आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१७ ऑक्टोबर २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी बीड जिल्ह्यातील परळी इथं भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी
आज दुपारी बारा वाजता सभा घेत आहेत. पंतप्रधान मोदी यांची आज दुपारी तीन वाजता सातारा
इथं आणि संध्याकाळी पुण्यात प्रचार सभा होणार आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर इथं काँग्रेसचे
राष्ट्रीय महासचिव ज्योतिरादित्य शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. औरंगाबाद इथं आमखास
मैदानावर आज संध्याकाळी पाच वाजता कम्युनीस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांची प्रचार
सभा होणार आहे.
****
कन्नडचे
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या औरंगाबाद शहरातल्या समर्थनगर इथल्या घरावर मध्यरात्री
अज्ञातांनी हल्ला केला आणि घरासमोरील गाड्यांची तोड फोड केली. जाधव यांनी या प्रकरणी
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर संशय व्यक्त केला असून शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे
यांनी मात्र याचा इन्कार केला आहे. दरम्यान, कन्नडचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव
यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी निवडणूक
आयोगानं त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य प्राध्यापिका
डॉ. मनीषा कायंदे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
****
मुंबईतील एका न्यायालयानं पीएमसी बँक घोटाळ्यातील तीन आरोपींना
तेवीस ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर
लिमिटेडचे अध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक राकेश वधवान, त्यांचे पुत्रं सारंग आणि
पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वरयाम सिंह यांना ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या ऊमरी
तालुक्यातील सिंधी इथली प्रणाली विठ्ठलराव
पाटील पुयड हिनं राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या
राज्यस्तरीय स्पर्धा नुकत्याच पुणे इथं महाराष्ट्र राज्य क्रिडा युवक कल्याण विभागानं
आयोजित केल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment