Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 19 January 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १९ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø सुलभ व्यापारी प्रक्रियेच्या यादीत पुढल्या वर्षीपर्यंत
जगात पहिल्या पन्नास देशांमध्ये स्थान मिळवण्याचं लक्ष्य -पंतप्रधान नरेंद्र मोदी
Ø डान्सबार बंदीसाठी पुढच्या दोन आठवड्यात अध्यादेश आणण्याचा
राज्यसरकारचा विचार
Ø दहाव्या शार्ङ्गदेव महोत्सवाला कालपासून औरंगाबाद इथं
प्रारंभ; गुरु बनमाली महाराणा यांना शार्ङ्गदेव पुरस्कार मरणोत्तर प्रदान
आणि
Ø ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकत भारताचा
ऐतिहासिक मालिका विजय .
****
ईज ऑफ डूईंग बिजनेस अर्थात, सुलभ व्यापारी प्रक्रियेच्या
यादीत पुढल्यावर्षीपर्यंत जगातल्या पहिल्या पन्नास देशांमध्ये स्थान मिळवण्याचं लक्ष्य
भारतानं ठेवलं असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये गांधीनगर इथं नवव्या वायब्रंट
गुजरात जागतिक शिखर संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. जागतिक बँकेच्या
ईज ऑफ डूईंग बिजनेस यादीत भारतानं तब्बल ७५ स्थानांची झेप घेत सध्या ७७ वं स्थान पटकावलं
आहे, असं त्यांनी सांगितलं. देशानं आपल्या पूर्ण क्षमता सिद्ध कराव्यात यासाठी त्यामध्ये
येणारे अडथळे दूर करून सुधारणा
करण्यासाठी सरकार आपले प्रयत्न सुरुच ठेवेल, असंही मोदी म्हणाले.
****
दरम्यान, मुंबईत भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे. १४० कोटी ६१ लाख रुपये खर्चातून उभारलेल्या या संग्रहालयात दृक-श्राव्य, प्रदर्शन आणि मल्टी मीडियाच्या
माध्यमातून भारतीय सिनेमाचा १०० हून अधिक वर्षांचा
प्रवास, मांडण्यात आला आहे. आज होणाऱ्या या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर माहिती
आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी काल या संग्रहालयाच्या सज्जतेचा आढावा घेतला.
****
गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांची, महसूल विभागणी
सुत्रानुसार, ऊस दर काढण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव
दिनेश कुमार जैन यांनी दिले आहेत. मुंबईत काल ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत ते बोलत
होते. या बैठकीत सन २०१७-१८ हंगामामध्ये गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांची महसूल विभागणी
सुत्रानुसार ऊस दर निश्चित करुन या दरांना मान्यता देण्यात आली. काही कारखाने ऊसतोडणी
आणि वाहतूक खर्च जास्त दाखवतात त्यांची तपासणी करावी अशी मागणी शेतकरी संघटनांच्या
प्रतिनिधींनी केली होती, साखर आयुक्तालयानं या दरांची तपासणी करावी, असे निर्देशही
जैन यांनी यावेळी दिले.
****
राज्यात डान्सबार बंदीसाठी राज्यसरकार पुढच्या दोन
आठवड्यात अध्यादेश आणण्याच्या विचारात आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी
मुंबईत पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार या मुद्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या
आगामी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयानं परवा डान्सबारसंदर्भातले
राज्य सरकारचे काही नियम शिथील तर काही नियम रद्द केले. या निर्णयाचा पूर्ण आदर आहे,
मात्र राज्याची सांस्कृतिक वीण अबाधित राहावी, यासाठी एक अध्यादेश काढून डान्सबारचा
कारभार बंद करण्याचा विचार राज्य शासन करत असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. डान्सबारच्या
विरोधात सर्व पक्षांचं एकमत असून, न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून, यासंदर्भातला
कायदा अधिक बळकट करण्यासाठी अध्यादेश काढणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.
****
मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात
दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळून लावाव्यात अशी विनंती राज्य शासनानं काल
एका प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून केली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यासाठी याचिकाकर्त्यांची
सादर केलेली आकडेवारी निराधार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मागासवर्ग आयोगाने सखोल
संशोधन करुन मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध केल्याचं सरकारनं प्रतिज्ञापत्रात नमूद
केलं आहे.
****
कर्तव्यात कसूर आणि पदाचा गैरवापर
केल्याप्रकरणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याविरूद्ध मुंबई
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं नाराजी व्यक्त केली आहे. दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला बापट यांनी पुन्हा परवाना
दिल्याचं समोर आलं असून, त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली आणि पदाचा गैरवापर
केला तसंच कायद्याची पायमल्ली करत अशा प्रकारचे अनेक आदेश दिले, असं न्यायालयानं म्हटलं
आहे.
****
सातारा जिल्ह्यातल्या भिलार या पुस्तकांच्या गावात
काल २८ व्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाला सुरूवात झाली. संमेलनानिमित्त
काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर, तसंच सातारा परिसरातल्या शाळांमधले
विद्यार्थी, महापुरुष, तसंच समाजसेवकांच्या वेशभुषेत सहभागी झाले.
****
राज्य शासन कौशल्यावर आधारित शिक्षणाला महत्त्व देत
असून त्यानुसार शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु केले
जात असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. काल लातूर इथं राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित
दुसऱ्या पदवी वितरण समारंभात ते बोलत होते. लोकल टू ग्लोबल हा शैक्षणिक दर्जा ठेवतानाच,
शिक्षणाला राजकारणापासून दूर ठेवत असल्याचं ते म्हणाले.
लातूर इथं उभारण्यात आलेल्या दीडशे फूट उंच ध्वजस्तंभावर
राष्ट्रध्वजारोहण तावडे यांच्या हस्ते काल करण्यात आलं, नागरिकांना देशभक्तीची प्रेरणा
मिळावी यासाठी हा राष्ट्रध्वज उभारला असल्याचं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यावेळी
म्हणाले. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या
वतीनं हा १५० फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशनच्या दहाव्या
शार्ङ्गदेव महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. शार्ङ्गदेव प्रसंग या परिसंवाद आणि सप्रयोग
व्याख्यान मालिकेत डॉ.करूणा विजयेंद्र यांनी भारतीय शिल्पनृत्याविषयी तर गुरु पेरणी
प्रकाश डी यांनी, तेलंगणामधल्या पेरणी नाट्यम या नृत्यप्रकारात पेरणी तांडवम् आणि लास्यम्
याबाबत सप्रयोग माहिती दिली. सायंकाळच्या सत्रात या नृत्यशैलीचं सादरीकरण झालं. गुरु
बनमाली महाराणा यांना शार्ङ्गदेव पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार
जाहीर झाल्यानंतर त्यांचं दोन महिन्यांपूर्वी निधन झाल्यानं, त्यांचे पुत्र सुरेंद्र
महाराणा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान
मेलबर्न इथं काल झालेला तिसरा एकदिवसीय सामना भारतानं सात गडी राखून जिंकत, तीन सामन्यांच्या
मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला. कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघानं
भारतासमोर २३१ धावांचं लक्ष्य ठेवलं. भारतानं सात गडी आणि चार चेंडू राखत हे लक्ष्य
पूर्ण केलं. महेंद्रसिंह धोनीनं नाबाद ८७, तर केदार जाधवनं नाबाद ६१ धावा केल्या. यजुवेंद्र
चहल सामनावीर, तर दोन सामन्यात नाबाद अर्धशतकांसह मालिकेत सलग तीन अर्धशतकं झळकावणारा
धोनी मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
दरम्यान, येत्या
२३ जानेवारीपासून भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पाच एकदिवसीयआणि तीन टी-ट्वेंटी सामन्यांची
मालिका होणार आहे.
****
मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत
भारताच्या सायना नेहवालनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. क्वालालंपूर इथं काल झालेल्या
उपान्त्यपूर्व सामन्यात सायनानं जपानच्या नोझोमी ओकुहाराचा २१ - १८, २३- २१ असा पराभव
केला. उपान्त्य फेरीत आज सायनाचा सामना स्पेनच्या कॅरोलिना मरीन विरुद्ध होणार आहे.
****
पुणे इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत
काल महाराष्ट्रानं काल आठ सुवर्ण पदकं जिंकली, मुष्टीयुद्धात पाच, टेनिसमध्ये दोन आणि
टेबलटेनिसमधल्या एका सुवर्णपदकासह महाराष्ट्राच्या सुवर्णपदकांची संख्या ७६ झाली आहे.
५७ रौप्य आणि ६७ कांस्य पदकांसह महाराष्ट्राची एकूण पदकसंख्या दोनशे झाली आहे. हरियाणानंही
काल आठ सुवर्णपदकं जिंकून पदकतालिकेत दिल्लीला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली,
हरियाणानं ४८ सुवर्ण तर दिल्लीनं ४७ सुवर्णपदकं पटकावली आहेत. उद्या या स्पर्धेचा समारोप
होत आहे.
****
पोलिस कल्याण योजनांच्या उत्कृष्ट अंमलबजावणीमध्ये
जालना जिल्हा राज्यात प्रथम आला आहे. नागपूर इथं सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांदरम्यान
राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते जालन्याचे पोलीस अधीक्षक एस.
चैतन्य यांचा प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. २०१४ ते २०१८ मध्ये
तत्कालीन पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी पोलीस कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी
केल्याबद्दल हा गौरव करण्यात आला.
****
यंदाचा डॉ.ना.य.डोळे स्मृती पुरस्कार अभिनेते अतुल
कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना
हा पुरस्कार दिला जातो. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप
असून उद्या
उदगीर इथं अतुल कुलकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
****
तुळजापूर इथं सुरू असलेल्या तुळजाभवानी मातेच्या
शाकंभरी नवरात्रोत्सवात काल सकाळी जलयात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. शेकडो महिला
जलकुंभासह या यात्रेत सहभागी झाल्या होत्या.
****
जालना तालुक्यातल्या कल्याणी नदीच्या पुनरुज्जीवनामुळे
पाणी साठवण क्षमता वाढून तीन हजार एकर जमीन ओलिताखाली येईल, असं राज्यमंत्री अर्जुन
खोतकर यांनी म्हटलं आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निरखेडा इथल्या कल्याणी नदी खोलीकरणाच्या
कामाचा शुभारंभ खोतकर यांच्या हस्ते काल झाला,
त्यावेळी ते बोलत होते.
*****
***
No comments:
Post a Comment