आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२ ० जून २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
जम्मू काश्मीर
मध्ये आज पासून राज्यपालांचं शासन लागू झालं आहे. या बाबतची शिफारस राज्यपाल एन. एन.
व्होरा यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कडे केली होती. सध्या परदेश दौऱ्यावर
असलेल्या राष्ट्रपतींनी ती मंजूर केली. काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा प्रश्न हाताळण्यात तसंच राज्यातली स्थिती
सुधारण्यात मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती अपयशी ठरल्याचं सांगत भारतीय जनता पक्षानं सरकारचा
पाठिंबा मागे घेतल्यानं मुफ्ती यांनी काल पदाचा राजीनामा दिला होता.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांशी नमो ॲपच्या माध्यमातून आज संवाद साधला.
शेतकरी हे अन्नदाता असूनही, त्यांना त्यांच्या नशीबावर सोडून देण्यात आलं होतं, मात्र
आता शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी
सांगितलं. बियाणां पासून उत्पादित शेतमालासाठी बाजारा पर्यंत, प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना
मदत करण्याच्या योजनेवर काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशभरातल्या अनेक शेतकऱ्यां
कडून त्यांच्या प्रगती बद्दल पंतप्रधानांनी या वेळी माहिती घेतली.
****
चेन्नईतल्या
एका विशेष न्यायालयानं, काळ्या धनाबाबतच्या तक्रारी संदर्भात, माजी केंद्रीय मंत्री
पी.चिदंबरम, त्यांच्या पत्नी, पुत्र आणि स्नुषा यांना येत्या पंचवीस तारखेला न्यायालया
समोर हजर होण्यासाठी समन्स जारी केलं आहे. या सर्वांच्या संयुक्त नावावर ब्रिटन मध्ये
असलेल्या सुमारे साडेपाच कोटी रुपये मूल्याच्या संपत्तीचा खुलासा न केल्यानं आयकर विभागानं
तक्रार दाखल केली आहे.
****
आंतरराष्ट्रीय
योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या उत्तराखंड मधल्या डेहराडून इथे होणार आहे. या कार्यक्रमाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्राचे
राज्यपाल कुलपती सी. विद्यासागर राव यांनी राज्यातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना
उद्या विद्यापीठांमध्ये तसेच संलग्न महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
करण्याच्या सूचना केल्या आहेत.
****
राज्य विधीमंडळाचं
पावसाळी अधिवेशन ४ जुलै ते २० जुलै या कालावधीत नागपूर इथं होणार आहे. विधीमंडळ कामकाज
सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली.
*****
***
No comments:
Post a Comment