Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 4 June 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ जून २०१८ दुपारी
१.०० वा.
****
देशातल्या सर्व राज्यपाल आणि नायब राज्यपालांची
दोन दिवसांची परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरु असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांच्या भाषणानं या परिषदेला सुरुवात झाली. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियान, अंतर्गत
सुरक्षा, उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास या मुद्यांवर, तसंच राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या
जयंतीनिमित्त आयोजित करण्याच्या कार्यक्रमांवरही या परिषदेत चर्चा करण्यात येणार
आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या शोपीयां जिल्ह्यात दहशतवाद्यांनी
आज पोलिसांवर ग्रेनेड हल्ला केला. यात पाच नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे.
****
बँकांची
वाढती बुडीत कर्ज आणि घोटाळे यासंदर्भात सार्वजनिक आणि खाजगी बँकांचे वरिष्ठ अधिकारी आज संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीला
माहिती देणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकावर कारवाई करण्याचे पुरेसे अधिकार
रिझर्व्ह बँकेकडे नसल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी नुकतंच
म्हटलं होतं, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली आहे. त्याशिवाय
उर्जीत पटेल या महिन्याच्या अखेरीस याच मुद्यावर स्थायी समितीसमोर आपलं म्हणणं मांडणार
आहेत. मागच्या वर्षाच्या अखेरीस सरकारी बँकांची बुडीत कर्जं सात लाख ७७ हजार कोटींच्या वर गेली असल्याचं
यासंदर्भातल्या अधिकृत माहितीत म्हटलं आहे.
****
प्रादेशिक
भाषा आणि बोलीमधल्या पत्रकारितेचं भविष्य उज्ज्वल आहे, असं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी
अधिकारी शशि शेखर वेंपती यांनी म्हटलं आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ओडिशा मधल्या वार्ताहरांच्या
गौरवाकरता नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डिजिटल प्रसारमाध्यमं ही
पत्रकारितेचं भविष्य असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
पाकिस्ताननं
सीमा पार हल्ले आणि दहशतवादी कारवायांना फूस देणं थांबवल नाही तर भारताला रमझानच्या
काळात शस्त्रसंधीचा घेतलेला निर्णय बदलावा लागेल, असं
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटलं आहे. ते काल यवतमाळ इथं वार्ताहरांशी
बोलत होते. पाकिस्ताननं अकारण गोळीबार केला तर भारतही त्याला गोळीबारानंच प्रत्यूत्तर
देईल, असं ते म्हणाले. भारतानं रमझानच्या पार्श्वभूमीवर लष्करी कारवाया
स्थगित केल्या, मात्र तरीही पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात
नोकरी पासून प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना दूर ठेवल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत
आहेत. याचा निषेध म्हणून आज याठिकाणी तरुणांनी अंदोलन करत प्रकल्पात जाणाऱ्या वाहनांना
अडवून धरलं. मात्र अधिकाऱ्यांनी वाहनं आत नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर संतप्त आंदोलनकऱ्यांनी
बोईसर मधल्या पचमार्ग इथं बस च्या काचा फोडल्याची घटना घडली आहे.
****
जागतिक पर्यावरण दिन उद्या साजरा होत आहे. यंदा जागतिक
पर्यावरण दिनाचं यजमानपद भारत भूषवणार असून, प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा
घालणं, ही यंदाची पर्यावरण दिनाची सकंल्पना आहे. यानिमित्त उद्या देशभरात विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
बुलडाणा इथं उद्या सकाळी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात
आलं आहे. यात नागरिक, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन पर्यावरण
मित्र मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
बुलडाणा जिल्हयातल्या देऊळगाव राजा तालुक्यात गेल्या
शुक्रवारी वादळाचा तडाखा बसलेल्या अंढेरा गावात २५८ घरांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक
अंदाज आहे. वादळानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी एका पथकामार्फत करण्यात आली, त्यांनी
दिलेल्या अहवालानुसार, परिसरातल्या सेवानगर भागात शेतीचं जवळपास नऊ लाख रुपयांचं नुकसान
झालं आहे. अंढेरा परिसरात शुक्रवारी दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता.
****
रत्नागिरीजवळच्या आरे-वारे
समुद्रकिनाऱ्यावर मुंबईतून आलेल्या पाच पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. मुंबईतून गणपतीपुळे
इथं आलेले सात पर्यटक समुद्रात आंघोळीसाठी गेले असता, त्यांना ओहोटीच्या पाण्याचा अंदाज
न आल्यानं सहा जण बुडाले. त्यापैकी एकाला वाचवण्यात स्थानिक लोकांना यश आलं.
****
क्वालालंपूर
इथं सुरु असलेल्या महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं थायलंडचा ६६ धावांनी पराभव केला. भारतानं पहिले फलंदाजी
करत २० षटकात चार बाद १३२ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना थायलंडचा संघ
अवघ्या ६६ धावाच करु शकला. भारताचा पुढचा सामना येत्या शनिवारी पाकिस्तान विरुद्ध होणार
आहे.
****
हवामान विभागानं आज देशातल्या विविध भागात वादळी
वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, ओडीशा, बिहार, उत्तर प्रदेश,
उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, गोवा यासह राज्यात विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र
आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
*****
***
No comments:
Post a Comment