Wednesday, 14 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.11.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14  November 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ नोव्हेंबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



§  शासकीय आणि गायरान जमिनींवरही ‘सर्वांसाठी घरं’ योजना राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

§  अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सेवा समाप्तीच्या वयात वाढ

§  तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना ‘पु.ल स्मृती सन्मान’ तर प्रतिभावान संगीतकार हदयनाथ मंगेशकर यांना ‘पु. ल. जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर

§  अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातल्या उद्योजकांसाठी उद्यापासून औरंगाबाद इथं उद्योजक विकास परिषद आणि औद्योगिक उत्पादन प्रदर्शन

आणि

§  औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर दोन तस्कारांकडून एक कोटी रूपयांची सोन्याची बिस्कीटं जप्त

****



 शासकीय आणि गायरान जमिनींवरही आता ‘सर्वांसाठी घरं’ ही योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला. यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियमात दुरुस्ती करण्यात येणार असून, यामुळे परवडणाऱ्या घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होणार आहे.



 काम करण्यास सक्षम असलेल्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं सेवा समाप्तीचं वय ६० वरून ६५ वर्षे करण्याचा निर्णयही  मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आरोग्य सक्षमतेचं प्रमाणपत्र सादर केल्यानंतर प्रथम तीन वर्ष आणि पुढे आणखी दोन वर्ष सेवा करता येईल.

 

 मदत आणि पुनर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश करण्याचा, तसंच पुण्याच्या गुंजवणी प्रकल्पासाठी द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला आहे.



 या बैठकीत ‘अवनी’ वाघीणीच्या मृत्यूबाबतचा वाद उपस्थित झाला. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं की त्यांनी यावेळी या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली.

****



 भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज संवाद उपग्रह जी सॅट २९ चं प्रक्षेपण करणार आहे. या उपग्रहाला जीएसएलव्ही मार्क थ्री या प्रक्षेपकातून सोडण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून संध्याकाळी पाच वाजता हे प्रक्षेपण केलं जाईल. जी सॅट २९ हा उपग्रह १० वर्षांपेक्षा अधिक काळ अवकाशाता कार्यरत राहील आणि दूरवरच्या भागातली माहिती तो उपलब्ध करून देईल.

****



 आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना ‘पु.ल स्मृती सन्मान’ तर प्रतिभावान संगीतकार हदयनाथ मंगेशकर यांना ‘पु. ल. जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पु.ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदाच्या पुलोत्सव कार्यक्रमात संगीत, कला तसंच साहित्य क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव केला जाणार असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ, लेखक डॉ. जयंत नारळीकर आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द फडणीस यांचाही या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. येत्या १७ ते २५ नोव्हेंबर दरम्यान पुण्यात ‘पुलोत्सव’ कार्यक्रम होणार आहे.

****



 केंद्रीय सूक्ष्म, लघु मध्यम उपक्रम मंत्रालय आणि उद्योग विभाग तसंच राज्य उद्योजकता विकास केंद्रातर्फे अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील उद्योजकांसाठी उद्यापासून उद्योजक विकास परिषद आणि औद्योगिक उत्पादन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे, असं उद्योग संचालक विकास जैन यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितल.  औरंगाबाद शहरातल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेत आणि प्रदर्शनात राज्यभरातील ५०० उद्योजक सहभागी होणार असून उद्योजकांच्या क्षमता वृद्धीसाठी नामांकीत संस्था, उद्योजक मार्गदर्शन करणार आहेत.

****



 नाथ ग्रुप आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयातर्फे औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यात धनगाव इथं उभारण्यात आलेल्या राज्यातल्या  सर्वात मोठ्या फूडपार्कचं उद्घाटन उद्या केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते होणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे देखील यावेळी उपस्थीत राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 उस्मानाबाद आणि तुळजापूर परिसरात काल दुपारी दोन वाजून ४४ मिनीटांनी जमिनीतून जोरदार आवाज झाला. आवाज मोठा असल्यामुळे घरांच्या खिडक्या, तावदानं हादरली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 औरंगाबाद इथल्या चिकलठाणा विमानतळावर काल रात्री दिल्लीहून आलेल्या दोन तस्कारांकडून अंदाजे एक कोटी रूपयांची सोन्याची बिस्कीटं उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. दिल्लीहून आलेल्या एअर इंडीयाच्या विमानात सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती, त्यानुसार संशयित दोघांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सोन्याची बिस्कीटे आढळली. एक कोटी रूपयांचे तस्करीचे सोने जप्त करण्याची औरंगाबादेमधली ही पहिलीच घटना आहे.

****



 नांदेड जिल्ह्यातल्या मालेगाव इथं काल जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकानं अचानक धाडी टाकून १३ तंबाखू विक्रेत्यांकडून चार हजार ९०० रुपये दंड वसूल केला. जिल्हा रुग्णालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाला प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात कुठेही तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास नागरिकांनी तक्रार करण्याचं आवाहन नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केलं आहे.

****



 धनगर समाजाला तात्काळ अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं, या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे काल औरंगाबाद इथं कोकणवाडी ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास एक जानेवारी पासून राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या  आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार रामराव वडकुते यांनी यावेळी दिला. आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचं निवेदन यावेळी  विभागीय आयुक्तांना देण्यात आलं.

****



 बुलडाणा जिल्ह्यात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन आणि इतर साहित्य मिळाल्यानं अनेक शेतकरी आपल्या शेतात पिकाला पाणी देऊन उत्पन्न वाढवत आहेत. जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातल्या घाटपुरी इथले लाभार्थी संतोष महारखेडे यांनी या योजनेच्या लाभाविषयी दिलेली ही माहिती -

माझ्या शेतात विहिर असल्यामुळे पाण्याची वेवस्था आहे. मला पाणी नेण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. मला पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची माहिती मिळाली. त्याकरीता कृषीविभागाकडे मी अर्ज सादर केला. त्यानंतर मला पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून ठिबक सिंचन साहित्य मिळाले. म्हणून मी माझ्या शेतातली पिकाला पाणी देऊ शकतो. माझ्या शेतात आता कपाशी, हरबरा, मक्का पिकांचे उत्पादन काढत असल्यामुळे मला त्यामधून भरपूर नफा मिळत असून, माझे जिवन सूखी आणि समृध्दी होत आहे. सद्या समाधानी जिवन जगत आहे. त्यामुळे मी व माझे कुंटूंब केंद्र सरकारचे आभारी आहे.

****



 हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदी अपंग कल्याण विभागाचे आयुक्त रूचेश जयवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची बदली अकोला इथं राज्य बियाणे महामंडळाचे कार्यकारी संचालक म्हणून करण्यात आली आहे.

****



 लातूर जिल्ह्यातल्या जळकोट इथले रोहित उत्तम शिंगाडे या जवानाचा काल कर्तव्य बजावतांना मृत्यू झाला. जम्मू काश्मीर भागातील सियाचिन ग्लेसियर इथं बर्फावरील टेकडीवरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान काल त्यांचा मृत्यू झाला.



 दरम्यान, बीड जिल्ह्यातल्या पाटोदा इथले जवान विजयकुमार ढगे यांच्या पार्थिवावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्यदलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. दिवाळी संपवून पंजाब इथं कर्तव्यावर परतत असतांना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचं निधन झालं होतं.

****



 वाळू वाहतूकदाराकडून अडीच हजार रूपयांची लाच घेणारा पोलिस नाईक सुनील जाहागिरदार याला काल जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. वाळू वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्याकडून कारवाई न करण्यासाठी दरमहा साडेतीन हजार रूपयांची मागणी जाहागिरदार यानं केली होती.



 बाल न्यायालयातला सहायक सरकारी अभियोक्ता दीपक राठोड यालाही जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  पोलिसांनी पाचशे रुपयांची लाच घेताना काल अटक केली. आरोपींना शिक्षा मिळेल अशा साक्षी साक्षीदारांकडून नोंदवून घेण्यासाठी दीपक राठोडनं तक्रारदाराकडं एक हजार रुपयांची लाच मागितली होती.

****



 मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळत नसल्यानं परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातले काही तरूण भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली भारतीय स्टेट बँकेसमोर तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. सुशिक्षित तरुणांना आर्थिक सक्षम करण्यासाठी कर्ज प्रस्तावांवर नियमानुसार कार्यवाही करुन तात्काळ कर्ज देण्याची मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे.

****



 विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उद्या आणि परवा दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते अनेक खेड्यांना भेटी देऊन दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

*****

***

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 30 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...