आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ जानेवारी २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
जगभरात लोकांनी नव्या
वर्षाचं उत्साहात स्वागत केलं आणि सरत्या वर्षाला निरोप दिला. मुंबईसह देशभरातही
नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं गेलं. अनेक ठिकाणी नागरिकांनी रात्री बाराच्या
ठोक्याला ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून २०१९ चं स्वागत केलं, तसंच संगीत आणि
नृत्याच्या कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नवीन
वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात देशातले सगळे
नागरिक सुदृढ आणि सुखी राहण्याची, तसंच या नवीन वर्षात सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्याची
अपेक्षा व्यक्त केली.
****
पुणे जिल्ह्यातल्या भीमा नदी काठावरच्या कोरेगाव
भीमा इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर
नागरिक इथं दाखल झाले आहेत. या ठिकाणी आज विशेष अभिवादन सभाही होणार आहे. गेल्यावर्षी
इथं झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी संपूर्ण परिसारात मोठ्या प्रमाणात
बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
****
ज्येष्ठ अभिनेते लेखक कादर खान यांचं आज पहाटे सकाळी
कॅनडात टोरांटो इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे
आजारी असलेले खान यांच्यावर सुमारे सतरा आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते,
काल संध्याकाळनंतर ते कोमात गेले, आणि पहाटेच्या सुमारास त्यांचं निधन झाल्याची माहिती,
त्यांचे पुत्र सरफराज खान यांनी पीटीआयला दिली.
काबूल
इथं जन्मलेले खान यांनी १९७३साली प्रदर्शित झालेल्या दाग या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात
केली. सुमारे तीनशे चित्रपटातून त्यांनी विविध भूमिका साकारल्या तर धरमवीर, कुली, अमर
अकबर अँथोनी, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, आदी अडीचशेहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी
संवाद लिहिले आहेत.
****
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघानं
काल परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या
मानधनवाढीचा शासनादेश काढून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी
हे आंदोलन करण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment