आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१५
नोव्हेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
सिंगापूर इथं पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. आशियातल्या देशांबरोबरच
रशिया आणि अमेरिकेसह १८ देशांचे नेते या परिषदेत सहभागी होतात. सकाळी अनौपचारिक भारत-आशियाई
बैठकीत १० सदस्य देशांच्या नेत्यांची पंतप्रधानांनी भेट घेतली. काल रात्री त्यांनी
दुसऱ्या विभागीय व्यापक आर्थिक भागिदारी परिषदेला हजेरी लावली. उच्च दर्जाच्या, व्यापक,
आणि संतुलित विभागीय आर्थिक भागीदारी कराराबाबत लवकर निर्णय घेण्याबद्दल भारताची वचनबद्धता
त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कराराबातच्या चर्चेसाठी सदस्य देशांनी आपल्या व्यापार
मंत्र्यांना आवश्यक ते अधिकार द्यावेत, असं आवाहनही पंतप्रधानांनी या देशांच्या नेत्यांना
केलं.
****
यावर्षी आतापर्यंत सहा कोटीपेक्षा
जास्त करविवरण पत्रं दाखल झाली असून, गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या ५४ टक्क्यानं जास्त
आहे. नवी दिल्ली इथं काल भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात केंद्रीय प्रत्यक्ष कर
मंडळाचे अध्यक्ष सुशीलचंद्र यांनी ही माहिती दिली. स्वतःहून कर विवरणपत्र भरणाऱ्यांच्या
संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, गेल्या वर्षी त्यांची संख्या सहा कोटी ८५ लाख होती.
२०१४ मधे ही संख्या तीन कोटी ४५ लाख होती. नोटबंदीमुळे देशात कराचा पाया विस्तारण्यात
मदत झाली, असं ते म्हणाले.
****
महिलांच्या जागतिक मुष्टीयुद्ध
अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून दिल्लीत सुरुवात होत आहे. या स्पर्धेची ही दहावी आवृत्ती
असून त्यामध्ये ७२ देशांमधल्या ३०० हून जास्त महिला मुष्टीयोद्धा सहभागी होणार असल्यानं,
आतापर्यंतची ही सर्वात मोठी स्पर्धा ठरणार आहे. या स्पर्धेत ऐतिहासिक सहावं सुवर्णपदक
जिंकण्याचा एम. सी. मेरीकोमचा प्रयत्न असेल.
****
मार्च-२०१९ मध्ये होणाऱ्या
इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी खाजगीरित्या बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नाव नोंदणी
प्रमाणपत्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २३ नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे.
२४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान विलंब शुल्कासह अर्ज करता येईल असं राज्य माध्यमिक आणि उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment