Saturday, 2 June 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 02.06.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 2 June 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत केंद्र सरकार त्या त्या राज्य सरकारांशी चर्चा करेल, असं केंद्रीय कृषी सचिव एस.के.पटनायक यांनी सांगितलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या बहुतांशी स्थानिक स्वरुपाच्या असून, आतापर्यंत संपकरी शेतकऱ्यांकडून काहीही निवेदन केंद्र सरकारला मिळालेलं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातल्या शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला दीडपट हमीभाव या मागण्यांसाठी कालपासून १० दिवसांचा संप पुकारला आहे.

****

दरम्यान, या संपामुळे बाजार समित्यांमध्ये होणारी भाज्यांची आवक घटली असून, दूध संकलनही कमी झालं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या दूध डेअरी बंद असून, येवला तालुक्यातल्या विसापूर इथं शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केल्याचं अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकारी अध्यक्ष राजू देसले यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या समाज कल्याण विभागातले कर्मचारी येत्या ११ जून रोजी राज्यभर निषेध आंदोलन करणार आहेत. समाज कल्याण विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी, आस्थापना विषयक प्रश्न सोडवण्यासाठी बैठकीची तारीख देण्यासाठी समाज कल्याण विभागाचे सचिव आणि आयुक्त यांच्याकडून टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे. समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शांताराम शिंदे यांनी आज एक पत्रक जारी करुन ही माहिती दिली.

****

इंडियन प्रिमियर लीग-आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजीमध्ये सहभागी असल्याची कबुली अभिनेता-निर्माता अरबाज खान यानं दिली आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं अरबाज खान याला समन्स बजावलं होतं, त्यानुसार तो जबाब नोंदवण्यासाठी आज खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात हजर झाला, त्यावेळी त्यानं ही कबुली दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. मात्र यावर्षी झालेल्या आयपीएल हंगामात आपण सट्टा लावला नसल्याचं त्यानं सांगितलं आहे.

****

औरंगाबाद महापालिका स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे राजू वैद्य यांची निवड झाली आहे. आज सकाळी महापालिकेत यासाठी मतदान करण्यात आलं. राजू वैद्य यांना ११ मतं मिळाली. त्यात शिवसेनेचे सहा, भाजप तीन तर दोन अपक्षांचा समावेश आहे. एमआयमचे चार सदस्य उशीरा आल्यानं त्यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला.

****

जालना इथले भाजपचे नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना आज काळं फासलं. प्रभागात कामं होत नसल्याचा आरोप करत ढोबळे यांनी काळं फासल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक असल्याचं धुळे इथले शिवसेनेचे माजी आमदार तथा शिवसेना प्रणित एस.टी.कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील यांनी म्हटलं आहे. धुळे एस.टी. बसस्थानकात आज पाटील यांच्या उपस्थितीत एस.टी. कामगारांनी वेतनवाढ दिल्याबद्दल आंनदोत्सव साजरा करण्यात आला.

****

सांगली जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या स्मार्ट ग्राम योजनेत शिराळा तालुक्यातल्या चिखली गावानं प्रथम क्रमांक मिळवला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी ही माहिती दिली. या गावाला ४० लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

****

औरंगाबाद इथल्या अप्सरा चित्रपटगृहाला आज दुपारी आग लागली. शहरातल्या पदमपुरा इथल्या अग्निशमन विभागाच्या दोन बंबानी ही आग आटोक्यात आणली. या आगीचं नेमकं कारण आणि वित्तहानी अद्याप स्पष्ट नसल्याचं अग्निशमन विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

****

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून उद्या तीन जून रोजी नागरी सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा औरंगाबाद जिल्ह्यातल्या ३१ उपकेंद्रांवर घेण्यात येणार असून, यासाठी १० हजार ४६ उमेदवारांना प्रवेशपत्रं पाठवण्यात आल्याचं याबाबतच्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

****

येत्या ३८ तासात मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचे वरीष्ठ वैज्ञानिक ए.के.श्रीवास्तव यांनी व्यक्त केला आहे. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून हळुहळु पुढे सरकत असून, त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार होणाऱ्या हवामानाच्या स्थितीमुळे येत्या ३८ तासांमध्ये दक्षिणेकडील काही भागांत मान्सून सक्रीय होण्याची शक्यता असून, राज्याच्या किनारपट्टीच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. 

****

दरम्यान, राज्यात आजही अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि परिसरात दुपारच्या सुमारास मुसळधार पावसानं हजेरी लावली. 

****

No comments: