आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
५ जून २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
जागतिक पर्यावरण दिन आज देशभर साजरा केला जात आहे.
यंदा जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद भारत भूषवणार असून, प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदूषणाला
आळा घालणं, ही यंदाच्या पर्यावरण दिनाची सकंल्पना आहे. यानिमित्त आज देशभरात विविध
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पृथ्वीला अधिक स्वच्छ
आणि सुरक्षित बनवण्याचं आवाहन केलं आहे. येणाऱ्या पिढीला पर्यावरण अनुकूल वातावरण देणं,
हे आपलं कर्तव्य असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनीही भावी पिढीसाठी स्वच्छ आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्याची गरज व्यक्त
केली.
****
महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या राज्यातल्या
४५ लाख शेती पंपाच्या वीज वापराचं येत्या तीन महिन्यांत स्वतंत्र लेखा परिक्षण करण्यात येणार असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
राळेगणसिद्धी इथं ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी शेती पंपाचा वीज वापर आणि वीजबिल
या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्ना बाबत
बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यामुळे शेती पंपाचा
वीज वापर निश्चित होऊन वीजबिलां बाबत तक्रारी राहणार नसल्याची अपेक्षा त्यांनी यावेळी
व्यक्त केली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत राळेगणसिद्धी इथं साकारत असलेल्या
दोन मेगावॉट प्रकल्पाची पाहणीही त्यांनी यावेळी केली.
****
महाराष्ट्र विधानमंडळ
अनुसूचित जाती कल्याण समिती उद्यापासून दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहे.
या दौऱ्यादरम्यान अनुसूचित जातींच्या प्रवर्गातल्या अधिकारी कर्मचारी यांची भरती, बढती,
आरक्षण, अनुशेष, आणि जात पडताळणी विषयक बाबी, तसंच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबवण्यात
येणाऱ्या कल्याणकारी योजनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या
अहमदपूर तालुक्यातलं वैरागड, हे गांव आदर्श ग्रामच्या दिशेनं वाटचाल करत आहे. डॉ. हरिवंशराय
बच्चन प्रतिष्ठानच्या वतीनं जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि जिल्हा परिषदेचे मुख कार्यकारी
अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते काल गाव धुर मुक्त करण्यासाठी उज्वला योजने
अंतर्गत ५५ कुटुंबांना गॅसचं वितरण करण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment