Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 02 January 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø अयोध्येत राम
मंदिराबाबतचा निर्णय कायदेशीर प्रक्रियेच्या पूर्ततेनंतरच - पंतप्रधानांकडून स्पष्ट
Ø मागासवर्गीय कल्याण
महामंडळांसाठी ३२५ कोटी रुपयांची हमी देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Ø कोरेगाव भीमा
इथं विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी भीमसैनिकांची गर्दी
Ø ज्येष्ठ अभिनेते
लेखक कादर खान यांचं काल प्रदीर्घ आजारानं निधन
आणि
Ø नगरपरिषद तसंच
नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपामुळे कामकाज ठप्प
****
अयोध्येत राम मंदीर बांधण्याबाबतचा कोणताही निर्णय
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शक्य असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
स्पष्ट केलं आहे. काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सर्वोच्च
न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणाच्या निर्णयाला विलंबासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचा
आरोप पंतप्रधानांनी केला. काँग्रेसचे वकील या खटल्याचा निकाल लागण्यासाठी अडथळे निर्माण
करत आहेत असं त्यांनी सांगितलं.
पाकव्याप्त काश्मीरात दहशतवादी तळांवर केलेली सर्जिकल
स्ट्राईक अर्थात लक्ष्यभेदी कारवाई अतिशय जोखमीची; मात्र देशहितासाठी गरजेची होती.
या कारवाईची तारीख दोन वेळा बदलावी लागली. मात्र, या लक्ष्यभेदी कारवाई संदर्भातही
विरोधी पक्षांनी प्रश्न निर्माण करणं, निराशाजनक असल्याचं, पंतप्रधान म्हणाले.
****
सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी
सुरु असलेल्या चार महामंडळांसाठी एकूण ३२५ कोटी रुपयांची हमी देण्यास राज्य मंत्रिमंडळानं
मान्यता दिली आहे. यामध्ये महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळ आणि अपंग
कल्याणासाठी सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य अपंग आर्थिक आणि विकास महामंडळाचा समावेश
आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी ही माहिती दिली.
राज्याच्या पर्यटन प्रसिद्धीसाठी, राज्य, राष्ट्रीय,
आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित कार्यक्रमांना पर्यटन विभागाअंतर्गत प्रायोजकत्व देणारी
योजनाही या बैठकीत मंजूर करण्यात आली आहे.
****
राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्य स्तरावर आयोजित अशासकीय
कार्यक्रमांना प्रायोजकत्व देण्यासाठी, नव्या धोरणाच्या प्रस्तावाला काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी १२ कोटी रूपयांच्या वार्षिक खर्चास
मंजुरी देण्यात आली आहे.
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत योजनांचा
लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी राष्ट्रीयकृत
बँकेबरोबर सहकारी बँकांसाठी पत हमी योजना लागू करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष
नरेंद्र पाटील यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेमुळे
लाभार्थ्यांना सहकारी बँकांमधूनही कर्ज घेता येणार आहे. गट कर्ज व्याज परतावा योजनांचा
लाभ घेण्यासाठी वैयक्तिक कर्ज खात्याअंतर्गत पुरूषांची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षांवरून
५० तर महिलांची कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे करण्यात असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
कांद्याला हमी भाव मिळावा यासाठीचा प्रस्ताव राज्य
शासन केंद्र शासनाकडं पाठवणार असल्याची माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली
आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं काल मंत्रालयात पणन मंत्री
सुभाष देशमुख यांची भेट घेऊन एक निवेदन दिलं, त्यावेळी ते बोलत होते. कांद्यासाठी शासनानं
अनुदान जाहीर केलं असून, बंद ठेवण्यात आलेल्या बाजार समित्यांवर कारवाई करण्यात येईल
असंही देशमुख यांनी सांगितलं.
****
निवडणूक रोखे विक्रीच्या सातव्या टप्प्याला कालपासून
सुरुवात झाली. हा टप्पा या महिन्याच्या १० तारखेपर्यंत सुरु राहणार आहे. भारतीय स्टेट
बँकेत हे निवडणूक रोखे उपलब्ध असून, बँकेच्या २९ प्राधिकृत शाखांमध्ये ते मिळणार आहेत.
****
कोरेगाव भीमा लढ्याच्या दोनशे एकव्या विजय दिनानिमित्त राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर पुणे
जिल्ह्यात कोरेगाव भीमा इथं आलेल्या भीमसैनिकांनी ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना दिली.
या ठिकाणी विशेष अभिवादन सभाही घेण्यात आली. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही या विजयस्तंभाला अभिवादन केलं. केसरकर यांनी वढू-बुद्रुक
इथं जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचंही दर्शन घेतलं. गेल्यावर्षी इथं झालेल्या
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी संपूर्ण परिसारात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
करण्यात आला होता.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटीचे कमी केलेले दर कालपासून
लागू झाले. यामुळे चित्रपटाची तिकिटं आणि दूरचित्रवाणी संचांसह २३ वस्तू आणि सेवा कालपासून
स्वस्त झाल्या आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
ज्येष्ठ अभिनेते लेखक कादर खान यांचं काल कॅनडात
टोरांटो इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे
आजारी असलेले खान यांच्यावर सुमारे सतरा आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते.
काबूल इथं जन्मलेले खान यांनी १९७३ साली प्रदर्शित झालेल्या दाग या चित्रपटातून अभिनयाला
सुरुवात केली. सुमारे तीनशे चित्रपटातून त्यांनी विविध भूमिका साकारल्या तर धरमवीर,
कुली, अमर अकबर अँथोनी, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, आदी अडीचशेहून अधिक चित्रपटांसाठी
त्यांनी संवाद लिहिले. कादरखान यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
शोक व्यक्त केला असून, सहज अभिनय आणि संवाद लेखनानं हिंदी चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा
उमटविणारा कलाकार हरपला, अशा शब्दात त्यांनी कादरखान यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
राज्यातल्या ३५९ नगरपरिषद तसंच नगर पालिका कर्मचाऱ्यांनी
कालपासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातल्या
बहुतांशी नगरपरिषदांच्या कामकाजावर या संपाचा परिणाम जाणवला. नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना
सरसकट सातवा वेतन आयोग लागू करावा, रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं, स्वच्छता
निरीक्षकांचा राज्य संवर्ग तयार करण्यात यावा, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे, रक्षक,
कामाठी, सफाई कर्मचारी यांच्या वारसांनाही नोकरीत सामावून घ्यावं यासह अन्य मागण्यासांठी
हा संप पुकारण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातल्या चार नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या
जवळपास बाराशे कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला आहे. परभणी जिल्ह्यातल्याही सर्व
नगर परीषदांचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. या दरम्यान, अत्यावश्यक सेवा असलेल्या पाणीपुरवठा आणि अग्निशमन
दलाचे कर्मचारीही आजपासून या संपात सहभागी होणार असल्याचं राज्य नगरपरिषद कर्मचारी
संघटनेचे सचिव केशव कानपुडे यांनी सांगितलं.
****
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी रास्त आणि किफायतशीर
मूल्य- एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं काल कोल्हापूर इथल्या
प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
काढण्यात आला. यामध्ये दोन हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. एफआरपीप्रश्नी
त्वरित निर्णय न घेतल्यास २५ जानेवारी रोजी पुण्यातल्या साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा
काढण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
****
लातूर इथं यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या
वतीने, प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या ५०
हजार दत्तक कुटुंबांतल्या गरजू रुग्णांवर काल एक जानेवारीपासून मोफत उपचारास सुरुवात
करण्यात आली. यापुढे एकही रुग्ण दुर्बल आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्य सेवेपासून वंचित
राहणार नाही, याची जबाबदारी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय घेणार आहे, अशी माहिती
या रुग्णालयाचे कार्यकारी संचालक रमेश कराड यांनी दिली
****
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं ईव्हीएम आणि मतदान पडताळणी
यंत्र- व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती मोहिमेत नागरिकांनी
सहभागी होऊन यासंदर्भातल्या शंकांचं निरसन करून घ्यावं, असं आवाहन विभागीय आयुक्त डॉ.
पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे. काल हिंगोली तालुक्यात, संतूक पिंपरी इथं आयोजित
यासंदर्भातल्या प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयुक्तांनी,
टंचाईसदृश परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला.
****
राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा
कडाका अजूनही कायम आहे. काल सर्वात कमी चार पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान अहमदनगर
इथं नोंदवलं गेलं. नाशिक सहा पूर्णांक दोन, परभणी सात पूर्णांक पाच, औरंगाबाद आठ पूर्णांक
चार, तर उस्मानाबाद इथं दहा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
*****
***
No comments:
Post a Comment