Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 5 June 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
सरकारी
नोकरदारांच्या पदोन्नतीत लागू असलेलं आरक्षण तुर्तास कायम ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च
न्यायालयानं दिले आहेत. कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणं ही सरकारची जबाबदारी आहे, मात्र
विविध उच्च न्यायालयांच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबली असल्याचा मुद्दा
केंद्र सरकारनं उपस्थित केला. पदोन्नतीतल्या आरक्षणाबाबत घटनापीठाचा अंतिम निर्णय येईपर्यंत
केंद्र सरकार कायद्यातंर्गत अनुसूचीत जाती जमाती प्रवर्गातल्या कर्मचाऱ्यांना आरक्षणानुसार
पदोन्नती देता येऊ शकते, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
भारतीय
सेना सीमा भागाला सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्याही अकारण हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर
देईल, असं संरक्षण मंत्री निर्मला सीमारामन यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला चार वर्ष
पूर्ण झाल्याबद्दल नवी दिल्ली इथं आज आयोजित वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या. रमजानच्या
महिन्यात स्वत: आधी हल्ला करायचा नाही, ही भारताची भूमिका कायम असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
सुनंदा
पुष्कर मृत्यू प्रकरणी त्यांचे पती काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एक आरोपी म्हणून येत्या
सात जुलैपूर्वी हजर व्हावं, असं समन्स दिल्लीतल्या एका न्यायालयानं बजावलं आहे. सुनंदा
पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि त्यांच्याशी क्रूरपणे वागल्याच्या आरोपपत्राची
दखल घेऊन, हे समन्स बजावल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
मुंबई,
नागपूर आणि औरंगाबाद इथल्या विधी विद्यापीठांना प्रशासकीय आणि शैक्षणिक खर्चासाठी पुढच्या
पाच वर्षांकरता प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा ठोक निधी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं
आज घेतला आहे. एकात्मिक बाल विकासासाठी राज्यात २०१८-१९ पासून राष्ट्रीय पोषण मिशनची
अंमलबजावणी करण्यास, चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात खाजगी
भागीदारी तत्त्वावर १०० खाटांचं कर्करोग रुग्णालय उभारण्यास, नागरी सुविधा देण्यासाठी
राज्यातल्या कटक मंडळांना राज्य योजनेमधून निधी वितरित करण्यास, अंब्रेला एकात्मिक
बाल विकास सेवा योजनांमधल्या उपाययोजनांना नवीन नावं देण्यासह सुधारित दर लागू करण्यास
आणि शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना सुलभ आणि नियमित गौण खनिजांच्या पुरवठ्यासाठी
महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम-२०१३ मध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता
दिली.
****
वर्षभरात
राज्य पूर्णपणे प्लास्टिकमुक्त होईल, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं
आहे. मुंबई इथं आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित प्लास्टिक पुनर्वापर पुढाकार
या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य सरकारनं मार्च महिन्यात प्लास्टिक बंदीचा आदेश
जारी करुन, राज्य प्लास्टिकमुक्त करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं असल्याचं ते म्हणाले.
****
देशभरातल्या
डाकसेवकांनी गेल्या २२ मेपासून सुरु केलेल्या संपाचा आज पंधरावा दिवस आहे. या संपात
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ४०० डाकसेवकांनी सहभाग घेतल्यानं इथली सेवा ठप्प झाली आहे.
ग्रामीण डाकसेवकांना कमलेशचंद्र कमिटीचा अहवाल लागू करावा, सेवा निवृत्ती वेतन लागू
करावं या आणि इतर मागण्यांसाठी हा संप सुरु आहे.
****
राज्य
ओबीसी जनजागरण आणि संघर्ष समितीच्या वतीनं आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
निदर्शनं करण्यात आली. येत्या २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत इतर मागासवर्गीय समाजाची
विशिष्ट कोड टाकून जनगणना झाली पाहिजे, मंडळ आयोगाच्या संपूर्ण शिफारशींची देशभर प्रभावी
अंमलबजावणी झाली पाहिजे, क्रिमिलेअरची अट रद्द करावी यासह विविध मागण्यांचं निवेदन
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना देण्यात आलं.
****
औरंगाबादच्या
सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑर्गनाझेशन आणि संघर्ष ग्रामविकास संस्था यांच्या वतीनं जागतिक
पर्यावरण दिनानिमित्त आज शहरातल्या लेणी परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. महानगरपालिकेचे
घनकचरा व्यवस्थापन अधिकारी विक्रम मांडवाले यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरतल्या
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.
****
राज्य
शासनाच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे देण्यात येणारा वसुंधरा पुरस्कार
धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेला जाहीर झाला आहे. पाणी पुरवठा, सांडपाणी
व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी हा पुरस्कार
देण्यात येतो.
****
राज्यात
आजही अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. बीड जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास विजांच्या
कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यातल्या तीन महसूल मंडळात
अतिवृष्टीची नोंद झाली. औरंगाबाद शहरात सकाळी काही ठिकाणी पाऊस झाला.
येत्या
दोन दिवसात मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली
आहे.
****
सांगली
महापालिकेतल्या विविध पक्षांच्या १३ नेत्यांनी आज मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश
केला. यात चार नगरसेवक आणि दोन माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment