Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 June 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जून २०१८ सकाळी ६.५० मि.
****
·
राज्यात सार्वजनिक वाहतुकीसाठी
पर्यावरणपूरक इंधन वापरणार - मुख्यमंत्री
·
एक हजार गावांच्या विकासासाठी राज्य शासनाचे विविध
कंपन्यांसोबत ६१ सामंजस्य करार
·
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला दोन तर लोकभारती आणि भाजपला प्रत्येकी
एक जागा
·
अस्मितादर्श नियतकालिकाचा अर्धशतकपूर्ती सोहळा साजरा
आणि
·
लातूर इथं सोयापार्क
तर उस्मानाबाद इथं फटाका क्लस्टर उभारणार - उद्योगमंत्र्यांची घोषणा
****
पर्यावरण संवर्धनाकरिता
राज्यात सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन वापरलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाच्या कार्यक्रमप्रसंगी
ते काल मुंबईत बोलत होते. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी उपस्थित होते. राज्यात येत्या
चार ते पाच वर्षात जवळपास ३० जिल्ह्यात सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नैसर्गिक वायू वाटप
केंद्र सुरु केले जाणार असल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. राज्यात सध्या नऊ
ठिकाणी अशी केंद्रं आहेत. पुढच्या टप्प्यात औरंगाबाद, लातूर, उस्मानाबादसह आणखी नऊ ठिकाणी ही
केंद्र सुरू केली जाणार असल्याची माहिती प्रधान यांनी दिली.
****
राज्यातील एक हजार गावांचा विकास करण्यासाठी काल राज्य
शासनानं विविध सामाजिक संस्था, कंपन्यांसोबत ६१ सामंजस्य करार केले. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यावेळी उपस्थित होते. यावेळी बारा संस्थांना उद्देश पत्रंही देण्यात आली. शासनाची
व्यापकता आणि संस्थांचं कौशल्य यांच्या सहयोगानं राज्यात महापरिवर्तन घडून येणार असल्याचं
मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात एक हजार मॉडेल गावं तयार करणार असून या गावांमध्ये देशातील
सर्वोत्तम सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आरोग्य बँक उपक्रमाचं लोकार्पण करण्यात आलं.
****
विधान
परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं दोन जागांवर विजय मिळवला, तर
लोकभारती आणि भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली. मुंबई पदवीधर मतदार संघातून शिवसेनेचे
उमेदवार विलास पोतनीस यांनी तर मुंबई शिक्षक मतदार संघातून लोकभारतीचे कपिल पाटील यांनी
विजय मिळवला. नाशिक शिक्षक मतदार संघातून शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे विजयी
झाले. तर कोकण पदवीधर मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे यांनी विजय
मिळवला आहे.
****
मुंबईत काल एक खासगी विमान कोसळून पाच जण
मृत्यूमुखी पडले. मृतांमध्ये वैमानिक, सह वैमानिक, दोन
अभियंता तसंच एका पादचाऱ्याचा समावेश आहे. जुहू विमानतळावरून चाचणी उड्डाण
घेतल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास घाटकोपर भागात हे विमान कोसळलं. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. हवाई वाहतुक मंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताच्या
चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांत राज्यात झालेला हा दुसरा विमान अपघात आहे.
****
डॉ. नरेंद्र दाभोलकर तसंच कॉ.गोविंद
पानसरे हत्या प्रकरणाचा तपास असमाधानकारक असल्याचं मत, मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त
केलं आहे. या प्रकरणी काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, केंद्रीय गुन्हे अन्वेषण
- सीबीआय आणि राज्य पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून या हत्येचा तपास गांभीर्यानं केला
जात नसल्याचं नमूद केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या १२ जुलैला होणार असून, सीबीआयचे
सहसंचालक तसंच राज्याचे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी पुढील सुनावणीच्या
वेळी हजर राहण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.
****
राज्यात एक जुलै ते ३१ जुलै दरम्यान राबवल्या जात असलेल्या १३
कोटी वृक्षलागवड योजनेत नागरिकांना सवलतीच्या दरात रोपं उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
नऊ महिने वाढ झालेलं लहान पिशवीतलं रोप, ८ रुपयांना तर १८ महिने वाढ झालेलं मोठ्या पिशवीतील रोप, ४० रुपये
दरानं उपलब्ध असेल.
****
अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात मन्याळे इथं जिल्हा
परिषदेच्या प्राथमिक शाळेनं २५ हजार झाडं लावली आहेत. उन्हाळी सुटीत विद्यार्थ्यांनी
जमा केलेल्या सुबाभूळ, बोर, चिंच, यासारख्या विविध जातींच्या झाडांच्या बियांचं जवळच
असलेल्या डोंगरावर रोपण करण्यात आलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
डॉ. गंगाधर पानतावणे यांनी आयुष्यभर आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचं कार्य केलं,
असं केंद्रीय
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
अस्मितादर्श नियतकालिकाच्या अर्धशतकपूर्ती निमित्त काल औरंगाबाद इथं आयोजित समारंभाचं उद्घाटन,
आठवले यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
औरंगाबाद इथं पानतावणे यांचं स्मारक उभारण्यासाठी तसंच पानतावणे यांच्या
नावानं शासनाचा पुरस्कार सुरू करण्यासाठी, प्रयत्न करणार असल्याचं
आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. डॉ.गंगाधर पानतावणे यांच्या नावाने सुरू करण्यात
आलेल्या संकेत स्थळाचं लोकापर्णही यावेळी आठवले यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर मुळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष
श्रीपाद जोशी, पूर्वाध्यक्ष श्रीपाल सबनीस, अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्यासह अनेक मान्यवर
यावेळी उपस्थित होते.
अस्मितादर्श नियतकालीकाच्या माध्यमातून पानतावणे यांनी, समाजाला जाती धर्माच्या पलीकडे घेऊन जाण्याचं
कार्य केलं, असं मत श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केलं.
पानतावणे यांच्या साहित्यावर परिसंवाद,
तसंच निमंत्रितांचं कविसंमेलनही यावेळी घेण्यात आलं.
****
अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायदा ॲट्रोसिटी कायद्याच्या संरक्षणासाठी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. ते काल औरंगाबाद इथं बोलत होते. राज्यात
शिवसेना-भाजपनं एकत्रित निवडणूका लढवल्या पाहिजे असं मत, त्यांनी व्यक्त केलं.
****
विधानसभेच्या आगामी निवडणुकीत स्वबळावरच बहुमत मिळवू,
असा विश्वास पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे. ते काल जालन्यात आयोजित शिवसेना कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात बोलत होते.
भाजपाने शिवसेनेचं बोट धरून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केल्याचं सांगत कदम यांनी
भाजपच्या राजकीय धोरणांवर टीका केली.
दरम्यान, प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन
केलं. जनतेने हा निर्णय सकारात्मक स्वीकारला असून, याचं श्रेय युवासेना प्रमुख आदित्य
ठाकरे यांना जातं, असंही त्यांनी नमूद केलं.
****
जालना जिल्ह्यात बँकाकडून शेतकऱ्यांना
दिल्या जाणाऱ्या पीककर्ज वाटपाबद्दल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नाराजी व्यक्त
केली आहे. पीककर्ज वाटपाचा आढावा आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसंदर्भात
जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते काल बोलत होते. बँकांनी सकारात्मक
दृष्टीकोन ठेऊन शेतकऱ्यांना प्राधान्यानं पीककर्जाच वाटप करण्याचे निर्देश त्यांनी
यावेळी दिले.
****
लातूर जिल्ह्यात सोयापार्क
तर उस्मानाबाद जिल्ह्यात फटाका क्लस्टर सुरु केलं जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री
सुभाष देसाई यांनी दिली आहे. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उद्योजकांसमवेत लातूर
इथं आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. या मुळे या दोन्ही जिल्ह्यात कृषी तसंच औद्योगिक विकासाला
चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
हिंगोली जिल्ह्याच्या
औंढा तालुक्यातून जिल्हा कृषी विभागाच्या पथकानं अप्रमाणीत खताची ३६१ पोती जप्त केली
आहेत. जवळा बाजार इथल्या क्रांती कृषी सेवा केंद्र तसंच मुसळे कृषीसेवा केंद्रावर ही
कारवाई करण्यात आली.
****
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या
लघू पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंत्याला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काल निलंबित
केलं आहे. जलयुक्त शिवारच्या कामात हयगय केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
****
राज्यात लवकरच सहा नवीन
खुले कारागृह उभारण्यात येणार आहेत. लातूरसह धुळे, वर्धा, यवतमाळ, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी
इथं ही कारागृह उभारली जाणार आहेत. सध्या राज्यात अशी १३ कारागृह आहेत.
****
मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, पी.व्ही.सिंधू
आणि किदम्बी श्रीकांत यांनी
काल आपापले पहिल्या फेरीचे एकेरी सामने
जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, सायना नेहवालचं या स्पर्धेतलं आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं.
****
नेदरलँड मध्ये सुरु असलेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत,
भारत आणि बेल्जियम संघात काल झालेला सामना एक एक असा बरोबरीत सुटला. साखळी फेरीतला
भारताचा पाचवा आणि शेवटचा सामना यजमान नेदरलँड सोबत होणार असून, सध्या सात गुण मिळवून
भारत गटात दुसऱ्या स्थानावर आहे.
//**********//
No comments:
Post a Comment