Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 20 January 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
विरोधी
पक्ष संवैधानिक संस्थांना बदनाम करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला
आहे. राज्यातल्या हातकणंगले, कोल्हापूर, म्हाडा, सातारा आणि दक्षिण गोव्यातल्या भाजपच्या
बुथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांशी पंतप्रधानांनी आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून
संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. विरोधकांच्या महाआघाडीमध्ये सामील पक्षांनी, काल
आयोजित केलेल्या सभेत फक्त कौटुंबिक राजकारणाला चालना दिली, भाजपनं मात्र देशाचे नागरिक
आणि त्यांच्या अपेक्षांशी आघाडी केल्याचं पंतप्रधान म्हणाले. खुल्या प्रवर्गातल्या
आर्थिक मागासवर्गीयांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय हा निवडणुकांच्या
पार्श्वभूमीवर घेतल्याचा विरोधकांचा आरोप पंतप्रधानांनी यावेळी फेटाळून लावला.
****
तामिळनाडू
संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरचं उद्घाटन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते
आज झालं. यावेळी त्रीची रायफलसह चार नवीन शस्त्रास्त्रं संरक्षण दलात सामील करण्यात
आली. तामिळनाडू कॉरिडॉरची त्रिची सालेम, होसूर, कोवई, मदुराई आणि चेन्नईमध्ये उपकेंद्रं
असतील, असं संरक्षण उत्पादन सचिव डॉ. अजय कुमार यांनी सांगितलं.
****
पुढच्या
वर्षापासून सगळ्या शाळांमध्ये खेळाला अनिवार्य विषय ठरवण्यात येणार असून, दररोज एक
तास खेळासाठी राखीव ठेवला जाईल, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर
यांनी सांगितलं आहे. पुणे इथं आज खेलो इंडिया युवा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी ते बोलत
होते. यजमान महाराष्ट्रानं ८५ सुवर्ण पदकं पटकावून खेलो इंडिया स्पर्धा जिंकली आहे.
****
खुल्या
प्रवर्गातल्या आर्थिक मागासवर्गीयांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा सरकारचा
निर्णय ऐतिहासिक असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं
आहे. उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते. यासंबंधीचं विधेयक
संसदेत पारित करण्यात आलं असून, राष्ट्रपतींनीही या विधेयकाला मंजुरी दिल्यानं या निर्णयाला
न्यायालयात आव्हान देता येणार नाही, असं ते म्हणाले.
****
मुंबईत
इंदू मील परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक २०२० पर्यंत पूर्ण होईल,
असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. नागपूर इथं आज भाजपच्या राष्ट्रीय
अनुसूचित जाती मोर्चाचं दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन ‘भीम संकल्प २०१९’च्या समारो
प्रसंगी ते बोलत होते. महाआघाडीला सामाजिक न्याय नको, तर सत्ता हवी असल्याचं सांगून
त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली. वंचितांसाठी सर्व प्रकारचं काम करण्यास सरकार कटीबद्ध
असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
वर्धा
- नांदेड या प्रगतीपथावर असलेल्या नवीन रेल्वेमार्गाकरिता राज्य शासनाच्या वतीनं अर्थसंकल्पात
तरतूद झालेल्या निधीपैकी शंभर कोटी रुपये निधी वितरीत करण्यास सरकारनं मान्यता दिली
आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार
रामदास तडस यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
****
हिंगोली
इथं ट्रक पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हा मोटार मालक संघाच्या
वतीनं आज हिंगोली-नांदेड मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या
संख्येनं वाहन मालक-चालक सहभागी झाले होते. वारंवार मागणी करूनही जागा उपलब्ध करून
दिली जात नसून, मागणी मान्य न झाल्यास २५ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा आंदोलकांनी
दिला आहे. या आंदोलनामुळे हिंगोली - नांदेड रस्त्यावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली
होती.
****
औरंगाबाद
इथल्या महात्मा गांधी मिशनच्या दहाव्या शार्ङ्गंदेव महोत्सवात आज शार्ङ्गंदेव प्रसंग
या सकाळच्या सत्रात कपिल जाधव यांनी सुंद्री या वाद्याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर
तेलंगणातली लोकप्रिय कला चिंदु यक्षगानम याविषयी गड्डम सामैय्या यांनी माहिती दिली.
तर शार्ङ्गंदेव प्रवाह या सत्रात नाट्यशास्त्र परंपरेनुसार वाचिक अभिनय आणि सामगान
आणि शिल्पनृत्य या विषयावर अभ्यास करण्यात आला.
****
राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाची परिवर्तन यात्रा उद्या औरंगाबाद जिल्ह्यात येत आहे. कन्नड, वैजापूर,
गंगापूर, बजाजनगर याठिकाणी उद्या जाहीर सभा होणार असल्याचं आमदार सतीश चव्हाण यांनी
सांगितलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
****
विदर्भाच्या
काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून, मराठवाड्याच्या
काही भागात तापमानात किंचित घट झाली आहे. राज्यात आज सर्वात कमी आठ पूर्णांक तीन अंश
सेल्सिअस तापमान नागपूर इथं नोंदवलं गेलं.
****
No comments:
Post a Comment