आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१४
नोव्हेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी सिंगापूर इथे जगातल्या सर्वात मोठ्या अर्थ-तंत्रज्ञान
महोत्सव फिनटेक ला संबोधित केलं. लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्याच्या अनेक
संधी तंत्रज्ञान देतं, असं नमूद करत, तंत्रज्ञान
हीच नव्या जगाच्या शक्तीची ओळख बनली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. दोन दिवसांच्या भेटीसाठी पंतप्रधान आज सिंगापूर इथे पोहचले आहेत. या भेटीत
ते पूर्व आशिया शिखर परिषद, आशियान-भारत अनौपचारिक बैठक आणि प्रादेशिक व्यापक आर्थिक
भागीदारी शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पंतप्रधान अमेरिकेसह इतर काही
देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत.
****
छत्तीसगडच्या
बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी आज सकाळी अत्याधुनिक स्फोटकांच्या सहाय्यानं केलेल्या
स्फोटात सीमा सुरक्षा दलाच्या सहा जवानांसह एक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. याठिकाणी
सुरक्षादलांची माओवाद्यांशी चकमक सुरू आहे.
****
आज देशभरात
बालदिन साजरा केला जात आहे. बालकांचे अधिकार, त्यांचं योग्य संगोपन आणि शिक्षण याबाबत
जागरूकता वाढवण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी, देशाचे
पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या दिवशी साजरा केला जातो. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी जयंतीच्या औचित्यानं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचं स्मरण
केलं आहे.
****
बंगालच्या
उपसागरात निर्माण झालेलं गज, हे समुद्री वादळ सातत्यानं तामिळनाडूच्या दिशेनं सरकत
असून, यामुळे तामिळनाडूच्या उत्तर किनाऱ्यावर आज संध्याकाळपासून पाऊस सुरू होईल, असं
हवामानखात्यानं म्हटलं आहे. हे वादळ चेन्नईपासून सुमारे पाचशे किलोमीटर्स दूर असून
ते ताशी ऐंशी किलोमीटर्स वेगानं पुढे सरकत आहे. संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी
पूर्णपणे सज्ज असल्याचं तामिळनाडू सरकारनं म्हटलं आहे.
****
राज्य सरकार
मुंबईच्या हाफकिन्स संस्थेच्या सहयोगानं राष्ट्रीय सर्पविष संशोधन केंद्र सुरू करणार
असून, यासाठी केंद्र सरकार तेवीस कोटी रुपयांचा निधी पुरवणार आहे. या केंद्रात सापांच्या
भारतात आढळणाऱ्या बावन्न प्रजाती आणि त्यातील
विषांचं संशोधन करण्यात येणार असून, त्यांचे सर्वोत्तम उतारे निर्माण करण्याच्या प्रक्रियांबाबतही
संशोधन होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment