऑनलाईन उतारा देण्यासाठी राजाभाऊ सानप या तलाठ्यानं लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी संबंधिताच्या तक्रारीवरून काल सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

****

सोलापूर जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पावसानं ओढ दिल्यानं, जिल्ह्यात आतापर्यंत फक्त चार टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. अक्कलकोट आणि मंगळवेढा तालुका वगळता इतर तालुक्यात पेरण्या ठप्प झाल्या असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

//***********//

No comments: