Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 June 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जून २०१८ सकाळी ६.५० मि.
****
v राज्यात प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची आजपासून
अंमलबजावणी
v प्रयोगशाळेतलं तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणाची
गरज - उपराष्ट्रपती
v साहित्य अकादमीचे २०१८ साठीचे पुरस्कार जाहीर
v मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात कालही जोरदार पाऊस
आणि
v तुळजापूरच्या नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांचं नगराध्यक्षपद
रद्द
****
राज्यात प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची आजपासून
अंमलबजावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काल मुंबईत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी
अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत प्लास्टिकची उत्पादनं तयार करणाऱ्या कारखान्यांवर
तातडीनं धाडी टाकून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
विनापरवाना प्लास्टिक
उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि कारखान्यांवर गुन्हे दाखल करुन अशा कंपन्या सील कराव्या, तसंच प्रत्येक जिल्ह्यात प्लास्टिक
बंदीची कशा प्रकारे जनजागृती केली, याचा आढावा घेण्याचे निर्देश कदम यांनी यावेळी दिले.
दरम्यान, बंदी घालण्यात
आलेल्या प्लास्टिक वस्तू आणि कचऱ्यांचं संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट लावण्या साठी यंत्रणा
उभारण्याचे निर्देश राज्यातल्या सर्व स्थानिक प्रशासनांना देण्यात आले असल्याचं राज्य
सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं.
राज्यात प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीचा आदेश सरकारनं २३ मार्च रोजी जारी केला होता.
****
शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन,
पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि विमा क्षेत्रांना बळकट करून प्रयोग शाळेतलं तंत्रज्ञान
शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पोहोचवणाची गरज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त
केली आहे. पुणे इथल्या वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थे मध्ये कृषी
क्षेत्र शाश्वत आणि फायदेशीर या विषयावर घेण्यात
आलेल्या राष्ट्रीय चर्चा सत्राचं उद्दाटन करतांना ते काल बोलत होते. शेती व्यवहार्य,
फायदेशीर आणि शाश्वत बनवण्यासाठी बहु स्तरीय धोरण आखण्याची गरज असल्याचं नायडू म्हणाले.
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्यासह
अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, नायडू यांनी बारामती कृषी विज्ञान
केंद्र आणि विद्या प्रतिष्ठानला काल भेट दिली. कृषी, विज्ञान, शिक्षण क्षेत्रात बारामतीनं
घेतलेली झेप कौतुकास्पद असून, इथलं कृषी विज्ञान केंद्र हे देशातल्या सर्व कृषी विज्ञान
केंद्रा साठी आदर्श असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले.
****
विद्यापीठात
समाजोपयोगी संशोधन व्हावं असं मत मानव संसाधन विकास, जल संसाधन, नदी विकास आणि गंगा
संरक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ.सत्यपाल सिंग यांनी व्यक्त केलं आहे. पुणे इथं
काल भारती अभिमत
विद्यापीठाच्या १९ व्या पदवीप्रदान समारंभात
ते बोलत होते. पी.एचडी. संपादन करणाऱ्यांची संख्या भारतात अधिक आहे, मात्र संशोधनाची
गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे, उच्च शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यां
पर्यंत नेण्यासाठी खासगी विद्यापीठं महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असं ते म्हणाले.
****
विद्यार्थ्यांच्या पालकांचं वार्षिक
उत्पन्न आठ लाख रूपयां पेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यां कडून निश्चित शिक्षण शुल्काच्या
केवळ पन्नास टक्केच रक्कम घेण्याचे निर्देश राज्यातल्या सर्व संबंधित शिक्षण संस्थांना
शासनानं दिले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजने अंतर्गत, कृषी,
वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमा साठी प्रवेश घेणाऱ्या अशा विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्काची
५० टक्के रक्कम, राज्य
शासना कडून देण्यात येते. ५० टक्क्यां
पेक्षा अधिक शुल्क आकारणाऱ्या शिक्षण संस्थांवर कडक कारवाई करण्याच्या
सूचना विभागानं तंत्र शिक्षण संचालकांना दिल्या आहेत.
****
ऊसाची रास्त आणि किफायतशीर दराची
रक्कम येत्या १५ दिवसात दिली नाही तर संबंधित साखर कारखान्यांची साखर जप्त करण्याचा
इशारा राज्य साखर आयुक्त संभाजी कडू यांनी दिला आहे. ते काल कोल्हापूर इथं बोलत होते.
नुकत्याच संपलेल्या ऊस गळित हंगामात राज्यातल्या
एकूण ११८ साखर कारखान्यांनी ही रक्कम थकवली आहे. जवळपास १ हजार कोटी रुपये एवढी ही
थकबाकी असून या सर्व साखर कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली असल्याचं साखर आयुक्तांनी
सांगितलं.
****
काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे
प्रभारी म्हणून लोक सभेतले पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती करण्यात आली
आहे. जे डी सिलम आणि महेंद्र जोशी यांना पक्षाचे सरचिटणीस आणि शशिकांत शर्मा यांना
सह सरचिटणीस म्हणून नियुक्त केलं आहे.
****
विधान परिषदेच्या नव निर्वाचित पाच सदस्यांना सभापती
रामराजे नाईक- निंबाळकर यांनी काल सदस्यत्वाची शपथ दिली. यामध्ये उद्योग राज्यमंत्री
प्रविण पोटे- पाटील, सुरेश धस, रामदास आंबटकर, नरेंद्र दराडे, विप्लव बाजोरिया यांचा
समावेश आहे.
****
राज्यातल्या
कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिनी नद्या आणि महानदी खोऱ्यांच्या एकात्मिक
राज्य जल आराखड्यास काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
राज्य जल परिषदेच्या पाचव्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातल्या सर्वच खोऱ्यांच्या
एकत्रित एकात्मिक जल आराखड्याचं काम येत्या १५ जुलै पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नदी - खोऱ्यांचे आराखडे तयार करणारं महाराष्ट्र हे देशातलं
पहिलंच राज्य ठरलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
साहित्य अकादमीचे २०१८ साठीचे पुरस्कार काल जाहीर
झाले. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना बाल साहित्यासाठी तर नवनाथ गोरे यांना
‘फेसाटी‘ या कादंबरीसाठी युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातल्या एकूण ४२ साहित्यिकांना
या पुरस्कारांनी गौरवलं जाणार आहे. ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं
स्वरुप आहे.
****
मराठवाड्यात काल अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी
लावली.
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात पैठण, सिल्लोड,
तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. कन्नड तालुक्यातल्या नागापूर इथल्या पूर्णा
नदीला पूर आला तर सारोळा गावा जवळ अंजना नदीला आलेल्या पुरामध्ये एक जण वाहून गेल्याचं
वृत्त आहे.
औरंगाबाद शहरात पावसा मुळे तुंबलेल्या
नाल्यात पडून एकाचा मृत्यू झाला, गेल्या दोन दिवसातली अशा प्रकारचीही दुसरी घटना आहे.
औरंगाबाद इथं पाणचक्की जवळ ऐतिहासिक मेहमूद दरवाजाचं एक लाकडी कवाड काल सकाळी कोसळलं.
४०० वर्षे जुनं हे कवाड पावसामुळे जीर्ण झाल्यानं पडल्याचं सांगण्यात आलं.
जालना जिल्ह्यात काल सायंकाळी झालेल्या पावसात गुंडेवाडी
इथं झाडाच्या आडोशाला थांबलेल्या तीन महिलांच्या अंगावर वीज कोसळली, एक महिला जागीच
ठार झाली तर अन्य दोघी महिला गंभीर जखमी झाल्या.
उस्मानाबाद शहरासह भूम, तुळजापूर, उमरगा,
तालुक्यात काल सायंकाळी जोरदार पाऊस झाला, परभणी, हिंगोली, तसंच बीड जिल्ह्यातही पावसानं
हजेरी लावल्याचं वृत्त आहे.
राज्यात इतरत्रही पावसानं काल हजेरी
लावली. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यातल्या मटरगाव इथं अंगावर वीज पडून दोन जण ठार
झाले, अहमदनगर, तसंच नाशिक जिल्ह्यातही काल चांगला पाऊस झाला.
****
तुळजापूरच्या नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांचं नगराध्यक्षपद
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी रद्द केलं आहे. गंगणे यांच्यावर तुळजापूर
यात्रा अनुदान घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर १९ मार्च ते
१२ आक्टोबर या कालावधीत त्या फरार झाल्या होत्या, २०८ दिवस फरार झालेल्या गंगणे यांचं
नगराध्यक्षपद रद्द करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी केली होती.
माने यांनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काल हे आदेश जारी केले.
****
हिंगोली जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांच्या कुपोषण
मुक्तिसाठी २६२ ठिकाणी बाल विकास केंद्र १
जुलै पूर्वी स्थापन करण्यात येणार आहेत. त्या साठी ५७ लाख ७९ रूपये एवढा निधी उपलब्ध
करून देण्यात आला आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड
विभागानं हुजूर साहिब नांदेड -अमृतसर- या सचखंड एक्स्प्रेस रेल्वेमध्ये 'ट्रेन कप्तान'
ची विशेष सुविधा सुरू केली आहे. ट्रेन कप्तान हा रेल्वेगाडीचा प्रमुख म्हणून कार्य
करेल आणि या रेल्वे गाडीत पुरवण्यात आलेल्या सर्व सुविधांची जबाबदारी त्याच्या वर असेल. टप्या टप्यानं इतर रेल्वे गाड्यां मध्ये ही
ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड
ते पनवेल आणि सिकंदराबाद ते जबलपूर हा रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. नांदेडहून
परभणी, परळी, लातूर, उस्मानाबाद, पुणे मार्गे पनवेलला जाणाऱ्या विशेष गाडीच्या चार
आणि अकरा ऑगस्टला फेऱ्या होणार आहेत. तर सिकंदराबाद-जबलपूर गाडीच्या सप्टेंबर महिन्या
पर्यंत फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
****
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काल
बीड इथं विविध खातेनिहाय आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातली प्रलंबित आणि प्रस्तावित विकास
कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागानं पुढाकार घेण्याचे तसंच कोणतीही कामं
प्रलंबित राहणार नाहीत याची संबधित अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
****
महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा
पटेल यांना पुणे इथल्या पद्मभूषण बाळासाहेब भारदे प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा
या वर्षीचा देशभक्त बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २७ जुलै
रोजी पुण्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
*****
***
No comments:
Post a Comment