Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 November 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
मराठा
समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देऊ, असं आश्वासन महसूल आणि सार्वजनिक बांधकाम
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज विविध विकास कामांचा
शुभारंभ पाटील यांच्या हस्ते झाला, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. इतर कुठल्याही
समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असा पुनरुच्चार
त्यांनी केला.
दरम्यान,
वैजापूर तालुक्यातल्या शिऊर बंगला इथं शिऊर बंगला-औराळा-चापानेर-कन्नड-हस्ता, शिऊर-येवला,
आणि गंगापूर चौफुली इथं वैजापूर-गंगापूर-भेंडाळा फाटा रस्त्यांचं भूमिपूजन पाटील यांच्या
हस्ते झालं.
****
दुष्काळी
परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचं लातूर जिल्ह्याचे
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या मौजे काटेजवळगा
इथं आज विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नागरिकांनी एकत्र येऊन
जलसंधारणाची कामं करावी, आपला जिल्हा कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वांनी
योगदान द्यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवाजीपार्क इथं शिवसेना नेते
आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही स्मारकाला भेट देऊन बाळासाहेबांना
आदरांजली वाहिली.
****
जाहिरात
श्रेत्रात मोठं नाव असलेले अॅडगुरू अॅलेक पद्मसी यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन
झालं, ते ९० वर्षांचे होते. पद्मसी यांनी १९८२ मध्ये ‘गांधी’ चित्रपटात मोहम्मद अली
जिना यांची व्यक्तीरेखा साकारली होती. ‘हमारा बजाज’, ‘सर्फ’, ‘चेरी ब्लॉसम’, ‘लिरील
गर्ल’, ‘फेअर अँड लव्हली’, ‘हँडसम ब्रँड’ यासह अनेक आकर्षक जाहिराती पद्मसी यांनी
बनवल्या आहेत. जाहिरातींच्या क्षेत्रात योगदानासाठी त्यांना २००० साली भारत सरकारच्या
प्रतिष्ठीत ‘पद्मश्री’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
****
केंद्र
सरकार लवकरच ई-वाणिज्य धोरण जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश
प्रभू यांनी दिली. मुंबईत आज सकाळी आयोजित केलेल्या एका पुरस्कार वितरण सोहळ्यात ते
बोलत होते. उद्योगक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञांनी या धोरणाचा मसुदा बनवला असून,
त्याला औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन खात्याकडून लवकरच मंजूरी मिळेल, असंही ते म्हणाले.
स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आता उद्योग सुलभतेच्या मानकांची अंमलबजावणी
जिल्हा पातळीवर देखील करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राजस्थान
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आठ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. तर काँग्रेसनं
देखील ३२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपनं एकूण २०० जागांपैकी १७० जागांसाठीचे
उमेदवार जाहीर केले आहेत तर काँग्रेसनं आतापर्यंत १८४ उमेदवार घोषीत केले आहेत. दुसऱ्या
यादीत काँग्रेसनं माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते जसवंत सिंग याचे पुत्र
मानवेंद्र सिंग यांना राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविरोधात उभं केलं
आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या २५ नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ५०वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या
सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर,
माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं
आहे.
****
लातूर
इथं आज बहुविकलांग दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी पाच दिवसीय मोफत प्रशिक्षण वर्गाचं
उद्घाटन आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते झालं. दिव्यांग मुलांचं आरोग्य, त्यांच्यासाठी
शासकीय योजना, त्यांच्या शारीरिक-मानसिक विकासासाठी करावयाच्या उपाययोजना आदींबाबत
पालकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं
लातूर जिल्ह्यातल्या कर्णबधीर, अस्थिव्यंग, अपंगासाठी मंजूर झालेल्या साहित्याचं यावेळी
देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं.
****
मराठवाडा
साहित्य परिषदेच्या वतीनं नामवंत लेखक, कवी, नाटककार यांच्याशी संवाद साधणारा साक्षात
हा कार्यक्रम घेण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत उद्या ख्यातमान नाटककार प्रेमानांद
गज्वी यांच्याशी रसिकांना संवाद साधता येणार आहे. साहित्य परिषदेच्या डॉ. ना गो नांदापूरकर
सभागृहात उद्या संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
वेस्ट
इंडिज मध्ये सुरु असलेल्या आयसीसी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय
संघाचा ब गटातला शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री
साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment