Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 01 November 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ नोव्हेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø राज्यातल्या ११२ तालुक्यात गंभीर तर ३९ तालुक्यात
मध्यम दुष्काळ घोषित; मराठवाड्यातल्या ४८ तालुक्यांचा समावेश
Ø सर्वोच्च न्यायालयानं
याचिका फेटाळल्यानंतर आज नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणांमधून पैठणच्या जायकवाडी
धरणात पाणी सोडणार
Ø
सरदार वल्लभभाई पटेल
यांच्या १८२ मीटर उंचीच्या एकता पुतळ्याचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण
आणि
Ø एस टी ची हंगामी दहा टक्के भाडेवाढ मध्यरात्रीपासून
लागू
****
राज्यातल्या २६ जिल्ह्यातल्या एकूण १५१ तालुक्यांमध्ये
काल सरकारनं दुष्काळ जाहीर केला. यापैकी ११२ तालुक्यात गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम
दुष्काळ असल्याचं सरकारनं घोषित केलं. मराठवाड्यातल्या ४५ तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ
तर तीन तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यात
औरंगाबाद आणि बीड या दोन जिल्ह्यात संपूर्णपणे गंभीर दुष्काळ तर जालना, उस्मानाबाद,
आणि परभणी जिल्ह्यात काही तालुके वगळता, गंभीर दुष्काळ जाहीर झाला आहे. नांदेड जिल्ह्यातल्या
मुखेड आणि देगलूर तालुक्यात गंभीर तर उमरी तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे.
लातूर जिल्ह्यातला शिरूर अनंतपाळ, आणि हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्याचा मध्यम
दुष्काळ असलेल्या तालुक्यांमध्ये समावेश आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारणाशी
संबंधित आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांवर
याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
****
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणांमधून पैठणच्या
जायकवाडी धरणात पाणी सोडण्याविरोधात अहमदनगरच्या विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि
इतरांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं, फेटाळून लावत, मुंबई उच्च न्यायालयाचा
निर्णय कायम ठेवला आहे. यामुळे आता या दोन जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी
सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आज सकाळी आठ
वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे
विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. निळवंडे धरणातून तीन पूर्णांक
८५ दशलक्ष आणि मुळा धरणातून एक पूर्णांक ९०
दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. न्यायालयाचा आदेश असल्यानं कुणीही आंदोलन करून
विसर्गात अडथळा आणू नये, तसंच पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं कुणीही नदीपात्रात उतरू
नये, असं आवाहन देशमुख यांनी केलं आहे.
याशिवाय प्रवरा धरणातून ३ पूर्णांक ८५ दशलक्ष घनफूट,
गंगापूर धरणातून अर्धा दशलक्ष घनफूट, दारणा धरणातून २ पूर्णांक ४ दशांश दशलक्ष घनफूट,
पालखेड समूहातून अर्धा दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात येणार आहे.
****
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या व्यक्तिमत्वात
कौटिल्याची कूटनीती आणि शिवाजी महाराजांच्या शौर्याचा संगम असल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल गुजरातमध्ये नर्मदा जिल्ह्यात स्टॅच्यू ऑफ युनिटी या
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करताना बोलत होते. जगातला सर्वात उंच
असलेला सरदार पटेल यांचा हा १८२ मीटर उंचीचा भव्य पुतळा साकारणारे शिल्पकार राम सुतार
यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या पुतळ्याच्या परिसरात साकारण्यात आलेल्या पुष्पवाटिका
तसंच वॉल ऑफ युनिटीचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते काल करण्यात आलं. देशभरातल्या
विविध ठिकांणाहून आणलेल्या मातीपासून तयार केलेल्या या भिंतीवर ‘एक भारत - श्रेष्ठ
भारत’ हे वाक्य १७ भारतीय भाषांमधून लिहिलेलं आहे. हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्समधून यां
पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
****
सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा
संदेश देण्यासाठी देशभरात काल एकता दौड काढण्यात आली. मुंबईत राज्यपाल सी विद्यासागर
राव तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला. राज्यपाल
तसंच मुख्यमंत्र्यांनी सरदार पटेल तसंच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
मराठवाड्यात औरंगाबाद इथं, महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस आयुक्त चिरंजीव
प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौडला सुरुवात
झाली.
क्रांतीचौक ते महावीर चौकापर्यंत आयोजित या एकता
दौडमध्ये, लहान मुलांसह युवक-युवती तसंच अनेक नागरिक सहभागी झाले. उपस्थित मान्यवरांनी
राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली. महावीर चौक इथं एकता दौडचा समारोप झाला, विजेत्या स्पर्धकांचा
यावेळी पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
बीड
इथं आयोजित एकता दौडला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी हिरवा झेंडा दाखवला. लातूर, उस्मानाबाद, परभणी,
हिंगोली, नांदेड आणि जालना इथंही एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची
पुण्यतिथी काल देशभर राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून पाळण्यात आली. यानिमित्तानं त्यांना
सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या
अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिल्लीत शक्तीस्थळ इथं इंदिरा
गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन अदाराजली जली वाहण्यात आली.
****
नागरिकांना
शिधापत्रिकेवर आता धान्याबरोबरच रास्तभाव दुकानातून लोह आणि आयोडिनयुक्त शुद्ध मीठाचा पुरवठा करण्यात येणार आहे. तर राज्यातल्या सामान्य नागरिकांना सुद्धा
शिधापत्रिकेशिवाय शिधावाटप दुकानातून हे मीठ मिळणार असल्याचं अन्न आणि नागरी
पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं. मुंबईमधल्या गिरगाव इथं काल नागरिकांना आयोडिनयुक्त मीठाचं प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आलं,
त्यावेळी ते बोलत होते. लोह आणि आयोडिनयुक्त शुद्ध मीठ प्रति किलो १४
रुपये दरानं उपलब्ध करुन देण्यात आलं
असल्याचं त्यांनी सांगितलं. दीवाळीच्या
पार्श्वभूमीवर शिधापत्रिकेवर चणाडाळ तसंच उडीद डाळ ही वितरीत केली जाणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्य सरकारच्या चार वर्षपूर्ती निमित्त सरकारच्या
विविध धोरणांचा निषेध करण्यासाठी प्रदेश युवक काँग्रेसनं काल राज्यभरात विडबंनात्मक
योगासन आंदोलन केलं. औरंगाबाद इथं प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे
यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झालं.
****
राज्य परिवहन महामंडळ- एस टी ची हंगामी भाडेवाढ मध्यरात्रीपासून
लागू झाली आहे. येत्या २० नोव्हेंबरपर्यंत सर्व प्रवासी भाड्यात १० टक्के हंगामी वाढ
करण्यात आली आहे. २१ नोव्हेंबरपासून पुन्हा मूळ प्रवास भाडं लागू होईल.
****
सहकार पुरस्कारांचं काल मुंबईत सहकार मंत्री सुभाष
देशमुख यांच्या उपस्थिती वितरण करण्यात आलं. या पुरस्कारांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या
सिल्लोडची अंधारी विकास सेवा संस्था, लातूरची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, परभणीची
वैश्य नागरी सहकारी बँक, या संस्थांना सहकार भूषण तर लातूर जिल्ह्यातल्या औसा इथल्या
औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेला सहकार निष्ठ पुरस्कारांन सन्मानित करण्यात आलं
आहे.
****
विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी काल उस्मानाबाद
जिल्ह्यात दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य शासन मराठवाड्याच्या विकासासाठी
करत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ
निवारणासाठी मागेल त्याला काम, पाण्याचे साठे पिण्यासाठी राखीव ठेवणं, चाऱ्याचं नियोजन,
शेतीसाठी सुक्ष्म सिंचन वाढवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
****
परभणी इथं वीज वितरण कंपनीच्या निराशाजनक कामकाजाविरोधात
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन आंदोलन केलं. वीज गळतीच्या
नावाखाली ग्राहकांना देण्यात येणारी जादा रकमेची बिलं रद्द करावी, शेतीला नियमित वीज
पुरवठा करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
कोल्हापूर
जिल्ह्यात पंडित दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी
सुरू आहे. या योजनेतून आतापर्यंत कोल्हापूर शहरातल्या २२२ युवक युवतींनी लाभ घेतला.
त्यांनी तीन कोटी रुपयांचे कर्ज घेऊन विविध स्वयंरोजगार सुरु केले आहेत. याचबरोबर दोन
हजार ५०० युवक-युवतींनी किमान कौशल्याधारित विविध १६ अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण घेतले
आहे. या योजनेच्या लाभार्थी श्रध्दा लोहार यांनी आपला अनुभव सांगितला, त्या म्हणाल्या ….
दीनदयाळ अंत्योदय
योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानंअंतर्गत
मी गुरू कंप्यूटर एज्यूकेशन शुक्रवार पेठ येथे वेब डिंझायंनिग कोर्सचे प्रशिक्षण घेतले. आता या कोर्समुळे मी कागल येथे
वर्षाटे कंप्यूटर मध्ये वेब डिंझायंनिग शिकवण्यासाठी नौकरी मिळाली. खरच या योजनेचा
लाभ गोरगरीबासाठी अंत्यत उपयूक्त आहे. धन्यवाद.
****
उद्योग-व्यवसायात यशाला कुठलाही शॉर्टकट नाही, त्यामुळे
सचोटी, जिद्द आणि मेहनतीलाही पर्याय नसतो, असं मत जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टचे संचालक
विवेक देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे. लातूरच्या एम्स संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार
देशपांडे यांना काल प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. चांगल्या मार्गाने
उद्योग करून समाजमान्यता मिळवता येते असंही ते बोलत होते.
****
मराठी रंगभूमी दिनानिमित्त परिवर्तन नाट्य संस्थेच्या
वतीनं देण्यात येणारा परिवर्तन नाट्य पुरस्कार अभिनेते संजय कुलकर्णी - सुगावकर यांना
जाहीर झाला आहे. औरंगाबाद इथल्या तापडिया नाट्यमंदिरात आज सायंकाळी साडे सहा वाजता
हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल. यावेळी पु.ल. देशपांडे यांच्या नाटकातल्या
निवडक उताऱ्यांचं सादरीकरण होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment