Sunday, 20 January 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.01.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20  January 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २०  जानेवारी २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø  पायरसीच्या समस्येला आळा घालण्यासाठी सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल करून कठोर शिक्षेची तरतूद करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्रपट सृष्टीला आश्वासन

Ø  मुंबई ते नवी दिल्ली या नव्या राजधानी एक्सप्रेसचा शुभारंभ

Ø  जिल्हा परिषद सदस्याचं अपहरण करून खंडणी मागणारे पोलिस अधीक्षक मनोज लोहार यांना जन्मठेपेची शिक्षा

आणि

Ø  पुण्यातल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचा आज समारोप; स्पर्धेतलं महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम

****



 चित्रपट सृष्टीला भेडसावणाऱ्या पायरसीच्या समस्येला आळा घालण्यासाठी १९५२च्या सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल करून कठोर शिक्षेची तरतूद केली जाईल, असं  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचं उद्घघाटन काल त्यांच्या हस्ते मुंबईत झालं. त्यावेळी ते बोलत होते. चित्रपट सृष्टीशी संबंधित कालबाह्य झालेल्या आणि या क्षेत्रासाठी अडथळा ठरणाऱ्या कायद्यांसंदर्भात संबंधितांनी तपशीलवार माहिती दिल्यानंतर, असे कायदे रद्द करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिलं. साडेचार वर्षाच्या काळात आपल्या सरकारनं १४००हून अधिक कालबाह्य कायदे रद्द केल्याचंही त्यांनी सांगितले. चित्रिकरणासाठी लागणाऱ्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी ‘सिंगल विंडो’ योजना सुरु करण्याच्या दृष्टीनं काम सुरु असून, यासंदर्भात पोर्टलही बनवण्यात येणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. संवाद आणि मनोरंजन या विषयाला पूर्णत: समर्पित स्वतंत्र विद्यापीठ असावं, असं सांगून याबाबतीत चित्रपट उद्योगाने पुढाकार घ्यावा, सरकार संपूर्णपणे सहकार्य करेल, असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं.

****



 मुंबई ते नवी दिल्ली या नव्या राजधानी एक्सप्रेसचा शुभारंभ काल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस इथून करण्यात आला. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवून ही गाडी रवाना केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन दर बुधवारी आणि शनिवारी ही गाडी सुटेल आणि कल्याण-नाशिक-जळगाव-भोपाळ-झाशी मार्गे साडे १९ तासांनी दुसऱ्या दिवशी हजरत निझामुद्दीन स्थानकात पोहोचेल. दिल्लीहून ही गाडी दर गुरुवार आणि रविवारी दुपारी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला पोहोचेल.

****



 राष्ट्रवाद, सुशासन आणि विकास, अंत्योदय हे भारतीय जनता पक्षाचे तीन प्रमुख विचार असून या विचारांच्या आधारेच सामाजिक आणि आर्थिक प्रगती होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नागपूर इथं काल भाजपच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती मोर्चाच्या ‘भीम संकल्प २०१९’ यदोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनचं उद्घाटन गडकरी आणि केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. भाजप सरकारनं अनुसूचित जातींना सामाजिक सन्मान देण्याचं काम केलं, असं गेहलोत यावेळी म्हणाले.

****



 रोजगारासाठी सक्षम युवक म्हणून स्वतःकडे लक्ष देण्यापेक्षा तरुणांनी उद्योजक व्हावं, स्टार्टअप सुरु करावं, असं नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं आहे. ते काल सोलापूर इथं विद्यापीठाच्या चौदाव्या दीक्षांत समारंभात बोलत होते. वेळोवेळी अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक ते बदल करणं, त्याचप्रमाणे स्वयम, मूक यासारख्या माध्यमातून नवे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी स्वीकारण्याची गरज निर्माण झाली असल्याचं ते म्हणाले.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला 'मन की बात' या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेतून कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ५२ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार १८००११७८०० या नि:शुल्क क्रमांकावर, मायजीओव्ही ओपन फोरमवर तसंच नरेंद्र मोदी ॲपवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****



 राज्यातल्या स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत आता ग्राहकांना बॅंकींग सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यस बॅंकेचे व्यावसायिक प्रतिनिधी” म्हणून दुकानदारांना काम करता येणार आहे. पीओएस यंत्राच्या माध्यमातून बॅंक खात्यातली शिल्लक रक्कम तपासणे, पैसे काढणे आणि इतर मूल्यवर्धित बॅंकींग सेवा ग्राहकांना मिळणार आहेत.

****



 राष्ट्रीय नमूना पाहणीच्या ७७ व्या फेरीत कुटुंबाची जमीन, पशू धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीची मूल्यांकन पाहणी करण्यात येणार असून, ही पाहणी या महिन्यापासून ते डिसेंबर २०१९ या कालावधीत होणार आहे. राज्यातल्या सर्व नागरिकांनी पाहणीसाठी आणि माहिती संकलनासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून परिपूर्ण माहिती द्यावी असं आवाहन अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाचे संचालक आर आर शिंदे यांनी केलं आहे. ते काल मुंबईत यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 २५ लाख रूपयांच्या खंडणीसाठी चाळीसगाव इथले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांचं २००९ मध्ये अपहरण करून त्यांना १८ तास डांबून ठेवल्याप्रकरणी मुंबई गृहरक्षक दलाचे पोलिस अधीक्षक आणि चाळीसगावचे तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक मनोज लोहार आणि धीरज येवले यांना जळगाव जिल्हा सत्र न्यायालयानं काल जन्मठेप आणि प्रत्येकी पाच हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. या कृत्यामुळं समाजात चुकीचा संदेश गेला आहे असं न्यायालयानं सुनावणी करतांना सांगितलं. बांधकाम ठेकेदारांनी फसवणूक केल्याची तक्रार दिल्यानंतर चौकशीच्या बहाण्यानं महाजन यांचं अपहरण करून त्यांना डांबून ठेवलं होतं.

****



 सरपंचांनी गाव विकासाचं नियोजन करुन सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं. अखिल भारतीय सरपंच परिषद लातूर शाखेनं आयोजित केलेल्या सरपंच, उपसरपंच मेळाव्याचं उदघाटन करताना ते बोलत होते. गावाच्या विकासात सरपंचांची भूमिका महत्त्वाची असून,  लातूरची दुष्काळी जिल्हा ही ओळख पुसून टाकत, जिल्हा कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्याच्या कामात सर्व सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी सहकार्य करावं, असं आवाहन निलंगेकर यांनी केलं. जिल्हा परिषदेत आजपासून सरपंच कक्ष सुरु करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशनच्या दहाव्या शार्ङ्गंदेव महोत्सवात काल शार्ङ्गंदेव प्रसंग या प्रात:कालीन सत्रात कथकच्या जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ नृत्यांगना गुरु उर्मिला नागर यांचं सप्रयोग व्याख्यान झालं. यावेळी त्यांनी जयपूर घराण्याची वैशिष्ट्य उलगडून दाखवली. शार्ङ्गंदेव प्रवाह या दुपारच्या सत्रात शिल्पातून नृत्य कसं समजून घ्यायचं यावर नृत्यशिल्प ही कार्यशाळा झाली. कला इतिहासकार डॉ. करुणा विजयेंद्र यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.

****



 औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावर गोळेगाव बुद्रुक इथं दोन मालट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. अजिंठ्याहून सिल्लोडकडे गहू घेऊन जाणाऱ्या ट्रकची आणि औरंगाबादहून जळगावला लिंबू घेऊन जाणाऱ्या ट्रकशी समोरासमोर धडक होऊन दोन्ही ट्रक रस्त्यावर उलटले. या अपघातात मृत झालेले दोघे हरियाणातल्या मेवात इथले रहिवासी होते. तर दोघे जखमी मध्यप्रदेशातल्या टिकमगड इथले रहिवासी आहेत. जखमींना औरंगाबादच्या शासकिय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीत दाखल करण्यात आलं असल्याची माहिती अजिंठा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण आहेर यांनी दिली आहे.

****



 साच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे आग लागून जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या अंकुशनगर, शहागड परिसरातल्या सहा शेतकऱ्यांचा १८ एकरांतला ऊस जळून खाक झाला. काल दुपारी ही घटना घडली. गाळप हंगाम सुरू असतानाच ही घटना घडल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी महावितरणकडे भरपाई देण्याची मागणी केली आहे.

****



 जालना इथं येत्या दोन ते चार फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय दर्जाच्या पश-पक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. पशुसंर्वधन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काल जालना इथं ही माहिती दिली. या प्रदर्शनात सुधारीत चारा पध्दती, चारा साक्षरता अभियान, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन याबाबत तज्ज्ञ व्यक्तींच्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं असून पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती प्रदर्शनात देण्यात येणार आहे.

****



 पुण्यातल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचा आज समारोप होत आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित  राहणार आहेत. दरम्यान, काल या स्पर्धेत यजमान महाराष्ट्रानं विविध क्रीडा प्रकारात ७ सुवर्ण, ३ रौप्य, आणि १२ कांस्य पदकं जिंकली, यात टेबल टेनिस आणि मुष्टियुद्ध या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या स्पर्धेत ८३ सुवर्णपदकांसह एकूण २२२ पदकं जिंकत महाराष्ट्रानं पदकतालिकेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर हरियाणां एकूण १७० पदकं जिंकत दुसऱ्या आणि दिल्ली एकूण १५३ पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे.

****



 मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत काल स्पेनच्या कॅरोलीना मारीननं भारताच्या सायना नेहवालचा २१-१६, २१-१३ असा पराभव केला त्यामुळं सायनाचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

****

 औरंगाबाद इथं आज १२ वं ‘गुणीजन साहित्य संमेलन’ होणार आहे. प्रसिद्ध वक्ते डॉ. इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रेखा बैजल यांची निवड झाली आहे. रेल्वे स्थानक रस्त्यावर भानुदास चव्हाण सभागृहात हे संमेलन होणार आहे.

****

 नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात बरबडा इथं उद्यापासून तिसरं राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथालेखक डॉ.नागनाथ पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ग्रंथदिंडी, कथाकथन, कवी संमेलन, परिसंवाद असे अनेक कार्यक्रम संमेलनात होणार आहेत.

****

 राज्यात येत्या पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यापैकी ११ कोटी वृक्ष लागवड करण्याचं आव्हान मराठवाडा विभागानं स्वीकारलं असून जपानच्या 'मियावाकी' पध्दतीच्या धर्तीवर “घन पध्दतीने वृक्ष लागवड” हा उपक्रम मोहीम स्वरूपात राबवण्यात येणार आहे.

*****

***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...