Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 15 November 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१५ नोव्हेंबर
२०१८ सकाळी ७.१०
मि.
****
· येत्या अकरा डिसेंबरपासून
संसदेचं हिवाळी अधिवेशन.
· मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न
महिनाअखेर निकाली निघेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
· समविचारी पक्षांना एकत्र
करून आगामी निवडणूक लढवण्याचा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब
दानवे यांचा पुनरूच्चार.
· शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी
पन्नास हजार रूपयांची मदत देण्याची विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील
यांची मागणी.
आणि
· पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ
कबड्डी स्पर्धेत मुंबई विद्यापीठ विजयी तर पुण्याचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ उपविजयी.
****
संसदेच्या
हिवाळी अधिवेशनाला येत्या अकरा डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय
गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदीय कार्य विषयक समितीच्या
बैठकीत हा निर्णय झाला. अधिवेशन काळात राज्यसभेत महत्वाची आठ तर लोकसभेत पंधरा विधेयकं
मंजुरीसाठी मांडण्यात येणार असल्याचं संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी वार्ताहरांशी
बोलतांना सांगितलं. आठ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात राफेल विमान खरेदी,
अयोध्येतील राम मंदिर, मुस्लिम महिलांचा तिहेरी तलाक या सारख्या विविध मुद्यांवर चर्चा
होऊ शकते.
****
केंद्रीय
ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे आता संसदीय कामकाज मंत्रालयाचा तर डी.व्ही.सदानंद
गौडा यांच्याकडे रसायने आणि रासायनिक खते मंत्री पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे.
केंद्रीय
मंत्री अनंतकुमार यांच्या निधनामुळे तोमर आणि गौडा यांच्याकडे हा पदभार सोपवण्यात आला
आहे.
****
मराठा
समाज आरक्षणाचा प्रश्न या महिनाअखेर निकाली निघेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी काल सांगितलं. अकोला इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. राज्य मागासवर्गीय आयोगाला
१५ नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाच्या सामाजिक - आर्थिक स्थितीबाबतचा अहवाल देण्यास सांगितलं
असून हा अहवाल प्राप्त झाल्यावर या महिनाअखेरपर्यंत त्यावरची वैधानिक प्रक्रिया पूर्ण
केली जाईल, असं ते म्हणाले. मराठा समाजाला देण्यात येणारं आरक्षण कायदेशीरदृष्ट्या
टिकावं यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान,
आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड आज आपला अहवाल मुख्य सचिवांना सादर
करण्याची शक्यता आहे.
****
समविचारी
पक्षांना एकत्र घेऊन आगामी निवडणूक लढवणार असल्याचं सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
खासदार रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेसोबत युती कायम ठेवणार असल्याचे संकेत दिले. ते
काल ठाणे इथं वार्ताहरांशी बोलत होते. राममंदीराच्या मुद्यावर भाजपचं शिवसेनेला समर्थन
असल्याचंही दानवे यांनी यावेळी वार्ताहरांना सांगितलं. राज्यातल्या ४८ पैकी १३ लोकसभा
मतदार संघांचा गेल्या पंधरा दिवसांमध्ये आढावा घेतला असून विधानसभेच्या २८८ तसंच लोकसभेच्या
४८ मतदारसंघात प्रत्येकी एका विस्तारकामार्फत कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचं काम सुरु
असल्याची माहितीही खासदार दानवे यांनी यावेळी दिली.
****
सर्वोच्च
न्यायालयानं आदेश देऊनसुद्धा कंत्राटदाराची देयकं देण्यात दिरंगाई करणाऱ्या गोदावरी
पाटबंधारे विकास महामंडळाच्या औरंगाबाद इथलं सिंचन भवनासह लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचं
कार्यालय जप्त करण्याचे आदेश औरंगाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दिले आहेत. कालव्यांशी
निगडीत जास्तीच्या कामांचं कंत्राटदाराचं देयक अदा करण्याबाबतचं हे प्रकरण आहे. याबाबत
जिल्हा न्यायालयात दाखल अवमान याचिकेच्या सुनावणी दरम्यान काल न्यायालयानं हा आदेश
दिला.
****
मराठवाड्यातल्या
हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद, जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची विधानसभा विरोधी
पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काल पाहणी केली. शासनानं येत्या आठ महिन्यांचं
नियोजन करावं आणि शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पन्नास हजार रूपयांची मदत द्यावी अशी मागणी
विखे पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यात दुष्काळाची पाहणी केल्यानंतर
वार्ताहरांशी बोलतांना केली. खरिपाचं पिक हातचं गेलं असून रबी हंगामात तर पेरणीच होऊ
शकली नसल्यानं सरकारनं शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. चारा आणि
पाणी समस्येवर तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
धनगर, मराठा आणि मुस्लिम आरक्षणाबाबत सरकारचा हेतू शुद्ध नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी
केली.
दरम्यान,
हिंगोली जिल्ह्यातले औंढा, वसमत हे तालुके दुष्काळग्रस्त विषयक यादीतून कोणत्या निकषाने
वगळण्यात आले असा प्रश्न उपस्थित करुन संबंधीत अधिकाऱ्यांनी चुकीची आणेवारी काढून,
पिक विमा कंपनीशी संगनमत केल्याचा आरोप विखे यांनी केला. औंढा तालुक्याच्या पिंपळदरी
इथं शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. कळमनुरी तालुक्यातल्या
दुष्काळी परिस्थितीचीही त्यांनी पाहणी केली.
यासोबतच,
लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर बेलकुंड इथं
वार्ताहरांशी बोलतांना विखे पाटील यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासन वेळकाढू धोरण
अवलंबत असल्याचं सांगितलं.
****
शासनानं
केरोसिन घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून गॅस जोडणी नसल्याबद्दलचं हमीपत्र घेणं बंधनकारक
केलं आहे. त्यानुसार, औरंगाबाद जिल्ह्यात दोन लाख पंच्याऐंशी हजार चारशे नऊ हमीपत्रं
या महिन्यासाठी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉक्टर भारत कदम यांनी
दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. हमीपत्रं चुकीची निघाल्यास
संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
केंद्र
तसंच राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना होत आहे. जिल्ह्यातल्या
शिरुर कासार तालुक्याच्या शिरपूर धुमाळ इथले शेतकरी सोनाजी बहिर यांनी केंद्र सरकारच्या
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा तसंच राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी
शेतकरी कर्ज माफी योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनांविषयी बहिर यांनी आपल्या भावना या
शब्दात व्यक्त केल्या -
माझ्या आजोबाच्या नावाने
सात एकर शेती आहे. आम्हाला शासनाच्या पीक विमा योजनेचा तसंच कर्जमाफीचा लाभ मिळाला
आहे. पीक विमा दोन्ही वर्षाचा तीस हजार रुपये तर कर्जमाफी दीड लाख रुपयाची झाली आहे.
एवढंच नाही तर आम्हाला ठिबक सिंचनचं अनुदान देखील मिळालं आहे. धन्यवाद.
****
राष्ट्रीय
स्वंयसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीनं पूर्वांचल विकास योजने अंतर्गत राज्यभरात सुरु
असलेल्या पूर्वांचल विद्यार्थ्यी शिबीराचा समारोप काल लातूर इथं झाला. यावेळी शिबिरार्थी
विद्यार्थ्यांनी पूर्वांचलातल्या चार राज्यातलं लोकनृत्य सादर करुन उपस्थितीतांची मने
जिकंली. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लातूर जिल्हा संघचालक संजय
अग्रवाल, चंद्रशेखर भोगडे, संदिप कविश्वर संजय काठे आणि शिबिराधिकारी विश्वासराव जोशी
उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या राज्यांची पारंपारिक वेशभूषा परिधान
केली होती.
****
मुबलक
ऊर्जा निर्मिती, प्रभावी पारेषण, प्रत्येकासाठी अखंडित ऊर्जा, लोकाभिमुख सेवा आणि हरित
ऊर्जा – हरित महाराष्ट्र ही ऊर्जा स्वातंत्र्याची पंचसूत्री असून त्यादृष्टीनं राज्य
शासनाची वाटचाल चालू असल्याचं प्रतिपादन, महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे संचालक
विश्वास पाठक यांनी केलं आहे. ‘उदय उज्ज्वल महाराष्ट्राचा – उदय नवीन भारताचा’ या माहिती
पुस्तिकेचं पाठक यांच्या हस्ते काल जालना इथं प्रकाशन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत
होते. ऊर्जा विभागाचा गेल्या चार वर्षातल्या वाटचालीचा आलेख या पुस्तिकेत प्रसिद्ध
करण्यात आला आहे.
****
लातूरमध्ये
मुलींच्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेत मुंबई विद्यापीठ विजयी तर
पुण्याचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ उपविजयी ठरलं आहे. मुंबई विद्यापीठाची सायली जाधव
– सर्वोत्कृष्ट खेळाडू, सोनाली हेळवी – सर्वोत्कृष्ट चढाईपटू तर आरती बोडकेला सर्वोत्कृष्ट
पकडीसाठी विशेष पुरस्कार देण्यात आला. मुंबईचं एस एन डी टी विद्यापीठ तिसऱ्या तर पुण्याचं
भारती विद्यापीठ चौथ्या स्थानावर राहिलं. हे चारही संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र
ठरले आहेत.
****
हिंगोलीत
वाळूच्या वाहनांविरूद्ध कारवाई करणारे कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर
आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळू तस्करांविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात
गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहरातल्या खटकाळी भागात खेडेकर यांनी वाळुचा एक ट्रॅक्टर
अडवून चालक तसंच मालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांच्यावर हल्ला करण्यात
आला होता. या घटनेचा महसूल तसंच राजपत्रित अधिकारी संघटनेनं तीव्र शब्दात निषेध नोंदवला
आहे.
****
औरंगाबाद
शहरात बीड बायपास रोडवरच्या रामकृष्ण आश्रमात उभारण्यात आलेल्या श्रीरामकृष्ण परमहंस
मंदिराचं परवा शनिवारी लोकार्पण केलं जाणार असल्याचं आश्रमाचे प्रमुख स्वामी विष्णुपादानंद
यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. २८ कोटी रूपये खर्च करून हे मंदिर बांधण्यात
आलं आहे. यानिमित्तानं उद्यापासून तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आल्याचं ते म्हणाले.
****
हिंगोली
इथं राज्य राखीव पोलीस गट क्रमांक १२ मधला वरिष्ठ लिपिक अंबादास राठोड याला एक हजार
रुपयांची लाच घेताना काल रंगेहात पकडण्यात आलं. एका मुद्रणविषयक निविदेतल्या पूर्ण
झालेल्या कामांची देयकं मंजुरीसाठी पाठवण्याकरता त्यानं ही लाच मागितली होती.
****
मार्च-२०१९
मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी खाजगीरित्या बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना
नाव नोंदणी प्रमाणपत्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २३ नोव्हेंबरपर्यंत देण्यात
आली आहे.
२४
ते २८ नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येईल असं राज्य माध्यमिक आणि उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment