Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 June 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जून २०१८ सकाळी ६.५० मि.
****
§
विद्यापीठ
अनुदान आयोग रद्द करून भारतीय उच्च शिक्षण आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव
§
बँकांनी
पीक कर्ज वाटप करताना संवेदनशीलता दाखवावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
§
कन्या
वन समृद्धी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
आणि
§
पीक
कर्ज वाटप हयगय प्रकरणी, उस्मानाबाद जिल्ह्यात सहा बँक शाखांविरोधात गुन्हे दाखल
****
विद्यापीठ अनुदान आयोग रद्द करून त्याऐवजी भारतीय
उच्च शिक्षण आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव काल
केंद्रीय मंत्रि मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला. त्या अंतर्गत केंद्रीय
मनुष्यबळ विकास मंत्रालयानं भारतीय उच्च शिक्षण आयोग कायदा २०१८ चा मसूदा जारी
करून त्यावर सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. हा उच्च शिक्षण आयोग, उच्च शिक्षणाचा
दर्जा सुधारण्यासाठी उपाय योजना करणार आहे.
केंद्रीय
आरोग्य सेवेतल्या ज्येष्ठ डॉक्टरांच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी या डॉक्टरांना वैद्यकीय
शिक्षण, सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांमध्ये सामावून घेता यावं या साठी केंद्रीय मंत्रिमंडळानं
मान्यता दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन कंपन्यांना इथेनॉल युक्त पेट्रोल वापराचा
पुनर्विचार करण्यासही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
ऑक्सिटॉसिन या औषधा वर सरकारनं निर्बंध घातले असून
या औषधाचा वापर आता फक्त नोंदणीकृत रुग्णालयांमधून करण्यात येणार आहे. येत्या एक जुलै
पासून हे निर्बंध लागू होणार आहे. कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स या एकाच
कंपनीला या औषधाचं उत्पादन करून नोंदणीकृत रुग्णालयांना थेट पुरवठा करण्याची परवानगी
आहे.
****
येत्या एक जुलै पासून
पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात कमी होतील, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र
प्रधान यांनी म्हटलं आहे. ते काल पाटणा इथं बोलत होते. ओपेक, या तेल उत्पादक देशांच्या
संघटनेनं कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या रविवार पासून
हे तेल बाजारात येईल, त्या नंतर दर कमी होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
****
किराणा
मालासाठी प्लास्टिक पिशवी वापरण्यास, सरकारनं सशर्त परवानागी दिली आहे. पाव किलोपासून
अधिक वजनाच्या किराणा मालासाठी प्लास्टिक पिशवी वापरता येईल, इतर खाद्यपदार्थ विक्रीसाठी
प्लास्टिक बंदी कायम असून, कॅरीबॅग वापरण्यास बंदी कायम असणार आहे.
****
बँकांनी कर्ज वाटप करताना
संवेदनशीलता दाखवावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत
विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. राज्यात खरीप हंगामाच्या
पेरण्या सुरु झाल्या असून शेतकऱ्यांना बी-बियाणं आणि खतं घेण्यासाठी वित्तीय सहाय्याची
आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
कन्या वन समृद्धी योजनेला
राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. काल झालेल्या बैठकीत, हा निर्णय
घेण्यात आला. शेतकरी कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर,
त्या कुटुंबाला दहा झाडं लावण्यासाठी शासनाकडून मदत देण्यात येणार असून, या झाडांपासून
मिळणारं उत्पन्न त्या मुलीच्या शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी वापरलं जावं, असा या योजनेचा
उद्देश आहे. ही योजना, नवीन फळबाग लागवड योजनेशी जोडण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका
अधिनियमात सुधारणा, नांदेड गुरुद्वारा व्यवस्थापन अधिनियमात सुधारणा, तसंच कुळवहिवाट
आणि शेतजमिनी संदर्भातल्या अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत
मंजुरी दिली.
****
मराठा आरक्षणा बाबत
जानेवारी २०१७ पासून सरकारनं काय केलं, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली
आहे. मराठा आरक्षणा बाबत निश्चित काळात
निर्णय घ्यावा, अशी मागणी करणाऱ्या
एका याचिकेच्या, काल झालेल्या
सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा प्रश्न
केला. या याचिकेची पुढची सुनावणी येत्या एकोणतीस तारखेला होणार
आहे.
****
पिकाला दीडपट हमीभाव
आणि दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदानाच्या मागणी साठी उद्या २९ जूनला पुण्यात स्वाभिमानी
शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काल अहमदनगर
इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ऊसाला रास्त आणि किफायतशीर दर तसंच कर्जमाफी योजनेवरून
शेट्टी यांनी सरकारवर टीका केली.
****
दहावी आणि बारावी पुरवणी
परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. येत्या १७ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान दहावीची
तर १७ ऑगस्ट ते ४ जुलै दरम्यान बारावीची पुरवणी परीक्षा होईल. या परीक्षांचं वेळापत्रक
मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
अस्मितादर्श चळवळीचे
जनक, प्रसिद्ध लेखक, दिवंगत डॉक्टर गंगाधर पानतावणे यांना शासनानं जाहीर केलेला पद्मश्री
पुरस्कार, काल औरंगाबाद इथं पानतावणे यांच्या कुटुंबीयांना सन्मान पूर्वक सुपूर्द करण्यात आला. विभागीय
आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते, डॉ.पानतावणे यांच्या कन्या नंदिता आणि निवेदिता
यांनी हा पुरस्कार स्वीकारला. डॉ.पानतावणे प्रकृती अस्वास्थ्यामुळे पद्म पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित
राहू शकले नव्हते आणि त्यानंतर २७ मार्चला त्यांचं निधन झालं.
दरम्यान, पानतावणे यांच्या
स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज, त्यांच्या जन्मदिनी औरंगाबाद इथं, अस्मितादर्श अर्धशतकपूर्ती
समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात
सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात
पीक कर्ज वाटपात हयगय केल्या प्रकरणी, राष्ट्रीयीकृत बँकांच्या, कळंब आणि वाशी तालुक्यांमधल्या
सहा शाखांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय
स्टेट बॅंकेच्या चार आणि महाराष्ट्र बँकेच्या
दोन शाखांचा समावेश आहे. पीक कर्ज वाटपाच्या निर्धारित उद्दिष्टाच्या एक टक्क्याहून
कमी कर्ज वाटप झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, यांनी गुन्हे
दाखल करण्याचे आदेश दिले होते.
****
औरंगाबाद इथले पोलिस
उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका
महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या बावीस वर्षीय मुलीला नोकरीचं आमिष दाखवून, फेब्रुवारी ते जून या कालावधीत
तिच्यावर कथितरीत्या वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
****
लातूर मधली कायदा, आणि
सुवस्था ढासळली असल्याचा आरोप आमदार अमित देशमुख यांनी केला आहे. लातूर इथं खासगी शिकवणी
संचालक अविनाश चव्हाण यांच्या नुकत्याच झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर ते काल बोलत
होते.
दरम्यान, या प्रकरणी
अटकेत असलेल्या पाच आरोपींना ३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
प्लास्टिक बंदीनंतर
उद्भवलेल्या प्रश्नांबाबत व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात द्याव्यात, या
समस्या सरकारकडे मांडण्यात येतील, अशी ग्वाही परभणीच्या महापौर मीना वरपूडकर यांनी
दिली आहे. त्या काल व्यापाऱ्यांच्या बैठकीत बोलत होत्या.
****
जालना इथं प्लास्टिक
पिशव्यांचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून काल ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात
आला. नगरपालिकेत प्लास्टिक बॅग घेऊन आलेल्या एका व्यक्तीला पाच हजार रुपये दंड करण्यात
आला.
****
तेरणा सहकारी साखर कारखाना
लवकरात लवकर सुरू करावा, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तत्काळ द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेच्या उस्मानाबाद जिल्हा
शाखेनं काल ढोकी इथं रस्ता रोको आंदोलन केलं. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे या
मार्गावर वाहतुक विस्कळीत झाली होती.
****
वटपौर्णिमेचा सण काल
सर्वत्र उत्साहात साजरा झाला. महिला वर्गानं पारंपरिक पद्धतीनं वडाची पूजा केली, परभणी
इथं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य मेघना बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून
जिल्ह्यात विविध गावशिवारात वडाची रोपटी लावण्यात आली. उस्मानाबाद इथं, आर्य चाणक्य विद्यालयातल्या शिक्षिकांनी शाळेच्या मैदानावर वडाची
रोपं लावून वटपौर्णिमा साजरी केली.
*****
***
No comments:
Post a Comment