Saturday, 20 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.06.2020 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 20 June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० जून २०२० दुपारी १.०० वा.
****

 कोरोना विषाणूमुळे लागू टाळेबंदीच्या काळात घरी परतलेल्या स्थलांतरितांना रोजगार संधी निर्माण व्हावी याकरता तयार करण्यात आलेल्या गरीब कल्याण रोजगार अभियानाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. या योजनेकरता पंचवीस कार्यक्षेत्रं निश्चित करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधानांनी यानिमित्त दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना दिली. कामगारांना त्यांच्या घराजवळ काम मिळावं असा आपला प्रयत्न आहे, आपण आतापर्यंत शहरं विकसित करत होता आता आपण आपल्या खेड्यांना मदत करा, असं आवाहन त्यांनी यावेळी स्थलांतरित कामरांना उद्देशून केलं.  ग्रामीण भागानं या विषाणूचा ज्या पद्धतीनं सामना केला तो शहरांसाठी एक मोठा धडा असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमुद केलं.
****

 भारतीय वायूदल कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड द्यायला सज्ज  असल्याचं वायूदलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी म्हटलं आहे. हैद्राबादमधे वायूदलाच्या संयुक्त पदवी संचलन समारंभात ते आज बोलत होते. लडाखमधील गलवान इथलं शूर जवानांचं बलिदान वायूदल कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही, अशी शाश्वती त्यांनी यावेळी देशवासीयांना दिली. आपल्या सशस्त्र दलांनी कायम सतर्क आणि सज्ज रहायला हवं अशी आपल्या भागातील सुरक्षेची स्थिती असल्याचं ते म्हणाले. लडाखमधे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेली परिस्थीती म्हणजे आपल्याला अल्पावधित कोणत्या परिस्थीतीला तोंड द्यावं लागू शकतं याचं एक अल्प उदाहरण असल्याचं वायू दल प्रमुख भदौरिया यांनी यावेळी नमुद केलं.
****

 कोरोना विषाणूची लक्षणं असलेल्या व्यक्तिंनी घरा विलगीकरणात राहण्याच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं अशा सूचना केंद्रानं राज्यांना पत्राद्वारे केल्या आहेत. अशा व्यक्तीनं जिल्हा आरोग्य विभागाला विलगीकरणाचे सर्व निकष पाळण्याविषयीचं एक वचनपत्र देणं बंधनकारक असून घरी विलगीकरणात असतांना जिल्हा निरीक्षक अधिकाऱ्याला वेळोवेळी तब्येतीची माहिती द्यावी असं यात म्हटलं आहे. काही राज्यांमधे घरातच विलगीकरणात राहण्याच्या नियमांचं अजिबात पालन केलं जात नसल्यबद्दल केंद्रानं नाराजी व्यक्त केली आहे.
****

 मुंबईमधल्या बोरिवली इथं झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी कोविड केंद्र सुरु करण्यात आलं आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते आज या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. या केंद्रामुळे आता झोपडपट्टीतील रहिवाशांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध होतील, असं प्रशासनानं म्हटलं आहे.
****

 औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पळशी इथं आज सर्वाधिक ६ रुग्णांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे. याशिवाय पिसादेवी इथं २  आणि कन्नड इथं एक रुग्ण आढळून आला. आज जिल्ह्यात १०२ रुग्णांना बाधा झाल्याचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये ४७ महिला आणि ५५ पुरुषांचा समावेश आहे.
****

 जालना शहरात आज कोरोना विषाणूचे सहा नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्या३५९ रुग्ण झाले आहेत. आज आढळलेले बाधित रुग्ण रहेमानगंज, देहेडकरवाडी, कुरेशी मोहल्ला, श्रीकृष्णनगर, नरिमन नगर या भागातले आहेत. आतापर्यंत २२५ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे.
****

 परभणी शहरातल्या सुंदराई नगर भागात कोरोना विषाणू बाधित एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज  सुंदराई नगर आणि परिसर प्रतिबंधित  क्षेत्र म्हणून जाहीर केलं.
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी शिवारात ओढ्याच्या काठानं जात असलेलं एक दांपत्य काल संध्याकाळी पाण्याचा प्रवाह वाढल्यानं बैलगाडीसह वाहून गेलं. या दूर्घटनेतील बैल वाचवण्यात यश आलं, मात्र दांम्पत्याचा शोध अद्याप लागलेला नसल्याचं बचाव कार्य करणाऱ्यांनी म्हटलं आहे. कुंडलीक असोले आणि ध्रुपदाबाई असोले अशी या दोघांची नावं असून, ते कळमनुरी तालुक्यातल्या असोलवाडी इथले रहीवाशी आहेत. त्यांच्यासाठी शोध कार्य सुरू असल्याचं कळमनुरीचे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी म्हटलं आहे.
****

      लातूर जिल्हयातल्या “महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलं आहे. सेतू सुविधा केंद्र किंवा बँकेत ही सुविधा उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी सामाजिक अंतर पाळत, गर्दी न करता आधार प्रमाणिकरण करावं, असं ते म्हणाले.
****

      हिंगोली जिल्ह्यातही पुन्हा आधार प्रमाणिकरण सुरु झालं असून, या योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना ३९५ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्यास प्रारंभ केल्याचं दिसून येत आहे.
*****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...