Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 30 June 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
स्वातंत्र्यानंतर
या वर्षी पहिल्यांदाच जवळपास एक लाख ७३ हजार भाविक हज यात्रेसाठी जाणार असल्याचं अल्पसंख्याक
व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितलं आहे. या मंत्रालयाच्या हज विभागाकडून
हजला जाणाऱ्या समन्वयकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते.
पहिल्यांदाच एक हजार तीनशेहून अधिक महिला एकट्यानं या यात्रेसाठी जात असल्याचंही नकवी
यांनी सांगितलं.
****
भारताचे
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आज मध्य प्रदेशमधल्या जबलपूरमध्ये धर्मशास्त्र राष्ट्रीय
विधी विद्यापीठाच्या इमारतीची कोनशीला बसवली. तसंच त्यांनी यावेळी डॉ.भीमराव आंबेडकर
दूरसंचार प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत विधी विद्यापीठाच्या तात्पुरत्या कॅम्पसचं उद्घाटनही
केलं. सरन्यायाधीश मिश्रा हे सध्या मध्य प्रदेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून उद्घाटनप्रसंगी
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद हे देखील यावेळी उपस्थित
होते.
****
राज्यातल्या
अन्नधान्य वितरण व्यवस्थेनं आधुनिकीकरणाचं धोरण स्विकारलं असून पीओएस मशिनद्वारे शिधापत्रिकाधारकांना
अन्नधान्य वितरण करण्यात येत आहे. या नव्या कार्यप्रणालीमुळं राज्यात १२ लाख बोगस शिधापत्रिका
रद्द करण्यात आल्या असून ३ लाख मेट्रिक टन धान्याची बचत झाली असल्याची माहिती राज्याचे
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना
दिली. हे बचत झालेलं धान्य ९९ लाख नागरिकांना वाटप करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या अन्नधान्य वितरण व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गिरीष बापट यांनी राज्यव्यापी
दौरा सुरू केला आहे. आज ते कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत.
राज्यात
अन्नधान्य वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरू असून ग्रामीण भागात शिधापत्रिकेवरील धान्य
वेळेवर उपलब्ध व्हावं यासाठी राज्य शासन हे धान्य थेट महामंडळाकडून खरेदी करत आहे.
तसंच धान्य साठवणाऱ्या गोदामांची संख्याही वाढवण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
दक्षिण
मुंबईच्या परिसरातील व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या आणि कलात्मक वास्तूंचा समावेश जागतिक
वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला आहे.
युनेस्कोच्या
जागतिक वारसा समितीच्या बहारिनमधील मनामा इथं आज झालेल्या ४२व्या परिषदेत ही घोषणा
करण्यात आली. यामुळे राज्यातल्या पाच वारसा स्थळांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश
होणार असून देशातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य
ठरले आहे. यापूर्वी अजिंठा, एलिफंटा, वेरुळ आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत
यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश आहे.
****
आर्थिक
कारवाई कृती दल अर्थात एफ ए टी एफ या जागतिक आर्थिक निरीक्षक संस्थेनं पाकिस्तानला
परिपूर्ती यादीमध्ये ठेवण्याच्या निर्णयाचं भारतानं स्वागत केलं आहे. पॅरीसमध्ये झालेल्या
संस्थेच्या वार्षिक बैठकीत ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. ज्या निर्भयपणे हाफीज सईदसारखे
दहशतवादी आणि जमात-उद दावासारख्या संस्था पाकिस्तानमध्ये कार्यरत आहे; ही बाब पाकिस्ताननं
दहशतवादाचा सामना करण्यासाठी दिलेल्या आश्वासनांच्या विपरीत असल्याचंही एफ ए टी एफनं
म्हटलं आहे.
****
विविध
क्षेत्रामध्ये असलेलं संख्याशास्त्राचं महत्व लक्षात घेता शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये
रूजू होताना मूलभूत सांख्यिकीचे प्रशिक्षण देणं महत्वाचं असल्याचं मत मराठवाडा विकास
मंडळाचे अपर आयुक्त डी.एम.मुगळीकर यांनी व्यक्त केलं आहे. अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयातर्फे
१२व्या राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्य औरंगाबाद इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत
होते. यावर्षीच्या सांख्यिकी दिनाच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना “कार्यालयीन
सांख्यिकीची गुणवत्ता हमी” ही होती.
****
पत्रकार
केदार प्रभुणे यांचं आज सकाळी कोल्हापूर इथं निधन झालं. ते ५० वर्षांचे होते. ते दैनिक
पुढारीचे सहयोगी संपादक होते. त्यांनी औरंगाबाद इथं दैनिक मराठवाडा, देवगिरी तरुण भारत
आणि लोकमतमध्ये काम केलं होतं.
****
परभणी
जिल्ह्यातल्या रमाई घरकुल योनजेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना समाविष्ट
न करणं तसंच पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टी भाग वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या
वतीनं आमदार डॉ.राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या कार्यालयास आज घेराव
आंदोलन करण्यात आलं. गोरगरीब जनतेला हक्काच्या घरापासून वंचित ठेवलं असून घरकुल योजनेचा
४५ कोटी रूपयांचा निधी पडून असल्याचा आरोप डॉ.पाटील यांनी यावेळी केला.
****
जळगाव जिल्ह्यातल्या वाकडी घटनेच्या निषेधार्त परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड
आणि सेलू तहसिल कार्यालयावर मातंग समाजाच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात आला. आपल्या
विविध मागण्याचं निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आलं. या मोर्चात समाज बांधव मोठ्या
संख्येनं सहभागी झाले.
****
धुळे
जिल्ह्याअंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रियेत धुळे जिल्हा परिषदेच्या ४७ शिक्षकांनी खोटी
माहिती भरुन संवर्ग एक आणि दोनचा लाभ घेतला आहे. अशा चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे
बदली करुन घेतलेल्या शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्याचे आदेश ग्रामविकास
विभागानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. अशा शिक्षकांच्या
कागदपत्रांची पडताळणी येत्या १३ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
****
No comments:
Post a Comment