Tuesday, 13 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.11.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 November 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ नोव्हेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो उद्या संवाद उपग्रह जी सॅट २९ चं प्रक्षेपण करणार आहे. या उपग्रहाला जीएसएलव्ही मार्क थ्री या प्रक्षेपकातून सोडण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या संध्याकाळी पाच वाजता हे प्रक्षेपण केलं जाणार आहे. जी सॅट २९ हा उपग्रह १० वर्षांपेक्षा अधिक काळ काम करेल आणि दूरवरच्या भागातली माहिती पुरवण्यास मदत करेल.

****



 राफेल लढाऊ विमान बनवणारी डसॉल्ट एव्हिएशन या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रपियर यांनी, या खरेदी व्यवहारासंबंधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले गैरव्यवहाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या व्यवहारांविरुद्धच्या आरोपांवर प्रतिक्रीया नोंदवली. या करारात रिलायंस कंपनीला भागीदार करण्याचा निर्णय पूर्ण दसॉल्ट कंपनीचा होता, यात भारत सरकारनं हस्तक्षेप केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

****



 नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राचे प्रकाशक असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड यांची दिल्लीतली जागा रिकामी करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशाला या कंपनीनं दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं असून, या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची गरज नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती सुनिल गौर या याचिकेवर येत्या गुरुवारी सुनावणी घेणार आहेत. नगर विकास मंत्रालयानं ३० ऑक्टोबरला या कंपनीसोबत असलेला ६५ वर्षांपासूनचा भाडेकरारनामा रद्द करण्याचे आदेश दिले होते.

****



 आरोग्याचा सखोल अभ्यास करुन दमा, श्वसनाचे इतर आजार आणि कर्करोगासारख्या समस्यांवर उपाय शोधण्याची गरज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे. ते काल नवी दिल्ली इथं जैवतंत्रज्ञान विभाग आणि वेलकम ट्रस्ट यांच्या भागीदारीला दहा वर्षे झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मधुमेह, अतिदाब, ह्दयविकार अशा आजारांचं प्रमाण वाढत आहे, या आजारांवर प्रतिबंध आणि उपचार या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत, असं ते म्हणाले. पृथ्वीचं, त्यावरच्या प्रजातींचं, आणि त्यांच्या भविष्याचं रक्षण करण्याच्या लढाईतले सैनिक अशा शब्दात त्यांनी शास्त्रज्ञांचा गौरव केला.

****



 ट्विटरवरचा आक्षेपार्ह मजकूर ताबडतोब काढून टाकण्याची यंत्रणा कायमस्वरुपी चालू ठेवण्याची खबरदारी घेण्याचे निर्देश सरकारनं ट्विटरला दिले आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थानी अशा यंत्रणेची अट घातल्यावरुन हे निर्देश देण्यात आले आहेत. आक्षेपार्ह मजकुराविरुध्द प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी काल नवी दिल्लीत ट्विटरच्या अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेतल्याची माहिती, अधिकृत प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली. भारतासाठी २४ तास उपलब्ध असणाऱ्या तक्रार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचनाही यावेळी या देण्यात आल्या. यापूर्वी हिंसाचाराला चिथावणी देणारा ट्विटरवरचा मजकूर हटवण्याची कायदेशीर विनंती दिल्ली पोलिसांनी केल्यावर ट्विटरनं दिरंगाई करुन असमाधानकारक पध्दतीनं काम केलं होतं. 

****



 भारतीय व्यवस्थापन संस्था - आयआयएमचं नवं संचालक मंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. २०१७ च्या आय.आय.एम. कायद्यानुसार हे नवं मंडळ स्थापन केलं जाणार आहे. ही प्रक्रिया पुढच्या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पूर्ण होईल. देशाच्या उच्च शिक्षण व्यवस्थेतल्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संस्थांना संपूर्ण स्वायत्तत्ता मिळावी यादृष्टीनं हे मोठं पाऊल आहे, असं  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.   

****



 अंधश्रध्दा निमूर्लन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात बेकायदा प्रतिबंधक हालचालीचं कलम - यूएपीएचा समावेश करण्यात यावा, असा अर्ज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं न्यायालयात दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर सीबीआयनं सनातनचा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, अमित दिगवेकर, राजेश बंगेरा आणि अमोल काळे यांना अटक केली होती. या गुन्ह्यात यूएपीएचं कलम अंर्तभूत करण्यासाठी तसंच आरोपींविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, असे दोन वेगवेगळे अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.

****



 हाँगकाँग खुली बॅडमिंटन स्पर्धा आज कोवलून इथं सुरु होत आहे. त्यात भारताच्या पी व्ही सिंधूचा पहिला सामना थायलंडच्या निचॉन जिंदापालशी होणार आहे. सलामीच्या फेरीत सायना नेहवालची लढत जपानच्या अकाने यामागुचीशी होईल. पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांतचा सामना हाँगकाँगच्या वाँग विंग की विन्सेंटशी, तर एचएस प्रणॉयचा मुकाबला डेन्मार्कच्या अ‍ॅडर्स अ‍ॅटन्सनशी होणार आहे. बी. साई प्रणीत आणि समीर वर्माही पुरुष एकेरीत खेळत आहेत.

*****

***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.09.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 September 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवा...