आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२८ जून २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
देशातल्या सर्व सामान्य
नागरिकांना, विशेषतः आर्थिक दृष्ट्या मागास घटकांना सक्षम करण्याचं काम आपल्या सरकारच्या
सामाजिक सुरक्षा योजना करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं
आहे. या योजनांच्या लाभार्थ्यांशी नरेंद्र मोदी ऍपद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.
गरिबांना बँकाचे दरवाजे खुले करणं, लहान उद्योग आणि होतकरू उद्योजकांना भांडवल उपलब्ध
करून देणं आणि गरीब आणि वंचित घटकांना सामाजिक सुरक्षेच्या छत्राखाली आणणं या तीन पैलूंवर
सरकारनं भर दिला आहे, असं त्यांनी सांगितलं. 2014 मध्ये देशात केवळ 50 ते 52 टक्के
बँक खाती होती. आता हे प्रमाण 80 टक्यांपेक्षा जास्त झालं आहे, असं ते म्हणाले. ज्येष्ठ
नागरिकांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
****
जम्मू
आणि काश्मीर मधल्या वार्षिक अमरनाथ यात्रेची
आज पासून बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून सुरुवात होत आहे. यात्रेसाठी कडक
सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून तीन हजार यात्रेकरूंची पहिली तुकडी काल संध्याकाळी
बालताल आणि पहलगामच्या बेस कँपवर दाखल झाली.
दोन महिने चालणाऱ्या या यात्रेची सांगता 26 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेला होणार
आहे.
****
‘गुगल’या प्रसिद्ध सर्च इंजिननं गेल्या वर्षी
घेतलेल्या जागतिक सॉफ्टवेअर स्पर्धेत अंबाजोगाईचा आदित्य गिरी यशस्वी ठरला होता, त्याचा
काल अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथं ‘गुगल’चे संचालक क्रिस डिबोना यांच्या हस्ते
पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आदित्य हा अंबाजोगाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दत्तात्रय गिरी
यांचा मुलगा आहे.
****
शिक्षण महर्षीं वसंतराव काळे शिक्षण सेवा गौरव पुरस्कार
जाहीर झाले असून, लातूर जिल्ह्यातल्या २५ शिक्षकांना या पुरस्कारानं गौरविण्यात येणार
आहे. आमदार विक्रम काळे यांनी काल लातूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या
एक जुलै रोजी या पुरस्काराचं वितरण होणार आहे.
****
आयर्लंड मध्ये डब्लिन इथं झालेल्या टी ट्वेंटी क्रिकेट
सामन्यात भारतानं आयर्लंडचा ७६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं
२०८ धावा केल्या, मात्र आयर्लंडचा संघ निर्धारित वीस षटकांत नऊ गड्यांच्या मोबदल्यात
फक्त १३२ धावाच करू शकला. मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment