Sunday, 20 January 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.01.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20  january 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २०  जानेवारी २०१९  दुपारी १.०० वा.

****



 दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणं हीच त्यांच्या सक्षमीकरणाची पहिली पायरी ठरेल, असं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. हैदराबाद इथं काल भगवान महावीर विकलांग समितीनं आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. कोणालाही परस्परांत भेदभाव करण्याचा अधिकार नसून, दिव्यांगांचं सक्षमीकरण करणं ही संपूर्ण समाजाची, व्यक्तीची, तसंच संस्थांची एकत्रित जबाबदारी असल्याचं ते म्हणाले. दिव्यांगांचं जीवनमान सुकर व्हावं, याकरता सरकारनं राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला असून, २०२२ पर्यंत २५ लाख दिव्यांगांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं उपराष्ट्रपतींनी सांगितलं.

****



 आगामी सात ते आठ वर्षात भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकी डॉलर होईल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला आहे. गुजरातमधल्या गांधीनगर इथं काल व्हायब्रंट गुजरात परिषदेत निर्यातीबाबत आयोजित संमेलनात ते बोलत होते. उत्पादन, सेवा आणि कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करुन हे उद्दिष्ट साध्य करण्याची योजना आपल्या विभागानं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. आफ्रीका आणि लॅटिन अमेरिकी देशांबरोबर भारत निर्यातीत वाढ करु शकतो, ६५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीसह शंभर नवीन विमानतळांची उभारणी आगामी काळात होणार असल्याची माहिती प्रभू यांनी दिली.

****



 प्रसिद्ध संशोधक भारतरत्न सी. एन. राव यांना पहिला शेख सौद आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स मटेरियल्स या संस्थेकडून महत्त्वाच्या संशोधनासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. एकमतानं हा पुरस्कार प्राध्यापक राव यांना देण्याचं निश्चित केल्याचं जवाहरलाल नेहरु सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड साइंटीफिक रिसर्च या संस्थेनं म्हटलं आहे. स्मृतीचिन्ह, आणि एक लाख अमेरिकी डॉलर असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ जानेवारीला आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ५२वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, मायजीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****



 गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत राज्यात दोन कोटी ६० लाख बालकांचं लसीकरण झालं असून, ८४ टक्के उद्दिष्ट साध्य झालं आहे. आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत ही माहिती दिली. उस्मानाबाद, लातूर, पुणे, नाशिक या चार जिल्ह्यांत ग्रामीण भागातलं लसीकरण शंभर टक्के झालं असून, औरंगाबाद, हिंगोली, नांदेड, परभणी कोल्हापूर, भंडारा, धुळे, सातारा, वर्धा, अहमदनगर, गडचिरोली, नागपूर, जळगांव आणि ठाणे जिल्ह्यांतल्या ग्रामीण भागात ९० टक्क्यांहून अधिक बालकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. या मोहिमेत ज्या बालकांचं लसीकरण झालं नाही अशांसाठी शाळांमध्ये दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्याच बरोबर सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रं याठिकाणीही मोफत लसीकरण करण्यात येत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. या लसीकरणाबाबत शंकांचं योग्य निरसन झाल्यामुळे पालक, शाळा देखील लसीकरणासाठी पुढाकार घेताना दिसत आहे, असं ते म्हणाले.

****



 राज्यात येत्या पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. मराठवाडा विभागानं ११ कोटी वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट ठेवलं असून, जपानच्या 'मियावाकी' पध्दतीच्या धर्तीवर “घन पध्दतीनं वृक्ष लागवड” हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितलं. ते काल औरंगाबाद इथं यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते.

****



 राज्य पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं देशात अवैधरित्या प्रवेश करणाऱ्या पाच बांग्लादेशी नागरिकांना पालघर जिल्ह्यातून अटक केली आहे. हे पाच जण गेल्या दोन वर्षांपासून वैध कागदपत्रांशिवाय नालासोपारा परिसरात रहात होते. पारपत्र अधिनियम आणि विदेशी नागरिक अधिनियमा अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

****


 निवडणूक निकालानंतर विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातल्या एक हजार ६७० ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी काल पूर्ण झाली. यातल्या २८१ सदस्यांकडे जात पडताळणी प्रमाणपत्रच नसल्याचं आढळून आल्यानं त्यांच्यावर सदस्यत्व रद्दची कारवाई होऊ शकते. यासंदर्भात येत्या आठवडाभरात अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****


 औरंगाबाद इथं येत्या एक ते चार फेब्रुवारी दरम्यान पाचव्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. पैठण रस्त्यावरच्या कृषी तंत्रज्ञान शाळेत आयोजित या प्रदर्शनात रोप लागवडीच्या शास्त्रीय पद्धतींचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.

*****

*** 

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...