Thursday, 7 June 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 07.06.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 7 June 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ७ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशाच्या विकासात विज्ञान महत्वाची भूमिका बजावत असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला चार वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त आज नवी दिल्ली इथं आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. मंत्रालयानं विविध संस्थांना संशोधनासाठी आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य केल्याचं त्यांनी सांगितलं. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आणि पाच हजार स्टार्ट अप कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात आल्याचं ते म्हणाले.

****

शालेय परीक्षांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण न करण्याच्या धोरणात बदल करण्याची मागणी २५ राज्यांतल्या शाळांनी केली असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ‘स्वयम्’ या पोर्टलमुळे उच्चशिक्षण क्षेत्राला नवी झळाळी मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

दिल्लीच्या विशेष न्यायालयानं गँगस्टर अबू सालेम याला पाच कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. २००२ मध्ये दिल्लीतल्या एका व्यावसायिकाकडून त्यानं ही खंडणी मागितली होती. गेल्या महिन्यात २६ तारखेला सालेमला या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं.

****

राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी आणि सुरक्षित अन्न मिळावं, यासाठी शासन कटिबद्ध असून, सर्व अन्न खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सोबत घेऊन मोहीम राबवणार असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं आहे. मुंबई इथं आज जागतिक अन्न सुरक्षितता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अन्न सुरक्षिततेच्या बाबतीत राज्यानं अनेक नव्या योजना राबवण्यास सुरुवात केली असून, यासाठी गावागावात जाऊन प्रबोधन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

वन विभागामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियानामध्ये मागील तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कामं करण्यात आल्यानं वनांतल्या जलव्याप्त क्षेत्रात ४३२ चौरस किलोमीटरची भरीव वाढ झाली आहे. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल २०१७ मध्ये याची नोंद करण्यात आली आहे. जलयुक्त वन कार्यक्रमाचं हे फलित असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. २०१५ च्या भारतीय वन स्थिती अहवालात एकूण जलव्याप्त क्षेत्र एक हजार ११६ चौरस किलोमीटर होतं ते २०१७ मध्ये वाढून एक हजार ५४८ चौरस किलोमीटर इतकं झालं आहे.

****

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन आणि डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी या संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येईल. या निकालाची विद्यार्थ्यांना प्रिंट घेता येईल, तसंच हा निकाल एसएमएस सेवेद्वारे मोबाईलवरही उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी दिली.

****

औरंगाबाद शहरातल्या विभागीय क्रीडा संकुलाची सुरक्षितता, स्वच्छता या बाबींची प्राधान्यानं पूर्तता करुन मूलभूत सोयी-सुविधांसह क्रीडा संकुल अद्ययावत करावं, असे निर्देश विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीचे अध्यक्ष, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी दिले. औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या बैठकीत ते आज बोलत होते.

****

धुळे जिल्ह्यातल्या महत्त्वाकांक्षी प्रकाशा-बुराई उपसा जलसिंचन योजनेतून शिंदखेडा तालुक्यातल्या मालपूर इथल्या अमरावती मध्यम प्रकल्पात १० दशलक्ष घनमीटर, तर वाडी-शेवाडी प्रकल्पात सहा दशलक्ष घनमीटर पाणी टाकण्यास राज्य नियामक मंडळानं मंजुरी दिली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच नियामक मंडळाच्या बैठकीत याला मान्यता प्रदान केली.

****

क्वालालांपूर इथं सुरु असलेल्या महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतानं श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर ठेवलेलं १०८ धावांचं लक्ष्य भारतीय संघानं १९व्या षटकातच पूर्ण केलं. येत्या शनिवारी भारताचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. 

****

भारतीय हवामान खात्यानं पुढचे सहा दिवस राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, आजपासून ते ११ जून या कालावधीत मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरीकांनी सावधगिरी बाळगावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्याच्या बहुतांश भागात आज पावसानं दमदार हजेरी लावली. मुंबईत आज सकाळी पावसाला सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत संपूर्ण मुंबईत पडलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

****

No comments: