Friday, 8 June 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 08.06.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 June 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ जून २०१ सकाळी .५० मि.

****

·       प्रत्येकानं देशाबाबत निष्ठा बाळगणं, हीच देशभक्ती असल्याचं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं मत

·       सोयी सुविधा आणि शिक्षकांच्या अभावामुळे देशातली ८२ वैद्यकीय महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय

·       सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी पालघर मतदार संघातून श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी घोषित करत स्वबळावर निवडणूक लढवण्याचे शिवसेनेचे संकेत

·       राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार

आणि

·       राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस

****

विविध जाती - धर्मांची संस्कृती असलेल्या आपल्या देशाला सहिष्णुतेतून शक्ति मिळते असं सांगत प्रत्येकानं देशाबाबत निष्ठा बाळगणं हीच देशभक्ती असल्याचं मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोप प्रसंगी ते काल नागपूर इथं बोलत होते. हिंसाचार, असहिष्णुता,जातीय भेदभाव यामुळे राष्ट्रवाद धोक्यात येत असल्याची खंत  मुखर्जी यांनी व्यक्त केली. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, यांच्यासह संघाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमापूर्वी मुखर्जी यांनी संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्मारकास पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.

****

भारतीय वैद्यकीय परिषदेनं केलेल्या शिफारसीनुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं, देशातल्या ८२ वैद्यकीय महाविद्यालयांवर २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास बंदी घातली आहे. या महाविद्यालयांमध्ये आवश्यक सोयी सुविधांचा अभाव असून, शिक्षकांचीही कमतरता असल्याचं निरीक्षण परिषदेनं नोंदवलं आहे. या ८२ महाविद्यालयांपैकी ७० खाजगी, तर १२ सरकारी आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येनं महाविद्यालयांवर बंदी आल्यानं वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी दरवर्षी उपलब्ध असलेल्या ६४ हजार जागांपैकी १० हजार जागा यंदा कमी होतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी श्रीनिवास वनगा हेच पालघर मतदार संघाचे उमेदवार असतील असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केलं. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीनंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी तलसारी इथं झालेल्या सभेत काल ते बोलत होते. ठाकरे यांच्या या घोषणेमुळे शिवसेना स्वबळावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बुधवारी झालेल्या भेटीबद्दल मात्र ठाकरे यांनी मौन बाळगले.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन आणि डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी या संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येईल. या निकालाची विद्यार्थ्यांना प्रिंट घेता येईल, तसंच हा निकाल एसएमएस सेवेद्वारे मोबाईलवरही उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

****

कुख्यात गुंड अबू सालेमला दिल्ली सत्र न्यायालयानं खंडणी प्रकरणी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तत्पूर्वी २६ मे रोजीच सालेमला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानं २००२ मध्ये दिल्लीतले एक व्यावसायिक अशोक गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या दोन हजार दोनशे तेवीस रुपये खर्चाच्या अप्पर प्रवरा निळवंडे दोन या जलसिंचन प्रकल्पाला केंद्रीय जलस्रोत विकास आणि गंगा संरक्षण विभागानं मंजुरी दिली आहे. विभागाचे सचिव यु.पी.सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत या योजनेला मान्यता दिल्याचं विभागानं म्हटलं आहे. या प्रकल्पांमुळे दोन लाख बारा हजार सातशे ५८ एकर जमीन सिंचनाखाली येणार असून पिण्याचं पाणीही उपलब्ध होणार आहे. या बैठकीत जलसिंचन आणि पूर व्यवस्थापनाच्या ८५ हजार कोटी रुपये खर्चाच्या देशभरातल्या एकूण सहा प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

राज्याच्या बहुतांश भागात काल पावसानं दमदार हजेरी लावली. मुंबईत दुपारी १२ वाजेपर्यंत पडलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

नांदेड जिल्ह्यात कालपासून बहुतांश ठिकाणी पाऊस पडत आहे. जिल्ह्यात माहूर, हदगाव, आणि हिमायतनगर या तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. नांदेड शहरात आज पहाटे चार वाजल्यापासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. उस्मानाबाद इथही पहाटे जोरदार पाऊस झाला, आत्ता पावसाची रिपरिप सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्ह्यातही काल अनेक भागात पावसानं हजेरी लावली. लातूर जिल्ह्यातल्या औसा, आणि देवणी तालुक्यात चांगला पाऊस झाला. अहमदनगर शहरात आणि परिसरातही काल सायंकाली साडे पाच वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यातही पावसानं चांगली सुरुवात केली आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्यानं ११ जूनपर्यंत मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरीकांनी सावधगिरी बाळगावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****

अभिमन्यू काळे यांची जालना जिल्हाधिकारी पदावरची नियुक्ती पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एक तासातच राज्य सरकारनं रद्द केली. त्यामुळे काळे यांची ही नियुक्ती औट घटकेची ठरली. काळे यांनी बुधवारी पदभार स्वीकारला होता. नियुक्ती रद्द झाल्यानंतर त्यांनी पुन्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.बी.खोपले यांच्याकडे पदभार सोपवला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नुकत्याच झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काही ठिकाणी झालेल्या फेरमतदानाच्या गैरप्रकाराचा ठपका ठेवून निवडणूक आयोगानं काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं, त्याचबरोबर त्यांच्यावर पाच वर्षांसाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यावर बंदी घातली आहे, या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती रद्द करण्यात आली असल्याचं वृत्त आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या विभागीय क्रीडा संकुलाची सुरक्षितता, स्वच्छता या बाबींची प्राधान्यानं पूर्तता करुन मूलभूत सोयी-सुविधांसह क्रीडा संकुल अद्ययावत करावं, असे निर्देश विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीचे अध्यक्ष, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिले. औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते.

****

क्वालालंपूर इथं सुरु असलेल्या महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतानं श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर ठेवलेलं १०८ धावांचं लक्ष्य भारतीय संघानं १९ व्या षटकात पूर्ण केलं. येत्या शनिवारी भारताचा सामना पाकिस्तान सोबत होणार आहे. 

****

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या संजय गांधी, श्रावणबाळ, वृध्दापकाळ योजनेचे प्रस्ताव पंधरा दिवसात मंजूर करण्याची मागणी आमदार विजय भांबळे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

*****

एक जून पासून सुरू असलेल्या शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती संघटनेनं काल परभणी जिल्ह्यात गंगाखेड - परळी रस्त्यावर दोन तास रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे या रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. पोलिस उपअधिक्षक नारायण शिरगावकर यांनी आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारलं.

****

आंतरराष्ट्रीय रेल्वे क्रॉसिंग दिनानिमित्त काल नांदेड इथं विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले. नांदेड ते पूर्णा रेल्वे मार्गावरील एका फाटकावर नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, त्रिकालज्ञ राभा यांनी गावकऱ्यांना आणि रस्ता वाहन चालकांना रेल्वे फाटक ओलांडतांना घेण्याच्या सावधानीची माहिती दिली.

****

परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या अवलगाव महसूल मंडळातल्या गारपीटग्रस्त पाच शेतकऱ्यांनी काल तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. गेल्या १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपीटीमुळे पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शासनानं एक कोटी ८४ लाख रुपयांचा निधी दिला होता. मात्र, संबधित गावांचे तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांनी संगनमत करून केवळ मर्जीतल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.

****

नाशिक जिल्ह्यात चांदवड जवळ काल ट्रक आणि लक्झरी बसच्या अपघातात दहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तेरा जण जखमी झाले. काल सकाळी हा अपघात झाला. मृत सर्वजण उल्हासनगर आणि कल्याणचे रहीवाशी आहेत. जखमींवर नाशिकच्या रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

//*********//


No comments: