आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२० जानेवारी २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
पुणे इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचा
आज समारोप होत आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित रहाणार आहेत.
दरम्यान, काल या स्पर्धेत यजमान महाराष्ट्रानं विविध क्रीडा प्रकारात सात सुवर्ण, तीन
रौप्य, आणि १२ कांस्य पदकं जिंकली, यात टेबल टेनिस आणि मुष्टियुद्ध या क्रीडा प्रकारांचा
समावेश आहे. या स्पर्धेत ८३ सुवर्णपदकांसह एकूण २२२ पदकं जिंकत महाराष्ट्रानं पदकतालिकेत
प्रथम क्रमांक पटकावला आहे.
****
भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि इतर अभियांत्रिकी महाविद्यालयात
प्रवेशासाठी गेल्या आठ ते १२ जानेवारीदरम्यान घेण्यात आलेल्या जेईई - मेन्स पेपर एक
या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यात भोपाळच्या ध्रुव अरोरा यानं देशात पहिला तर
पुण्याच्या राज अगरवाल यानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या १५ जणामंध्ये महाराष्ट्रातले
तीन विद्यार्थी आहेत. जे विद्यार्थी या परिक्षेला पात्र ठरले नाहीत, त्यांना एप्रिल
मध्ये होणाऱ्या परिक्षेत पुन्हा बसता येणार आहे.
****
खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक
मागास घटकाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हिमाचल प्रदेशच्या
मंत्रिमंडळानं घेतला आहे. काल शिमला इथं झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय
झाला. संसदेच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात एकशे चोविसावं घटना दुरुस्ती विधेयक
मंजूर केलं आहे.
****
राज्यात येत्या २५ तारखेला “राष्ट्रीय मतदार दिवस साजरा” करण्यात येणार आहे. १८ वर्ष पूर्ण
केलेल्या नवीन तरूण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणं आणि त्यांचा मतदान प्रक्रियेत
सहभाग वाढवणं, हा या दिनाचा उद्देश आहे. यासाठी सर्व शासकीय कार्यालयामध्ये राष्ट्रीय
मतदार दिवसाची शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचं आवाहन मुख्य सचिव दिनेश कुमार
जैन यांनी केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ जानेवारीला आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ५२वा भाग
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment