Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 24 June 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार
संघांसाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीत ७१ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी सात
ते संध्याकाळी पाच वाजे पर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकी साठी भारतीय जनता पक्ष
आणि शिव सेनेत युती झाली नसून, कोकण पदवीधर मतदार संघात शिवसेनेनं संजय मोरे, भाजपनं
निरंजन डावखरे, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे.
नाशिक विभागीय
शिक्षक मतदार संघासाठी १६ उमेदवार रिंगणात असून, त्या पैकी भाजपचे अनिकेत पाटील, शिव
सेनेचे किशोर दराडे, भाजपचे बंडखोर प्रताप सोनवणे, तसंच संदीप बेडसे आणि भाऊसाहेब कचरे
यांच्यात लढत आहे.
मुंबई शिक्षक
मतदार संघात शिव सेनेचे शिवाजी शेंडगे, भाजपचे अनिल देशमुख, लोक भारतीचे कपिल पाटील
रिंगणात आहेत, तर मुंबई पदवीधर मतदार संघात शिवसेनेचे विलास पोतनीस, भाजपचे अमित कुमार
मेहता, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या संघटनांनी पाठिंबा जाहीर केलेले राजू कोर्डे
यांच्यात लढत होणार आहे.
****
राज्य शासनानं २३ मार्च २०१८ रोजी काढलेल्या अधि
सूचनेनुसार प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाली असून, राज्यात ठिकठिकाणी प्लास्टिक
उत्पादन आणि वितरण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या प्रदूषण नियंत्रण
मंडळानं प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या आठ कारखान्यांवर कारवाई केली असून, त्यांच्या कडून
२५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसंच शहरातल्या पाणी पाऊच तयार करणाऱ्या कारखान्यांवरही
कारवाई करण्यात आली आहे.
जालना नगरपालिकेनं
प्लास्टिक बंदी निर्यणाच्या अंमलबजावणी साठी सहा पथकं तयार केली आहेत. शहरात अद्याप
कुणावरही दंडात्मक कारवाई झाली नसली तरी पथकांच्या माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचं
मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितलं.
****
सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांसाठीच्या
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राखीव प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना
आता जात वैधता प्रमाणपत्र नसलं, तरी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. या संबंधीच्या
कायद्यात सुधारणा करण्याच्या अध्यादेशास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मान्यता दिली
आहे. अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे या कायद्यात सुधारणा करण्याची विनंती राज्य
सरकारनं राज्यपालांकडे केली होती. ही प्रक्रिया झाल्या नंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी
विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असून, ही तरतूद फक्त २०१८-१९
या वर्षासाठीच्या प्रवेशासाठीच लागू राहणार असल्याचं आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव
मनीषा वर्मा यांनी जारी केलेल्या अध्यादेशात म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा बलाचे
जवान आणि दहशत वाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. आज दुपारच्या सुमारास
ही चकमक झाली. केंद्रीय राखीव पोलिस दल आणि लष्करी जवान अमरनाथ यात्रे साठी राष्ट्रीय
महामार्गाची पाहणी करत असताना दहशतवाद्यांनी गोळी बार केल्यानंतर ही चकमक सुरु झाली.
****
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत आज पासून ते
२९ जून पर्यंत स्टार्ट अप सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज मुंबईत कौशल्य विकास
आणि उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते या सप्ताहाला सुरुवात होणार
आहे. राज्यातल्या स्टार्ट अप्सना उभारी देऊन त्यांना हातभार लावण्याचं काम सरकार करणार
असून, राज्यातल्या युवकांना या मध्ये
सहभागी होण्या साठी प्रोत्साहित केलं जाणार असल्याचं निलंगेकर यांनी सांगितलं.
****
यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथं येथे स्कॉर्पिओ वाहनाला
झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर सहा जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी हा अपघात
झाला. मृत सर्वजण वणी इथले रहिवाशी आहेत. जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात
आलं आहे.
****
औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी तर्फे आज शहरातल्या ऐेतिहासिक
बीबी का मकबरा परिसरात हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी
कुरेशी आणि रफत कुरेशी यांनी या स्थळाचा इतिहास समजावून सांगितला. यावेळी पोलिस आयुक्त
चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासह
इतिहास प्रेमी उपस्थित होते.
****
येणाऱ्या आठवड्याच्या शेवटी मध्य भारत आणि उत्तर
भारतात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मान्सून गुजरात मधल्या
सौराष्ट्र, अहमदाबाद आणि महाराष्ट्रातल्या अमरावती कडे सरकत असल्याचं हवामान विभागाचे
अपर महानिदेशक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं आहे.
दरम्यान,
राज्यात मुंबई शहर आणि उप नगरासह काही जिल्ह्यात आज पावसानं हजेरी लावली. मुंबईत सकाळ
पासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
*****
***
No comments:
Post a Comment