Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 June 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जून २०१८ सकाळी ६.५० मि.
****
§
पायाभूत सुविधा क्षेत्रावर केंद्र
सरकारचा भर
- केंद्रीय मंत्री पियुष
गोयल
§
महिला
लोकप्रतिनिधींसाठी राज्य महिला आयोगाचं कारभारणी प्रशिक्षण अभियान
§
लातूर
इथं खासगी शिकवणीच्या संचालकाची गोळ्या झाडून हत्या
§
औरंगाबाद
जालना रस्त्यावर भीषण अपघातात चार जण ठार
आणि
§
सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न करणार - मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांचं आश्र्वासन
****
पायाभूत सुविधा क्षेत्रावर केंद्र सरकारचा भर असल्याचं, केंद्रीय प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी
म्हटलं आहे. ते काल मुंबई इथं आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक
बँकेच्या तिसऱ्या वार्षिक बैठकी दरम्यान बोलत होते. या बॅंकेनं भारताला गुंतवणूकीचं चांगलं केंद्र बनवलं असून, देशातल्या
सहा प्रकल्पांसाठी एक अब्ज वीस कोटी डॉलरचं कर्ज उपलब्ध करून दिलं असल्याचं, गोयल यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या बैठकीत सहभागी होणार आहेत.
दरम्यान, या सभेत काल झालेल्या ‘शाश्वत
पायाभूत सुविधा’ या विषया वरच्या परिसंवादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहभागी झाले. शाश्वत विकास हा केंद्रबिंदू ठेवून
पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देत असल्याचं, त्यांनी सांगितलं.
या
सभेनिमित्त मुंबईत आलेले दक्षिण कोरियाचे उपअर्थमंत्री ह्युंग क्वान को यांच्या
शिष्टमंडळानं काल फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई-नागपूर द्रुतगती महा मार्गाचं काम, अत्यंत
गतीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्मार्ट आणि डिजीटल
तंत्रज्ञानाचा वापर करून महामार्गाचं काम गतीने करण्याची ग्वाही कोरियन
शिष्टमंडळानं दिली.
****
राज्यात १५ ‘इनक्युबेटर
सेंटर्स’ तसंच कौशल्य विकास केंद्रं स्थापन करण्याबाबत कौशल्य विकास
मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत दोन सामंजस्य करार करण्यात आले. मुंबईत काल राज्य शासनाचा कौशल्य विकास विभाग आणि महाराष्ट्र स्टेट
इनोव्हेशन सोसायटीच्या ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचं उद्घाटन निलंगेकर
यांच्या हस्ते झालं, त्यावेळी हे करार करण्यात आले. विविध क्षेत्रांमध्ये ‘स्टार्टअप’ उद्योग साकारण्यासाठी राज्य शासन प्रोत्साहक आणि सहाय्यक भूमिका बजावत असल्याचं निलंगेकर
यावेळी म्हणाले.
****
राज्य
मार्ग परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपात सहभागी झाल्याबद्दल
एस.टी.च्या स्थानिक प्रशासनानं केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचं
निलंबन मागे घेण्यात आलं आहे. या संदर्भातलं परिपत्रक काल
जारी करण्यात आलं. निलंबित केलेल्या सर्व एक हजार १० कर्मचाऱ्यांना नव्यानं
नियुक्ती देण्याबाबतचे आदेश महामंडळानं
दिले आहेत. त्यांना
एक जुलै २०१८ पासून नव्यानं नियुक्ती दिली जाईल.
****
विधान
परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण
पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी काल मतदान
झालं. मुंबई शिक्षक मतदार संघात ८३ टक्के,
मुंबई पदवीधर मतदार संघात ५३ टक्के, कोकण पदवीधर मतदार संघात सुमारे ७४ टक्के, तर नाशिक
शिक्षक मतदार संघासाठी ९२ टक्के मतदान झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मतमोजणी
२८ जून ला होणार आहे.
****
राज्यात
पंचायती मध्ये निवडून आलेल्या महिला सरपंच, उपसरपंच
तसंच ग्राम पंचायतीतल्या महिला लोक प्रतिनिधींसाठी कारभारणी प्रशिक्षण अभियानाला आज नाशिक जिल्ह्यातून प्रारंभ होत आहे. महिला लोक प्रतिनिधींना सक्षम करण्यासाठी हे अभियान
हाती घेतल्याचं, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितलं.
येत्या २० ऑगस्टला सांगली, पालघर, अकोला, आणि
उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये
होणाऱ्या कार्यशाळेनं या अभियानाची सांगता होणार आहे. ३० जिल्ह्यातल्या ९०० महिला
लोकप्रतिनिधी या अभियानाचा लाभ घेणार आहेत.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार ३४४ वा शिवराज्याभिषेक
दिन सोहळा काल रायगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राजर्षी शाहु महाराज यांची जयंती आज सर्वत्र साजरी
होत आहे, या निमित्तानं समाजकल्याण विभाग आणि जय विश्वकर्मा संस्थेच्या वतीनं आज औरंगाबाद
इथं समता दिंडी काढली जाणार आहे.
****
बीड जिल्ह्यात गोपीनाथ गडावर सुसज्ज विश्रामगृह बांधणार
असल्याचं, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे, काल गोपीनाथ
गडावर माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळी अभिवादन केल्यानंतर
ते बोलत होते. परळीसह जिल्ह्यातले रस्त्यांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन पाटील यांनी
दिलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
प्लास्टिक
बंदीचा निर्णय जनतेच्या फायद्याचा असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी
म्हटलं आहे, ते काल मंत्रालयात बोलत होते. बेकरी उत्पादनं तसंच हस्तोद्योग,
गृहोद्योगातून तयार होणाऱ्या पदार्थांच्या वेष्टनासाठी सध्या पर्याय उपलब्ध
नसल्यानं, या सध्या पुढचे तीन महिने, ही उत्पादनं प्लास्टिक वेष्टनात विक्री करता
येणार असल्याचं, कदम यांनी स्पष्ट केलं. गणेशोत्सव काळात थर्माकोल वापरावर
तात्पुरती परवानगी देण्याबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेईल, असंही त्यांनी सांगितलं. बंदीच्या निर्णयाची नऊ महिन्यांपूर्वीच माहिती
दिली होती, या काळात प्लास्टिक उत्पादक कारखान्यांनी पर्यायी व्यवस्था करायला हवी
होती, असं कदम म्हणाले. नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर करून, सहकार्य करण्याचं
आवाहन कदम यांनी केलं.
औरंगाबाद महानगरपालिकेनं
काल शहरातल्या सात दुकानदारांकडून प्लास्टिक वापरासाठी ३६ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल
केला. नागरिकांकडे असलेल्या प्लास्टिक पिशव्या गोळा करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं
प्रत्येक बुधवारी आणि गुरूवारी संध्याकाळी प्रत्येक वार्डात घंटागाड्या पाठवण्यात येणार
आहे. औरंगाबाद कनेक्ट टीम ॲक्टच्या वतीनं शहरात २२ ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्लास्टिक
संकलन केंद्रावर प्लास्टिक पिशव्या देण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
जालना जिल्ह्यात बदनापूर इथं प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या
सात व्यापाऱ्यांकडून २१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
****
लातूर शहरात स्टेप बाय स्टेप या खासगी शिकवणी वर्गाचे
संचालक अविनाश चव्हाण यांची रविवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या घालून
हत्या केली. चव्हाण यांच्यावर जवळून तीन गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी एक गोळी त्यांच्या
छातीत लागल्यानं, त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार
नोंदवण्यात आली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून ही हत्या झाल्याचा संशय वर्तवला जात आहे.
****
औरंगाबाद नजिक करमाड जवळ झालेल्या भीषण अपघातात चार
जणांचा मृत्यू झाला. काल सकाळी औरंगाबादहून परभणी कडे जाणाऱ्या चारचाकी गाडीवरचं चालकाचं
नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी असून, त्यांच्यावर शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यातला
सिंचनाचा अनुशेष दूर व्हावा यासाठी प्रयत्न
करण्याचं आश्र्वासन मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी दिलं आहे. विभागीय आयुक्त
डॉ. पुरूषोत्तम भापकर यांच्या कडून त्यांनी काल
महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी
अधिकाधिक निधी मिळवण्यावर भर देणार असल्याची ग्वाही, कराड यांनी दिली.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात
काल बिबट्याच्या हल्ल्यात एक वृद्ध शेतकरी जखमी झाला. मौजे कवठा इथल्या शिवारात ही
घटना घडली. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची तुकडी दाखल झाली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बेघरांना घरं उपलब्ध
करून द्यावीत, आणि लातूर जिल्हा बेघरमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश लातूरचे
खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी दिले आहेत. ते काल जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत
बोलत होते. शासना तर्फे राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचा त्यांनी यावेळी आढावा
घेतला.
****
परभणी जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीनं काल सर्व तालुक्याच्या
ठिकाणी बँकांसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांत बँका अडवणूक
करत असल्याचं या आंदोलनाचं नेतृत्त्व करणारे खासदार संजय जाधव यांनी सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment