Tuesday, 5 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.06.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 5 June 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक जून २०१ दुपारी १.०० वा.

****



 गृहनिर्माण क्षेत्र भ्रष्टाचार आणि दलालां पासून मुक्त करण्यासाठी सरकार कार्यरत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं `प्रधानमंत्री आवास` योजना लाभार्थ्यांशी नरेंद्र मोदी ॲपच्या माध्यमातून संवाद साधताना ते आज बोलत होते. नागरिकांना त्यांची घरं सहज उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नव्या तंत्रज्ञानामुळे ग्रामीण आणि शहरी भागात गरिबांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. महिला, दिव्यांग तसंच अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीयांना अधिक घरं उपलब्ध व्हावी, यावर भर देण्यात येत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.

****



 माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं दिलेलं अटकेपासून संरक्षण येत्या १० जुलै पर्यंत वाढवलं आहे. एयरसेल मॅक्सिस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं चिदंबरम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



दरम्यान, चिदंबरम आज या प्रकरणाच्या चौकशी साठी संचालनालया समोर हजर राहीले. एयरसेल मॅक्सिसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ग्लोबल कम्यूनिकेशन होल्डिंग सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला परवानगी देण्यात कायद्याचं उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

****



 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आज जागतिक सोहळा होत आहे. या सोहळ्याचं यजमान पद भारताकडे असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारंभाला संबोधित करणार आहेत. ‘प्लास्टिक प्रदूषण संपवाही यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांचे पर्यावरण मंत्री, तसंच विविध औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या निमित्त राजपथाच्या हिरवळीवर आयोजित प्रदर्शनालाही पंतप्रधान भेट देणार आहेत.

****



 प्लास्टिक पासून तयार होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्या विषयीच्या नियमांची परिणामकारक अंमलबजावणी करण्याकरता, केंद्र सरकार एक यंत्रणा कार्यान्वित करणार असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. ‘प्लास्टिक हटाओअभियानाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, यासंदर्भात केंद्र सरकार व्यापक जनजागृती करत असून, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळं आणि सर्व उद्योगांचं सहकार्य या प्रयत्नांना मिळत आहे, असं त्यांनी सांगितलं.

****



अन्नप्रक्रिया मंत्रालयातर्फे उद्योगांना अर्थसहाय्य करण्यासाठी स्वतंत्र वित्तसंस्थेची निर्मिती केली जाणार आहे. या संस्थेतर्फे अन्नउद्योग प्रकल्पांना निधीची उपलब्धता, जोखीम घटकासंदर्भात सक्षमीकरण तसंच अन्न उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यात येईल, असं अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या. देशभरात फुड पार्क आणि शीतगृहांची साखळी उभारण्यात येणार असून, प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत ७०० प्रकल्पही त्याला जोडले जाणार आहेत, अन्नाचा नाश टाळण्यासाठी याचा प्रामुख्यानं उपयोग होईल, असं त्या म्हणाल्या.

****



 प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना अंतर्गत जन औषधी सुविधाया ऑक्सो-बायो डिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिनचा शुभारंभ रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते करण्यात आला. ३३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत तीन हजार ६०० जनऔषधी केंद्रांमध्ये परवडणाऱ्या दरातले हे सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध असतील. वापर झाल्यानंतर टाकून दिल्यानंतर त्याचा ऑक्सिजनशी संपर्क येऊन ते बायोडिग्रेडेबल बनतं हे याचं वैशिष्ट्य आहे. यामुळे वंचित महिलांसाठी स्वच्छता, स्वास्थ्य आणि सुविधासुनिश्चित होईल असं मांडवीय यावेळी म्हणाले.

****

 भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उद्या मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. भाजप आणि शिवसेना या मित्र पक्षांनी नुकतेच पालघर लोकसभा पोटनिवडणूक स्वतंत्र लढवली आहे. शिवसेनेनं त्यावेळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवर उघड टीका केली होती. भाजप त्या पार्श्र्वभूमीवर या भेटीद्वारे दूरावलेल्या मित्र पक्षाला पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं मानलं जात आहे.

****



 मागील वर्षीच्या खरीप हंगामासाठी जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुमारे १८५ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. विमा रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. फळबागांसाठीही आठ कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रीयीकृत बँकेचे खातेदार असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून विमा रक्कम जमा करण्यास सुरुवात केली जाईल, असे कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी सांगितलं.

*****

***

No comments: