Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 November 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०३ नोव्हेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø सुक्ष्म, लघू
आणि मध्यम उद्योजकांना ५९ मिनिटांत एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची
पंतप्रधानांची घोषणा
Ø शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरती करण्यास परवानगी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
Ø मराठवाड्यातल्या पाणीपुरवठ्याच्या १५१
प्रकल्पाचं भूमिपूजन
Ø गंगापूर - पालखेड ऐवजी इगतपुरी तालुक्यातल्या भाम, भावली,
मुकणे आणि वाकी धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडणार
आणि
Ø नांदेडच्या स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी मुंबईच्या राजीव गांधी तंत्रज्ञान
संस्थेचे प्राचार्य डॉ. उद्धव भोसले यांची नियुक्ती
****
सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना आता ५९ मिनिटांत
एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली
आहे. नवी दिल्लीत काल सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग आधार आणि मदत कार्यक्रमाचा प्रारंभ
केल्यानंतर ते बोलत होते. वस्तु आणि सेवा कर- जीएसटीची नोंदणी केलेल्या प्रत्येक सुक्ष्म,
लघू आणि मध्यम उद्योजकांना एक कोटी रुपयांच्या कर्जात व्याजावर दोन टक्के सूट दिली
जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. या उद्योगांमुळे कोट्यावधी लोकांना रोजगार मिळतो,
असं सांगून पंतप्रधानांनी उद्योजकांना सोप्या आणि स्वस्त दरात कर्ज, उत्पादन विक्रीसाठी
बाजार, उद्योजकांना वेळेवर भरणा, सरकारी दखल कमी आणि उद्योग प्रक्रिया सोपी होणार असल्याचं
त्यांनी नमूद केलं. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची अर्थव्यवस्था देशासाठी महत्वपूर्ण
असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी सांगितलं.
****
विद्यापीठं आणि
महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा भरतीचा मार्ग आता मोकळा
झाला आहे. महाराष्ट्र शासन शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या ४ हजार ७३८
जागा भरतीचा मार्ग मोकळा झाला असून आता महाविद्यालयांना या जागा भरण्याची
अनुमती दिली जाईल, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. ते
काल मुंबईत बोलत होते. त्याचबरोबर तासिका तत्वावर काम करणाऱ्या
अध्यापकांच्या मानधनामध्ये सुध्दा वाढ करण्यात आली असल्याची माहिती तावडे यांनी दिली.
****
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी
महाराजांच्या स्मारकाच्या बांधकामाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार
दिला. दुष्काळासह इतर आर्थिक अडचणी राज्यापुढे असताना स्मारकाच्या बांधकामावर अवाढव्य
खर्च करायला हरकत घेणाऱ्या तीन जनहित याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यावर मुख्य
न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या पीठासमोर काल सुनावणी
झाली. तीन हजार ६०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद या स्मारकासाठी करण्यात आल्याचं सरकारच्यावतीनं
दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. स्मारकाचा निर्णय हा धोरणात्मक असल्याचं
सांगून न्यायालयानं स्मारकाचं काम थांबवण्यास नकार दिला.
****
मुख्यमंत्री
पेयजल योजनेतून मराठवाड्यात ४२५ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या
५५८ कोटी रूपयांची १९९ योजनांची कामं सुरू असल्याची माहिती पाणी पुरवठा आणि
स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं काल मराठवाडा
विभागातल्या १३८ कोटी ९० लाख रूपये खर्चाच्या १५१ प्रकल्पाचं भूमिपूजन लोणीकर
यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. येत्या सहा महिन्यांत
मराठवाडा वॉटर ग्रीडच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान,
टंचाई उपाय योजना आणि मराठवाड्यातल्या विविध
पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक काल लोणीकर
यांनी घेतली. टंचाईच्या उपायात्मक कामांचा वेग वाढवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
येत्या मार्चपर्यंत मुख्यमंत्री ग्रामीण
पेयजल योजनेतल्या सर्व जिल्ह्यातली कामं
पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी केली.
टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातला उत्पादीत चारा पशुधनास पुरेसा उपलब्ध
व्हावा या दृष्टीनं जिल्ह्यातून पर जिल्ह्यात आणि पर राज्यात होणाऱ्या चारा वाहतुकीस
मनाई करण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
मराठवाड्यासाठी नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर आणि
पालखेड या धरणांऐवजी इगतपुरी तालुक्यातल्या भाम, भावली, मुकणे आणि वाकी या धरणांमधून
पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय काल घेण्यात
आला. नाशिक तालुका दुष्काळी असून या धरणातून तसंच पालखेड धरणातूनही मराठवाड्यासाठी
पाणी सोडू नये यासाठी काल नाशिकच्या जलसंपदा
खात्याच्या कार्यालयावर दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आलं त्यानंतर हा निर्णय घेण्यात
आला.
दरम्यान, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतल्या धरणांमधून
सोडण्यात आलेलं पाणी जायकवाडी धरणात काल दाखल झालं. रात्री दहा वाजेच्या सुमारास हे
पाणी धरणात दाखल झाल्याचं पाटबंधारे विभागाच्या सूत्रानं सांगितलं.
****
शिक्षण संस्थाचालकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात
राज्य शिक्षण संस्था महामंडळानं पुकारलेल्या महाराष्ट्र शैक्षणिक बंदला काल राज्यात
संमिश्र प्रतिसाद मिळाला. खाजगी शिक्षण संस्थांनी शैक्षणिक संस्था बंद ठेवल्या होत्या,
मात्र जिल्हा परीषद तसंच निमसरकारी संस्थांच्या शाळा - महाविद्यालयं सुरळीत सुरू होत्या.
मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात
या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शिक्षण संस्थाचालक महासंघाचे अध्यक्ष रामदास पवार
यांनी काल ही माहिती दिली. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्य सरकार शिक्षण संस्थाचालकांच्या
हक्कांवर गदा आणत असून शिक्षण संस्थांचं शिक्षकेत्तर अनुदान पूर्वीप्रमाणे मिळावं यासह
इतर मागण्यांसाठी हा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या
कुलगुरूपदी मुंबईच्या राजीव गांधी तंत्रज्ञान संस्थेचे प्राचार्य डॉ. उद्धव भोसले यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी एका आदेशाद्वारे ही नियुक्ती
केली आहे. डॉ.पंडित विद्यासागर यांचा कार्यकाळ गेल्या ३१ ऑगस्टला संपल्यामुळे ही नियुक्ती
करण्यात आली आहे.
****
दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातल्या
वाहतुकीत सकाळी आठ वाजेपासून रात्री सहा वाजेपर्यंत
बदल करण्यात आला आहे. अंबड चौफुली ते सिटीजन टी पॉईंट या मार्गावरील वाहतूक भोकरदन
चौफुली, मंठा चौफुली मार्गावर वळवण्यात येत असल्याचं पोलीस प्रशासनातर्फे कळवण्यात
आलं आहे.
****
राष्ट्रीय
ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातल्या
टेंभुर्णी इथल्या आणि लातूर तालुक्यातल्या मुरुड शहराच्या पाणी पुरवठा योजनेला
प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. टेंभुर्णी इथं सात कोटी ४० लाख रुपयांची तर मुरुड
इथं ३५ कोटी ९१ लाख रुपयांची ही योजना असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
परभणी शहरात डेंग्यू आजाराचं प्रमाण वाढलं असून,
नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन महापौर मीना वरपुडकर यांनी केलं आहे. महापालिकेच्या
वतीनं डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची
माहिती त्यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. आरोग्य विभागाच्या पथकानं गेल्या महिन्यात
घरोघरी भेट देऊन पाणीसाठ्याची पाहणी केली. ३०१ जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आल्यानंतर
१३ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं त्यांनी सांगितलं.
****
प्रधानमंत्री
आवास योजनेमुळे देशभरातील लाभार्थी समाधान व्यक्त करत आहेत. नाशिक जिल्ह्यातही या योजनेतून
घर मिळाल्यानं नागरिक आनंद व्यक्त करत आहेत. या योजनेविषयी जिल्ह्यातले लाभार्थी विजयेंद्र
बोरावळे यांनी आपलं मनोगत या शब्दात व्यक्त केलं -
नाशिक मध्ये स्वताःची हक्काची घर असावी अशी माझी
आणि माझ्या कुंटूंबीयांची खूप इच्छा होती. परंतू नाशिक सारख्या ठिकाणी घराचे दर खूप
असल्याने काही वर्षांपासून प्रयत्न करून देखील घर घेणे क्षक्य नाही झाले. मी घरासाठी
प्रयत्न सूरूच ठेवले. त्यात मला पंतप्रधान आवास योजनेची माहिती मिळाली. मी त्या नूसार बिर्ल्डर आणि संबधिताकडून माहिती घेऊन अर्ज केला. आणि मला घर घेण्यासाठी केंद्रसरकारच्या
पंतप्रधान आवास योजनेतून २ लाख ६७ हजार रूपयांची मदत मिळाली. केंद्र सरकारच्या पंतप्रधान
आवास योजनेमधून माझे घराचे स्वप्न साकार झाले. त्या बद्दल मी सरकारचा आभारी आहे.
****
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला
कुस्ती स्पर्धकांना कालपासून औरंगाबाद इथं प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठातल्या भारतीय क्रिडा प्राधिकरण- साई केंद्राच्या परिसरात प्रकुलगुरु अशोक
तेजनकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं. देशभरातून ८७ विद्यापीठांचे ७५० खेळाडू
या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
****
लातूर जिल्ह्यात आणि शहरात येत्या २७ नोव्हेंबर पासून ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातल्या बाळांना, आणि मुली-मुलांसाठी गोवर लसीकरण मोहिम
राबवण्यात येणार आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शिक्षण संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा
परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली जामदार यांनी काल लातूर इथं बोलतांना केलं.
****
औरंगाबाद
महापालिकेची रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांचा बाह्यरुग्ण विभाग दिवाळीच्या काळात सहा
आणि आठ नोव्हेंबरला नियमितपणे कार्यरत राहणार आहे. तसंच मनपाची जी रुग्णालयं २४ तास
कार्यरत आहेत, ती सुद्धा नियमित सुरु राहतील, असं महापालिकेनं पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेना वाटेल
ती मदत करायला तयार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत
काल शिवसेना आमदार, संपर्क नेते, जिल्हा पदाधिकारी यांची बैठक झाली, त्यानंतर वार्ताहर
परिषदेत ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी राम मंदीर मुद्यावरुन सरकार आणि राष्ट्रीय
स्वयंसेवक संघावर टीका केली.
******
***
No comments:
Post a Comment