Wednesday, 21 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.11.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21  November 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ नोव्हेंबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक; कामकाज अनेकवेळा बाधित

Ø वर्धा जिल्ह्यात लष्करी तळावर भीषण स्फोट; सहा जणांचा मृत्यू तर ११ जण जखमी

Ø ४९व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - ‘ईफ्फी’ ला गोव्यात सुरुवात

Ø ईद -ए-मिलादुन्नबी निमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम

आणि

Ø पाइपद्वारे घरगुती वापराचा गॅस वितरणाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला उद्या प्रारंभ; अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या सात लाखांवर कुटुंबांना लाभ

****



 राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही काल विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत, मराठा आरक्षण, राज्याच्या काही भागातला दुष्काळ आणि अवनी वाघीण या मुद्यांवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे विधानसभेचं कामकाज तीन वेळा तहकूब करावं लागलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा सत्ताधारी आघाडीतल्या शिवसेनेनंही लावून धरला. यावेळी विरोधकांनी गदारोळ करत, राजदंड पळवला तसंच तालिका अध्यक्षांनाही घेराव घातला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज वारंवार स्थगित करण्यात आलं.



 विधान परिषदेतही गदारोळामुळे कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दुष्काळासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र, त्यावर नियम २६० अन्वये चर्चा प्रस्तावित असल्याचं सांगून सभापतींनी तो फेटाळल्यामुळे विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज दोन वेळा अर्ध्या तासासाठी तहकूब झालं.

****



 वर्धा इथल्या पुलगाव परिसरात असलेल्या लष्करी तळावर भीषण स्फोट होऊन सहा जणांचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले. काल पहाटे देवळी तालुक्यातल्या सोनेगाव आबाजी गावाजवळ, ही दुर्घटना घडली. स्फोटातल्या मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर करण्यात आलं आहे. गंभीररित्या जखमींना प्रत्येकी दोन लाख रुपये तर किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये अर्थसहाय्य जाहीर करण्यात आलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात यावी आणि समितीनं एका महिन्यात शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत

****



 गोव्यात पणजी इथं कालपासून ४९व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - ‘ईफ्फी’ ला सुरुवात झाली. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. नवा भारत आणि चित्रपटाच्या विविध शैली हा या महोत्सवाचा केंद्रबिंदू असल्याचं ईफ्फीचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी सांगितलं. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ६८ देशांमधले २१२ चित्रपट प्रदर्शित केले जातील. ‘अ‍ॅस्पर्न पेपर्सया चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात, तर ‘सिल्ड लिप्स’ चित्रपटानं महोत्सवाची सांगता होणार आहे.

****



 मुस्लिम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद -ए-मिलादुन्नबी आज साजरा होत आहे. ईद-ए-मिलादनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित पैगंबरांनी दिलेली प्रेम, दया, त्याग आणि मानवतेची शिकवण सर्वांनी आचरणात आणणं गरजेचं असून, ईदचा सण या शिकवणीला उजाळा देणारा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.



 औरंगाबाद इथं आज सकाळी साडेआठ वाजता शहागंज परिसरातून जुलूस-ए-मोहम्मदी काढण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता बाद नमाजे जोहर नंतर मुबारक की झियारतचं आयोजन करण्यात आल्याचं ईद मिलादुन्नबी समितीच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. औरंगाबाद नजिक खुलताबाद इथं, ईदनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 देशभरातल्या नागरिकांना पाइप जोडणीद्वारे घरगुती वापराचा गॅस वितरित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने आखली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्या नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनातून, नागरी गॅस वितरण प्रकल्प उभारणीचा शुभारंभ होणार आहे, यामध्ये अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यासह देशभरातल्या ६३  ठिकाणांचा समावेश आहे.



 अहमदनगर आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांमध्ये १०६ सीएनजी स्टेशन प्रस्तावित असून पाइप नैसर्गिक वायू अर्थात पीएनजीचा लाभ सुमारे सात लाख आठ हजार शंभर कुटुंबापंर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. भारत गॅस रिसोसॅस लिमिटेडचे प्रादेशिक अधिकारी कैलास कुलकर्णी यांनी काल अहमदनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****



 केंद्र शासनाच्या जन औषधी योजने द्वारे उच्च गुणवत्ता असणारी जनरिक औषधी बाजार भावापेक्षा स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जात आहे. या उच्च गुणवत्तेच्या औषधी जन औषधी केंद्राद्वारे सहज उपलब्ध होत आहेत. परभणी शहरातले रहिवासी लक्ष्मीकांत बनसोडे यांनी या योजनेमुळे औषधींचा खर्च कमी झाल्याचं सांगितलं. बनसोडे म्हणाले…



अनेक वर्षांपासून घरात महागडी औषधी आणावी लागत असल्यामुळे माझा पैसा जास्त खर्च होतो. त्याचा मला विचार करावा लागत असे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनऔषध योजना आणल्यामुळे औषधावरील खर्चात ५० टक्के माझी बचत झाली. त्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार माणतो.

****



 जालना वस्तू आणि सेवा कर कार्यालयातल्या राज्य कर अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल दहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. प्रदीप देशमुख असं या अधिकाऱ्याचं नाव असून, कर चुकवेगिरी प्रकरणात दंड न आकारता एका हॉटेल व्यावसायिकाचं गोठवलेलं बँक खातं पुन्हा कार्यरत करण्याचं पत्र देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****



 राज्यात कालही अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा तालुक्यात वीज पडून दोन जनावरं दगावली. या पावसामुळे कांदा पिकाचं नुकसान झालं तर रब्बी पिकांना दिलासा मिळाला आहे. सातारा, वाशिम, हिंगोली तसंच औरंगाबाद जिल्ह्यातही काल पाऊस झाला.

****



 मनमाड - दौंड दरम्यान आज आणि येत्या २७ नोव्हेंबरला मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात पुणे - निजामाबाद ही गाडी येत्या २८ नोव्हेंबरला तर निजामाबाद - पुणे ही गाडी उद्या आणि २६ नोव्हेंबरला रद्द करण्यात आली आहे. तसंच निजामाबाद - पंढरपूर ही गाडी आज तर पंढरपूर - निजामाबाद ही गाडी उद्या रद्द करण्यात आली आहे.

****



 औरंगाबाद शहरातील गुटखा गोदामांवर छापा मारून गुटख्याचा मोठा पोलिसांनी जप्त केला आहे. काल सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

****



 भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आजपासून तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला सामना ब्रिस्बेन इथं भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी सुरु होईल. भारतानं मागील सात टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिका जिंकल्या आहेत.

****



 मराठा समाजाला इतर मागासवर्गीय समाजातून आरक्षण देण्याच्या विरोधात इतर मागासवर्गीय समाज आठ दिवसात आंदोलन करणार असल्याचं ओबीसी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी सांगितलं. ते काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते.

*****

***

No comments: