Tuesday, 13 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.11.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१३  नोव्हेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सिंगापूर दौऱ्यावर रवाना होणार आहेत. उद्या सिंगापूरमध्ये होणाऱ्या तेराव्या पूर्व आशियाई शिखर परिषद आणि अन्य संबंधित बैठकांमध्ये ते सहभागी होणार आहेत. त्यांचा हा दुसरा सिंगापूर दौरा असून, ते पाचव्यांदा पूर्व आशियाई शिखर परिषदेत सहभागी होतील. पंतप्रधान मोदी अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेस तसंच अन्य देशांच्या नेत्यांशी या दौऱ्यात द्वीपक्षीय चर्चा करतील.

****



 केंद्रीय संसदीय कार्य मंत्री अनंत कुमार यांच्या पार्थीव देहावर आज दुपार नंतर बंगळुरूमध्ये संपूर्ण राजकीय सन्मानानं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बंगळुरू इथल्या भाजपच्या कार्यालयात त्यांचं पार्थीव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री बासवनागुडी इथं त्यांच्या निवासस्थानी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या एका विशेष बैठकीत आज सकाळी दिवंगत मंत्री अनंत कुमार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

****



 पंजाब नॅशनल बँक आर्थिक घोटाळ्यातला फऱार आरोपी मेहुल चोक्सी याच्या कंपनीतला अधिकारी दीपक कुलकर्णी याला मुंबईच्या विशेष न्यायालयानं काल चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कुलकर्णी हा चोक्सीचे परदेशातले व्यवसाय सांभाळत होता. त्याला गेल्या आठवड्यात सक्त वसुली संचालनालयानं कोलकाता विमानतळावरून अटक केली होती.

****



 विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांना प्रत्यक्ष भेटून विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा भारतीय जनता पक्षाचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. यासंदर्भात राज्यातल्या, भाजपच्या  सगळ्या आमदारांना अनिल गोटे यांनी खुलं पत्र दिलं आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा व्यक्तींना सन्मानानं भाजपत घेतलं जात असल्यानं आपण राजीनामा देत असल्याचं गोटे यांनी म्हटलं आहे.

****



 औरंगाबादमधल्या सातारा पोलिस ठाण्याचा सहायक  फौजदार  नारायण बऱ्हाटे याला वीस हजार रुपयांची लाच घेताना काल अटक केली. सातारा राज्य राखीव दलात सहायक फौजदार  असलेल्या तक्रारदारावर, त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्याचा अहवाल वरिष्ठांना देण्याची धमकी देत बऱ्हाटे यानं त्याच्याकडे लाचेची मागणी केली होती.

*****

***

No comments: