Tuesday, 20 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.11.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20  November 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० नोव्हेंबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ; चालू वर्षासाठी २० हजार ३२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

Ø एल्गार परिषद संदर्भात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या मोबाईल क्रमांकाबाबत सखोल चौकशीची मागणी

Ø औरंगाबाद विभागातल्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एक रकमी विनाकपात पहिली उचल द्यावी- प्रादेशिक साखर संचालकांचे आदेश 

आणि

Ø राज्यात अनेक ठिकाणी काल अवकाळी पाऊस

****



 राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत प्रारंभ झाला. कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधी घोषणाबाजी केली. विधानसभेत विरोधकांच्या घोषणाबाजीतच विविध अहवाल तसंच २०१८-१९ च्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या, तसंच तीन विधेयकं सादर करण्यात आली. दोन्ही सभागृहात २० हजार ३२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आणि विधीमंडळाच्या दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. विधानपरिषदेत सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी शोकप्रस्ताव मांडला. अनेक सदस्यांनी दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण केली.



 रम्यान, काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेऊन अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. ३० नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात केवळ आठच दिवस कामकाज होणार असल्याची बाब त्यांनी यावेळी राज्यपालांच्या निदर्शनात आणून दिली.  

****



 एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या मोबाईल क्रमांकाचा संदर्भ असलेल्या पत्राबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणी पाच सामाजिक कार्यकर्त्यांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केल्यानंतर पुणे पोलिंसानी देशभर टाकलेल्या छाप्यांदरम्यान हे पत्र सापडलं आहे. दरम्यान मध्यप्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

****



 नव्यानं स्थापन झालेला महाराष्ट्र क्रांती सेना हा पक्ष राज्यातल्या ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचं पक्ष प्रमुख सुरेश पाटील यांनी सांगितलं. ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हातकणंगले तालुक्यातल्या वडगाव इथं पक्षाचा पहिला मेळावा घेण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****



 स्थूलता नियंत्रण मोहिमेसाठी राज्य शासनानं डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत ही मोहीम राबवण्यात येत आहे. आहार आणि आरोग्य यांच्यातल्या संबंधाबाबत संशोधन करून, स्थूलता नियंत्रण पद्धत विकसित करणारे, डॉक्टर दीक्षित यांच्या ज्ञानाचा, सामान्य जनतेला लाभ होईल, असं शासनानं म्हटलं आहे. डॉ. दीक्षित हे लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोगप्रतिबंधक आणि सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

****



 बांधकाम कामगारांच्या ‘विशेष नोंदणी अभियाना‘च्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते काल मुंबईत करण्यात आला. कामगार विभागानं याआधी राज्यात राबवलेल्या दोन विशेष नोंदणी अभियानांमधून साडेतीन लाखांहून जास्त बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 औरंगाबाद विभागातल्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना रास्त आणि किफायतशीर दरासहीत एक रकमी विनाकपात पहिली उचल द्यावी, असे आदेश प्रादेशिक साखर संचालकांनी दिले आहेत. काल औरंगाबाद इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची साखर संचालकांसमवेत बैठक झाली, त्यावेळी हा आदेश देण्यात आला. चालू गाळप हंगामात विनापरवाना गाळप सुरू केलेल्या कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्याचंही या वेळी सांगण्यात आलं.

****



 राज्यात अनेक ठिकाणी काल अवकाळी पाऊस झाला, तर अनेक भागात ढगाळ वातावरण होतं. उस्मानाबाद शहर आणि परिसरात काल पहाटे दोन तास चांगला पाऊस झाला. या पावसामुळे रबी पिकांना उपयोग होईल, तसंच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या वारंगा फाटा, आखाडा बाळापूर परिसरात काल दुपारी पावसानं हजेरी लावली. परभणी, लातूर तसंच सोलापूर जिल्ह्यातही काल पाऊस झाल्याचं वृत्त आहे.



 नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग तसंच रत्नागिरी जिल्ह्यातही काल पाऊस झाला.

****



 शेतीला पूरक आणि आरोग्यासाठी उपकारक अशा मध उत्पादनाची माहिती जनतेला व्हावी यासाठी लातूर शहरात मध महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या दोन दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाचे संचालक डी एल जाधव यांच्या हस्ते काल झाला. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर..



शूद्ध मध काय असतो, मध कसा तयार होतो, त्याची प्रक्रिया काय आहे….? मधमाशी कशी असते. या विषयीची माहिती या मधमहोत्सवात देण्यात येत आहे. संयोजक दिनकर पाटील यांनी लातूर जिल्ह्यात मधूमक्षिका पालनाच्या किती संधी आहे. सद्या मध उत्पादनाची काय स्थिती आहे. यासाठी महोत्सव आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांसाठी भविष्यात मधूमक्षिका पालनांच प्रशिक्षण केंद्र लातूरात सूरू करण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. आज मंगळवारी, या मधमहोत्सवाचा समारोप होणार आहे.

अरूण समूद्रे, आकाशवाणी बातम्यासाठी, लातूर.

****



 सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं संगणकीकरण करण्यात आल्यानं वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आली आहे. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यात खंडाळा गावाच्या रहिवासी शितल थळे यांनी याविषयी आपला अनुभव सांगितला..

सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं संगणकीकरण करण्यात आल्यानं वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आली असून, पात्र नसलेल्या व्यक्तिंना वितरण होणारं धान्य आणि करोसीन च्या वितरणावर नियंत्रण आलं आहे. मात्र, आता आम्हाला साखर, तूरडाळ, करोसीन व इतर वस्तू मिळू लागल्या आहेत. आम्ही सरकारचे आभारी आहोत. धन्यवाद.

*****



 प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीनं काल औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या समोर स्तन्यदा माता आणि गर्भवती शिक्षिकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. जिल्ह्यांतर्गत दुर्गम ठिकाणी पदस्थापना दिलेल्या स्तन्यदा माता आणि गर्भवती शिक्षिकांना सोयीच्या ठिकाणी पदस्थापना बदलून द्याव्या या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. 

****



 परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात काही शेतकऱ्यांनी काल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात ढालेगाव बंधाऱ्यात उतरून आंदोलन केलं. भारतीय स्टेट बँकेच्या पाथरी शाखेकडून शेतकऱ्यांना कर्ज दिलं जात नसल्याच्या विरोधात हे आंदोलन होतं. बँक प्रशासनानं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. 

****



 नांदेड जिल्ह्यात भोकर इथे शासकीय कापूस खरेदीला आज प्रारंभ होणार आहे. केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार ही खरेदी करण्यात येणार असून, पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहेत.

****



 औरंगाबाद तहसील कार्यालयातला वाहनचालक अविनाश जाधव याला, दीड लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल अटक केली. वाळूची वाहतूक निर्वेधपणे करू देण्यासाठी त्यानं वाळू वाहतूकदाराकडून ही लाच मागितली होती.

****



 अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या अजनुज इथले जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीरमध्ये १५ नोव्हेंबरला झालेल्या स्फोटात त्यांना वीरमरण आलं होतं.

*****

***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 21 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...