Wednesday, 6 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.06.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 6 June 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक जून २०१ दुपारी १.०० वा.

****

 स्टार्ट अपच्या बाबतीत भारतानं जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातून उद्योग सुरू करणाऱ्या देश भरातल्या युवकांशी नमो ॲपद्वारे आज सकाळी संवाद साधताना ते बोलत होते. स्टार्ट अप उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यासाठी निधीची गरज असून, सरकारनं यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी उभारला असल्याचं त्यांनी सांगितलं. स्टार्ट अप हे आता फक्त मोठ्या शहरांपुरते सीमित नसून लहान शहरं आणि गावातूनही युवक यासाठी पुढे आल्याचं, तसंच एकूण स्टार्ट अप उद्योगांमध्ये पंचेचाळीस टक्के वाटा महिलांचा असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. नवीन उद्योग सुरू करण्यासाठीच्या या आधीच्या जाचक अटी बदल्या मुळे युवकांना उद्योग सुरू करण्याची इच्छा प्रत्यक्षात आणता येत आहे, असं सांगून, युवावर्ग आता रोजगार मागणारा नाही, तर रोजगार देणारा होत आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी या युवकांची प्रशंसा केली.

****



 एअरसेल मॅक्सिस प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांना नव्यानं नोटिस जारी केली असून येत्या बारा तारखेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. चिदंबरम यांची याप्रकरणी चौकशी सध्याही सुरू असून, ते काल  सक्तवसुली संचालनालया समोर तर आज केंद्रीय अन्वेषण विभागा समोर चौकशी साठी हजर होते.

****



 भारतीय जनता पक्षानं हाती घेतलेल्या जनसंपर्क अभियाना अंतर्गत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज मुंबईत आले आहेत. ते आज मुंबईत स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर, अभिनेत्री माधुरी दीक्षित तसंच उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतील, अशी अपेक्षा आहे. अमित शाह शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची ही शक्यता आहे.

****



 भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी आज आणखी एका व्यक्तीला दिल्लीमधे अटक केलं आहे. दिल्लीतल्या मुनिरका भागातून या व्यक्तीला पुणे पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेतलं. या व्यक्तीचे नक्षल वाद्यांशी संबंध असल्याचा संशय आहे.

****



 पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मधल्या तारापूर इथल्या  अणुऊर्जा प्रकल्पातल्या भरतीला स्थगिती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या बाबतचा स्थानिकांचा विरोध लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले असून, येत्या  आठवडा भरात  एक बैठक आयोजित करून, या प्रकल्पानं बाधित झालेल्या स्थानिकांच्या मुलांना योग्य न्याय देण्या बाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. खासदार राजेंद्र गावित यांनी स्थानिक नागरिक आणि मुख्यमंत्री यांच्यात संवाद होण्यासाठी काल एक बैठक आयोजित केली होती.

****



 मिशन शौऱ्याच्या यशानंतर आता, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या आदिवासी मुलांना २०२४ च्या ऑलिंपिक स्पर्धांसाठी मिशन शक्तीच्या माध्यमातून तयार करण्याची योजना राबवणार असल्याची माहिती चंद्रपूरचे संपर्कमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत दिली. या स्पर्धेत किमान पाच क्रीडा प्रकारात पदकं मिळवण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं या मुलांची तयारी करून घेण्यात येईल, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

****



 नाशिक जवळचं भंडारदरा धरण हे पर्यटन स्थळ गेल्या काही वर्षात  काजवा महोत्सवासाठी प्रसिद्ध होत असून, यंदाही झाडांवरचे काजवे बघण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत आहेत. पावसाळा सुरू होण्याआधी, भंडारदरा परिसरात झाडांवर विद्युत रोषणाई केल्याचा भास निर्माण करणारा हा निसर्ग चमत्कार पर्यटकांना पाहता यावा, यासाठी वन खात्याच्या वतीनं खास सहलींचं नियोजन करण्यात आलं आहे.

****



 रायगड किल्ल्यावर तीनशे पंचेचाळीसाव्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला आज सुरुवात झाली. खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते राज्याभिषेकाचा मुख्य कार्यक्रम होणार असून, या सोहळ्यासाठी राज्य तसंच देशभरातून हजारो शिवप्रेमी रायगडावर दाखल झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 जगातली पहिली रुग्णालय रेल्वे समजली जाणारी लाईफलाईन एक्सप्रेस पुढच्या आठवड्यात राज्यात येत असून, येत्या पंधरा तारखेपासून सहा जुलैपर्यंत ती लातूर स्थानकात असेल. देशभरातल्या गरीब तसंच दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी, भारतीय रेल्वेनं इंपॅक्ट इंडिया फाऊंडेशन, या बिगर सरकारी संस्थे सोबत ही रुग्णालय रेल्वे १९९१ मध्ये सुरू केली होती. पाच डब्यांच्या या गाडीमध्ये ऑपरेशन थिएटरही उपलब्ध असून, सुरू झाल्यापासून आतापर्यंत या रेल्वेच्या माध्यमातून दहा लाखांहून अधिक गरीब आणि दिव्यांग रुग्णांवर नि:शुल्क उपचार करण्यात आले आहेत.

*****

***

No comments: