Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 29 June 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
आर्थिक
दुर्बलांना सहजगत्या न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी
व्यक्त केली आहे. कानपूर उच्च न्यायालयातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आज लोक
अदालतसारखे न्यायिक प्रणालीचे पर्याय अधिक बळकट करण्याची आवश्यकता व्यक्त केली. आर्थिक
दुर्बल घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी न्यायिक प्रणालीची मदत घेण्याचं टाळण्याच्या
मानसिकतेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. दीर्घ काळापासून प्रलंबित प्रकरणं निकाली
निघावी या करता वकिलांनी न्यायालयांना सहकार्य करावं, असं प्रतिपादन राष्ट्रपतींनी
केलं.
****
स्विस
बँकांमध्ये जमा करण्यात आलेल्या, भारतीयांच्या संपत्तीबाबत या वर्षाच्या अखेरपर्यंत
माहिती घेण्यात येईल, असं केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी
बोलताना सांगितलं. हे काळं धन आहे का अवैध आर्थिक व्यवहार याचा तपास करण्यात येणार
असल्याचं त्यांनी म्हटलं. भारतीयांच्या, स्विस बँकांमध्ये जमा होणाऱ्या संपत्तीत वाढ
झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर गोयल यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात काही अयोग्य
बाबी आढळल्यास सरकार योग्य ती कारवाई करेल, असंही गोयल यांनी स्पष्ट केलं. डॉलरच्या
तुलनेत रुपयाच्या घसरत असलेल्या किंमतीबाबत आंतरराष्ट्रीय कारणं लक्षात घेऊन योग्य
ती उपाययोजना केली जाईल, असंही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
‘एक
रकमी परतफेड’ योजनेअंतर्गत बँकांनी सकारात्मक भूमिका घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना
कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यात मदत करावी, असं आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी
केलं आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या कर्जमुक्ती आणि कर्ज उपलब्धता,
याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बँकांनी त्यांच्या अधिकारात, दीड लाखांहून थोडंसंच
जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं, दीड लाखाच्या वरच्या रकमेचं कर्ज माफ केल्यास त्या
शेतकऱ्यांना शासनाकडून दीड लाख रुपयांची कर्जमाफी मिळेल, आणि ते पूर्ण कर्जमुक्त होतील,
असं सांगत, बँकांनी याबाबत विचार करावा, असं रावते यांनी म्हटलं आहे.
****
मराठा
क्रांती मोर्चा आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
तुळजापुर इथं झाली. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं यावेळी जागरण गोंधळानं आंदोलनाची
सुरुवात कऱण्यात आली. यानंतर उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं.
आतापर्यंत या आंदोलकांद्वारे काढण्यात आलेल्या अट्ठावन्न मोर्चांनंतर शासनानं काही
मागण्या मान्य केल्या मात्र त्यांची अंमलबजावणी अजूनही झाली नाही, आता शासनानं मराठा
आरक्षणाच्या मुख्य मागणीसह इतर सर्व मागण्यांबाबत निर्णय जाहीर करावेत, अशी मागणी आंदोलकांनी
या निवेदनाद्वारे केली आहे.
****
नागपूर-मुंबई
समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात येणार असलेल्या सात हजार दोनशे नव्वद हेक्टर
जमिनीपैकी सहा हजार सत्तावन्न हेक्टर जमिनीचं संपादन आतापर्यंत झालं आहे. सरळ खरेदीद्वारे एक हजार हेक्टर जमीन खरेदी करून
बुलडाणा जिल्ह्यानं जमीनसंपादनात राज्यात पहिलं स्थान पटकावलं असून, या जिल्ह्यात आता
फक्त एकशे छत्तीस हेक्टर जमिनीचं संपादन बाकी असल्याची, तसंच औरंगाबाद जिल्हा जमीन
संपादनात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष
डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली आहे.
****
शिर्डीच्या
श्रीसाईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत तीन
आठवड्यात आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं
शासनाला दिले आहेत. हिंदु जनजागृती समितीनं यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या विश्वस्तमंडळानं
२०१५ सालच्या नाशिक कुंभमेळ्याच्या वेळी गर्दीच्या नियोजनासाठीचं साहित्य खरेदी करताना
मोठ्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केला आहे.
****
महाराष्ट्राच्या
आदिवासी विकास विभागाच्या शौर्य अभियान पथकाच्या दहा विद्यार्थ्यांनी आज पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दलाच्या पाच विद्यार्थ्यांनी नुकतंच सर्वोच्च माऊंट
एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे. पंतप्रधानांनी या मुलांचं अभिनंदन केलं असून, पुढच्या
वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment