Friday, 22 June 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 22.06.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 June 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जून २०१ दुपारी १.०० वा.

****

देशाचा विकास दर दोन अंकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज वाणिज्य मंत्रालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे व्यापारात कायापालट होत असल्याचं सांगून, जीएसटीमुळे ५४ लाख नवीन करदात्यांची नोंदणी झाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. आंतरराष्ट्रीय बाजारात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी नवीन उद्योगांची निर्मिती करणं आवश्यक आहे, मंत्रालयांनी मिळून काम केलं तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात, असंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. 

****

देशाची भिन्न भौगोलिक स्थिती आणि मध्यमवर्गाच्या आशाआकांक्षा बघता भारताचा विकासदर कायम दोन अंकी राहणं शक्य आहे, असा विश्वास प्रभारी केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी यांनी व्यक्त केला आहे. भारत ब्रिटन नेतृत्व परिषदेत ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. सरकार करत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचा दर दोन अंकी गाठण्यासाठी मदत मिळेल, असं त्यांनी नमूद केलं.   

****

जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. एका इमारतीत काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर, आज पहाटेच्या सुमारास ही चकमक सुरू झाली, यामध्ये घरमालकासह एका पोलिसाचाही मृत्यू झाला. मारले गेलेले दहशतवादी इस्लामिक स्टेट जम्मू ॲण्ड काश्मीर या संघटनेचे असून, कारवाई पूर्ण झाली असल्याचं, पोलिस महासंचालक एस पी वैद यांनी सांगितलं.

****

जम्मू-कश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोहरा यांनी आज सायंकाळी श्रीनगरमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. जम्मू-कश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीवर या बैठकीत चर्चा केली जाईल. राजपत्राच्या अधिसूचनेनुसार राज्यपाल राजवट समाप्त होईपर्यंत जम्मू-कश्मीर विधानसभा निलंबित राहील, या विधानसभेचा सहा वर्षांचा कार्यकाळ २०२१ ला संपणार आहे.

****

अल कायदा आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक ‍अ‍ॅण्ड सीरिया - इसिस या दहशतवादी संघटनांशी संलग्न भारतातल्या दहशतवादी संघटनांवर बेकादेशीर कारवाई प्रतिबंधक कायद्यान्वये केंद्रीय गृहमंत्रालयानं बंदी घातली आहे. या दोन्ही दहशतवादी संघटनांशी संबंधित गट देशातल्या युवकांचा जागतिक जिहादसाठी प्रवृत्त करत असून, हे युवक भारतीय उपखंडातल्या भारताच्या हिताविरुद्ध कृती करत असल्याचं गृहमंत्रालयाच्या अधिकृत आदेशात म्हटलं आहे.

****

एटीएम अधिक सुरक्षित करण्यासाठी अद्ययावत करा अन्यथा कारवाईला सामोरं जा असा कडक इशारा भारतीय रिर्व्ह बँकेनं सर्व बँकांना दिला आहे. एटीएममध्ये अद्ययावत सुरक्षा यंत्रणा बसवण्याविषयी बँकांकडून होत असलेल्या दिरंगाईच्या पार्श्वभूमीवर हा इशारा दिला आहे. यासंदर्भात रिर्व्ह बँकेनं आखून दिलेल्या कालमर्यादेनुसार येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत बँकांनी एटीएमच्या सुरक्षेसंदर्भात ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. तसंच पुढल्या वर्षीच्या जूनअखेर पर्यंत देशभरातले सगळे एटीएम टप्याटप्यानं अद्ययावत करण्याची मुदत देण्यात आलेली आहे.

****

राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयानं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, सरकारी शाळांमधल्या शिक्षकांना आता पुरस्कारासाठी थेट प्रवेशिका पाठवता येईल. यापूर्वी या प्रवेशिका राज्य सरकारकडून निवडल्या जात असत. यापुढे या पुरस्काराचे अर्ज एका ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून स्वीकारले जाणार असून हे पोर्टल भारतीय प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालयानं विकसित केलं आहे.

****

राज्य सरकारनं राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. राज्यमंत्री पदाचे सर्व नियम, सुविधा, निवासस्थान त्यांना लागू असेल, असं या निर्णयात म्हटलं आहे.

****

पीककर्ज वितरणासाठी बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी पांगरी हे गाव दत्तक घेतलं आहे. डांगे यांनी या गावात जाऊन कर्जमाफीची यादी प्रसिद्ध केली. या गावातला एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नसल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. कर्जासंबंधी बॅंकांकडे पाठपुरावा करण्यासाठी ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आली असून, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी संबंधित तालुक्यातले पाच गावं दत्तक घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

//**********//


No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...